computer

शुक्रावरच्या विवरांना दिली आहेत या तीन भारतीय स्त्रियांची नावे-यांतल्या दोघी तर तुम्हांला चांगल्याच माहित आहेत

सकाळच्या वेळेस शुक्राची चांदणी चमकते. शहरात राहणार्‍यांना दिसायची नाही, पण खेड्यात अजूनही शुक्राची चांदणी पाहून उठणारे लोक आहेत.  ’शुक्रतारा मंदवारा..’ सारख्या रोमॅंटिक कल्पना जरा बाजूला ठेवल्या, तर शुक्र आहे एक ग्रह.  पृथ्वीला सूर्याच्या बाजूनं जवळ असणारा. या ग्रहावरही कित्येक विवरं आहेत. विवर म्हणजे ग्रहावरचे खड्डे.

तर ग्रहावरच्या विवरांना प्रसिद्ध लोकांची नावं देण्याची पद्धत आहे. या शुक्रावरच्या तीन विवरांना  दिली आहेत तीन भारतीय स्त्रियांची नावं..  ज्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागे, त्या काळातल्या आणि काळाच्याही पुढच्या हा महान तीन स्त्रिया.. उगीच नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नावं या विवरांना दिली गेली आहेत ते..

१. जोशी विवर

यांतल्या एक आहेत डॉ. आनंदीबाई जोशी. यांच्याबद्दल माहिती नाही असा मराठी माणूस सापडणं अवघड आहे. किमान भारतातली पहिली स्त्री डॉक्टर म्हणून तर यांचं नांव सर्वांना माहित आहे. 

 ३१ मार्च १८६५ साली मुंबईजवळच्या कल्याण इथं जन्मलेल्या यमुनेचं तिच्याहून २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळरावांशी लग्न झालं आणि यमुनेचं नांव आनंदी ठेवण्यात आलं. गोपाळरावांनी आनंदीबाईंना लिहा-वाचायला शिकवलं. त्यांचं मूल वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यानं वारलं आणि आनंदीबाईंना आपण डॉक्टर व्हावंसं वाटलं. गोपाळरावांनीही त्यात बायकोला साथ दिली आणि आनंदीबाई सातासमुद्रापार जाऊन डॉक्टरी शिकणार्‍या पहिल्या भारतीय स्त्री ठरल्या. त्या काळात अमेरिकेतही स्त्रियांचा वैद्यकीय शिक्षणासाठी लढा चालू होता. आनंदीबाईंनी अमेरिकेला जाण्याआधी कलकत्त्यातल्या एका सभेत अस्खलित इंग्रजीत भाषण केलं होतं. तेव्हा कुणीतरी विचारल्यावर , "परदेशातही मी माझ्या खाण्यात आणि वागण्यात बदल करणार नाही" असं म्हटलं होतं. हे वचन त्यांनी अक्षरश: स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाळलं. अमेरिकेतल्या थंड वातावरणातसुद्धा त्या सुरूवातीला नऊवारीच नेसायच्या. तुम्हांला तर माहित आहे, नऊवारीचा कासोटा घातल्यानंतर पाय कसे उघडे  पडतात ते. मग काही काळानंतर थंडी अगदीच सोसवेना म्हणून गुजराती पद्धतीनं त्या साडी नेसू लागल्या. सततचं थंड वातावरण, अशक्त शरीर, सततचा ताप, नवर्‍याचा विक्षिप्तपणा आणि टोमणे यामुळं त्या बरेचदा आजारी असायच्या. त्या डॉक्टर झाल्या आणि भारतात येऊन कोल्हापूर संस्थानात नोकरीवर रूजू होणार होत्या. त्याआधीच त्यांना टी.बी.नं गाठलं आणि डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस सुरू करण्याआधीच वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी आनंदीबाईंचा मृत्यू झाला.

आनंदीबाईंचा शेवट शोकांत झाला तरी त्यांच्यामध्ये खूप आशावाद होता आणि  तितकीच होती परिश्रम करण्याची तयारी. आजच्या सगळं काही हाताशी हजर असण्याच्या काळात आनंदीबाईंची कहाणी नक्कीच आपणांस प्रेरणादायी आहे.

आनंदीबाई या पहिल्या मेडिसीनचं पद्धतशीर शिक्षण घेतलेल्या महिला  डॉक्टर, पण डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणार्‍या पहिल्या माहिला डॉक्टर म्हणजे डॉ. रखमाबाई सावे. त्यांच्याबद्दल परत कधीतरी नक्कीच लिहू. 

