computer

व्हिडीओ ऑफ दि डे : दोन धडधाकट चोरांना चक्क आजी आजोबांनी हाकलून लावलंय भाऊ !!

भारतात घरात दरोडा टाकणे काय मोठी गोष्ट नाही. दिवसाढवळ्या सुद्धा दरोड्याच्या घटना भारतात नेहमी घडत असतात. तर कधी रात्री घरात कोणी नाही हे हेरून चोरी केली जाते. कधी कधी तर घरात लोक असून पण चोर गुंगारा देतात राव!!! पण एका जोडप्याने काही चोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. असा धडा दिल्यानंतर पुढचे अनेक दिवस चोरी करण्याचा ते विचार पण करणार नाहीत. काय होतं नेमके प्रकरण चला जाणून घेऊ या. 

तामिळनाडू येथे रात्रीच्या वेळेस 70 वर्षाचे शानमकावेल त्यांच्या फार्महाऊसच्या गॅलरीत आराम करत बसले होते. तेवढ्यात अचानक मागून दोन चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या चोरांनी तोंडाला कापड गुंडाळले होते, आणि कपड्याने ते शानमकावेल यांचा गळा आवळू लागले. बिचारा म्हातारा जीव वाचविण्यासाठी होईल तेवढ्या आरोळ्या मारू लागला. त्यांचा आवाज ऐकून काही सेकंदांनी त्यांची पत्नी बाहेर आली. 

त्यांच्या पत्नीचे नाव सेंतथामराई त्या 65 वर्षाच्या आहेत. पण मंडळी त्यांनी वयाचा विचार न करता चप्पल उचलले आणि चोरांना त्या बदडायला लागल्या. अचानक हल्ला झाला तर चांगले धडधाकड पहेलवान सुद्धा काही करू शकत नाही. पण या म्हातारीने त्यांना माती खायला लावली. नंतर त्यांनी खुर्च्या उचलून फेकल्या. म्हाताऱ्याला पण आपल्या बायकोचा पराक्रम बघून हिंमत आली. त्यांनी चोरांना लाथा घालायला सुरवात केली. चोरांनी महिलेवर पण वार केले पण तिने हार नाही मानली, ती त्यांना मारतच होती. शेवटी चोरांना तिथून पळ काढावा लागला राव. या सर्व गदारोळात चोरांना महिलेची 33 ग्रॅम सोन्याची चेन चोरण्यात यश आले. 

मंडळी, हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. या व्हिडीओमुळेच या म्हाताऱ्या जोडण्याचा पराक्रम सर्वांसमोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. सगळीकडून या जोडप्याचे कौतुक होत आहे. 

पोलिसांनी सांगितले की हा सर्व प्रकार रात्रीच्या अंधारात झाला. सध्या तरी ते चोर फरार असले तरी लवकरच ते पकडले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

लेखक : वैभव पाटील