computer

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोज ३० किलोमीटर सायकलवरून प्रवास करणारा शिक्षक !!

'पिंजरा' सिनेमा आठवतोय? मास्तरांचा गावभरात आदरयुक्त दरारा होता. असं एकेकाळी घडत असे बरं.. गावातल्या कुठल्याही निर्णयात गावातल्या शिक्षकाला सामील करून घेतले जात असे. त्याला एवढा सन्मान मिळायचा कारण निस्वार्थ वृत्तीने ते आपली सेवा बजावत असत. शिकवणं सोडून ते आता ज्याला आपण लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणतो ते करत असत. पण काळ बदलला तसा शिक्षकी पेशासुद्धा व्यावसायिक होऊन बसला. मग आपलं नेमून दिलेलं काम करणं एवढ्यापुरतं अर्थ या महत्वाच्या पेशाला उरलं. अर्थात यात  काही गैर आहे असं नाही. पण या कारणामुळे म्हणावा तसा आदर शिक्षकी पेशाला आता मिळत नाही. 

शिक्षक हा समाजाला दिशा देणारा असावा लागतो. त्याच्या जगण्यातून तो समाजाला वाट दाखवत असतो. असे शिक्षक आज दुर्मिळ झाले आहेत. पण असे असले तरी आजही शिक्षणाचे व्रत घेऊन काम करणारे शिक्षक आहेत राव!! आणि त्यांच्यामुळेच आजही खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाची गंगा अव्याहत सुरू आहे. असेच एक शिक्षक म्हणजे नंदुरबारचे नरेंद्र पाटील सर!!! 

(प्रातिनिधिक फोटो)

नंदुरबार जिल्ह्यातील भालेर इथं शिवदर्शन विद्यालयात नरेंद्र पाटील नावाचे शिक्षक आहेत. ते समाजात पर्यावरण स्नेह वाढावा, समाजात पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून चक्क सायकलवर रोज ३० किलोमीटर उपडाऊन करतात.

नरेंद्र पाटील सरांच्या घरापासून शाळेचे अंतर जवळपास १५ किलोमीटर आहे. येण्याचे आणि जाण्याचे १५ असा रोज ३० किलोमीटरचा प्रवास ते करतात. यामागील कारण ते सांगतात की याचे अनेक फायदे आहेत. एक म्हणजे व्यायाम होतो, आणि व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज उरत नाही. दुसरा म्हणजे पेट्रोलचा खर्च वाचतो, प्रदूषण ही होत नाही, आणि समाजाला पर्यावरणाबद्दल संदेश ही दिला जातो.

नरेंद्र पाटील सरांची पूर्ण तालुक्यात प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळख आहे, ते नेहमी वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी धडपड करत असतात. खेड्यांमध्ये अंधश्रद्धेचा मोठा विळखा असतो. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठीसुद्धा ते नेहमी गावोगावी जाऊन विविध प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. तसेच विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देणे, नोट्स पुरवणे असे कामसुद्धा ते करत असतात. आपल्या पेशाला जीवन वाहून घेतले की बदल घडतो याचे नरेंद्र पाटील मोठे उदाहरण आहेत.

 

लेखक : वैभव पाटील.

सबस्क्राईब करा

* indicates required