computer

नळाच्या तोटीतून पाण्याच्या जागी चक्क दारू आली...काय आहे ही भानगड?

बाबुराव गणपतराव आपटेचं स्वप्न आठवतंय? ‘नल खोला की गिलासमें दारू!! मैं उपर एक टंकी बिठयेगा, सीधा उसमें दारू भरनेका, ये रोज रोज का खिटपिट मेरेको नहीं मंगता!!’

नळाच्या तोटीतून पाण्यासारखी दारू यावी ही तळीरामांसाठी स्वप्नवत असलेली कल्पना केरळच्या लोकांसाठी खरी ठरली आहे. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातल्या चालाकुडी येथील सोलोमन अॅव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या १८ कुटुंबियांसाठी हा धक्कादायक प्रकार होता. रविवारी संध्याकाळी या भागात दारूचा वास येऊ लागला. दुसऱ्या तर घरात येणाऱ्या पाण्यालाच दारूचा वास येऊ लागला. पाणी प्यायल्यावर समजलं की पाण्यात दारू आहे.

भानगड आहे तरी काय?

या भानगडीचं मूळ ६ वर्षापूर्वीच्या एका घटनेत आहे. ६ वर्षापूर्वी या भागातील रचना बारवर उत्पादन शुल्क विभागाने धाड घातली होती. या धाडीनंतर  बार बंद करण्यात आलं आणि तिथला सर्व दारूसाठा जप्त करण्यात आला. हा दारूसाठा बियर आणि इतर प्रकारची दारू मिळून तब्बल ६००० लिटर एवढा होता.

कोर्टाने म्हटलं की ही सगळी दारू नष्ट करण्यात यावी. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने बार जवळच एक खड्डा खणून त्या खड्ड्यात दारूच्या २००० बाटल्या रिकाम्या केल्या. योगायोगाने जवळच विहीर होती. खड्ड्यात ओतलेली दारू मातीत मुरली आणि ती पुढे पाण्यात मिसळली.

सोलोमन अॅव्हेन्यूमध्ये असलेल्या या विहिरीच्या पाण्यावर  तिथली १८ कुटुंबं जगत आहेत. पिण्यासाठी, जेवणासाठी, अंघोळीसाठी या पाण्याचा वापर होतो. पाण्यात दारू असल्याचं माहित पडल्यावर तिथल्या रहिवाशांकडे  पिण्यासाठीही  पाणी उरलं नव्हतं.  

सोलोमन अॅव्हेन्यूमधल्या नागरिकांनी पोलिसात  तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करून पाण्यात दारू असल्याचं स्पष्ट केलं. पाण्याची  पर्यायी व्यवस्था म्हणून ५००० लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाला सर्वस्वी दोषी ठरवण्यात आलं आहे. उत्पादन शुल्क विभागाने विहिरीच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required