मेधावी विवर

पंडिता  रमाबाईंचा जन्म तर आनंदीबाईंच्याही आधीचा, सन १८५८चा. त्यावेळेसही स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल काही वेगळं चित्र नव्हतं. स्त्रियांना संस्कृत आणि वेद शिकवण्यातर तर भलतीच बंदी होती. तरीही लोकांचा रोष पत्करून रमाबाईंचे वडिल पंडित अनंतशास्त्री डोंगरेंनी रमाबाईंच्या आईला आणि रमाबाईंना सारं काही शिकवलं होतं. इतकंच नाही, तर रमाबाईंवर लग्न करण्याचा दबावही आणला नाही. त्या सोळा वर्षांच्या असतानाच त्यांचे आईबाबा वारले.  त्या काळात सोळा वर्षांची विनालग्नाची मुलगी असणं काय होतं याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर ही मुलगी तेव्हा भारतभर फिरली. कलकत्त्यात  त्यांचं भाषण ऐकण्यासाठी खूप लोक जमले होते. इथंच त्यांना ’सरस्वती’ आणि ’पंडिता’ या पदव्या मिळाल्या. स्त्रिशिक्षणाला मान्यता नसण्याच्या काळात एका स्त्रीची बुद्धिमत्ता अशी जाहिरपणे गौरवली गेली होती.  इतकंच काय, त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू  इतक्या सार्‍या भाषा चांगल्यात माहित होत्या. पुढं चालून रमाबाईंनी कोलकत्यातील बिपिन मेधावी या वकिलांशी लग्न केलं.  हे लग्न तेव्हा बरंच गाजलं. कारण हा आंतरजातीय, आंतरभाषिक असा विवाह तर होताच. तेव्हा जातपात आजच्यापेक्षा जास्त मानत आणि रमाबाईंचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे!! दुर्दैवाने मेधावी लग्नानंतर दोनच वर्षांत वारले.

 त्यानंतर रमाबाई आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्याला येऊन राहिल्या. इथं येऊन त्यांनी बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या वाईट चालीरीती समाजातून  कायमच्या रद्द व्हाव्यात म्हणून रमाबाईंनी ’आर्य माहिला समाजा’ची स्थापना केली. या आर्य समाजाच्या बर्‍याच ठिकाणी शाखाही निघाल्या. रमाबाईंनी विधवांकरता ’शारदा सदन’, ‘प्रीतिसदन’, आणि ‘शांतिसदन’ नावाच्या संस्था काढल्या. स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं राहाता यावं म्हणून त्यांना पैसा मिळवून देणार्‍या व्यवसायांचं शिक्षण दिलं.  केशवपन या वाईट प्रथेविरूद्ध लढा दिला.  त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’, ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ आणि ‘द हायकास्ट हिंदू वूमन’  ही पुस्तकं लिहिली. इंग्लंड आणि अमेरिका या देशांतून भारतातल्या लोकांच्या अडीअडचणी, हिंदू बालविधवांचे प्रश्न याबद्दल व्याख्यानं दिली. इतकंच काय, त्यांनी इंग्लंडच्या एका कॉलेजात संस्कृत शिकवलं. रमाबाईंनी मूळ हिब्रू भाषेत लिहिलेल्या बायबलचं मराठी भाषांतर केलं. असं म्हणतात, की आजही तीच ती रमाबाईंनी भाषांतरित केलेली मराठी बायबल्स वापरली जातात.

    झिराड विवर

    डॉ. जेरूशा झिराड या देखील एक डॉक्टरच होत्या. भारतात असलेल्या बेने इस्त्रायल या समाजाच्या जेरूशा यांचा जन्म होता १८९१चा.  लंडन युनिव्हर्सिटीमधून एम डी ची पदवी मिळवणार्‍या आणि त्यासाठी सरकारी स्कॉलरशिप मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय स्त्री होत्या. 

    भारतातलं वैद्यकीय शिक्षण सुधारावं आणि भारतीय माहिला डॉक्टरांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने ’मेंबर ऑफ ब्रिटिश एंपायर’ तर भारत सरकारने ’पद्मश्री’ पुरस्कार देऊन डॉ. जेरूशा झिराड यांचा गौरव केला आहे. आज त्यांच्याबद्दल आंतरजालावर अधिक माहिती सापडत नाही, हे आपलं दुर्दैव!!

     

    सबस्क्राईब करा

    * indicates required