computer

सुंदरबनचा वाघ आणि स्थानिकांचा संघर्ष...सुंदरबनच्या सौंदर्याची ही दुसरी बाजू माहित आहे का?

सुंदरबन... नावाप्रमाणेच सुंदर आणि रम्य असलेलं हे जंगल आहे मुख्यतः पश्चिम बंगालमध्ये. मात्र याचा विस्तार भारत आणि बांगलादेशाच्या विस्तीर्ण प्रदेशात झाला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड दाट खारफुटींची झाडं आणि इथल्या जंगलाचा अनभिषिक्त राजा बेंगॉल टायगर अर्थात पट्टेरी वाघ. हा प्रदेश एकूण ५६ बेटांनी बनलेला आहे. आपल्याकडल्या शहरी पर्यटकांना सुंदरबनाची भुरळ पडते ते त्याचं हे अनोखं वैभव, असंख्य प्रकारचे पक्षी, त्यांच्या वेगवेगळ्या जाती, सौंदर्याचा वेगळाच नूर असणारी हरिणे आणि अर्थात जंगलचा राजा ‘बंगाल टायगर’ हे सगळं टिपण्यासाठी. पण प्रत्यक्षात चित्र काय आहे? ते खरंच तितकं रमणीय आहे का? उत्तर आहे - नाही. 

इथल्या रहिवाशांशी बोललं तर अनेक गोष्टी कळतात. एक म्हणजे इथली नैसर्गिक परिस्थिती. सुंदरबनातल्या बेटांपैकी बरीच बेटं सखल भागात आहेत. बरेचदा इथे भरतीचं पाणी शिरतं. या बेटांवरची घरं, शेतं यांना मातीच्या बांधांचं तात्पुरतं संरक्षण असलं तरी पाण्याचा एक जोरदार प्रवाह हे बांध झटक्यात ढासळवू शकतो. त्यामुळे इथली जमीन दिवसेंदिवस खारी आणि नापीक बनत चालली आहे. गेल्या दहा वर्षांत वातावरणातल्या बदलांमुळे समुद्राच्या पृष्ठभागालगतच्या पाण्याचं तापमान वाढलं आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात होणारी चक्रीवादळं जास्त तीव्र आणि वारंवार होत आहेत. त्याचा सुंदरबनातल्या अन्नसाखळीवर परिणाम होत आहे. याचं कारण परत तेच. जमिनीचा कस कमी होणं, नापिकी आणि अन्न उत्पादनात घट. पण याचा अजून एक भयानक परिणाम म्हणजे वाघांकडून माणसांवर होणारे हल्ले.

मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यातला संघर्ष नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. सहसा माणसाने जंगलात वन्यपशूंच्या हद्दीत अतिक्रमण केलं की प्राणी बिथरतात, माणसांवर हल्ले करतात. कधीकधी जंगलात भक्ष्य न मिळाल्याने प्राणी जंगलालगतच्या मानवी वस्तीकडे आपला मोर्चा वळवतात आणि शिकार करतात. सुंदरबनावर पण आज याच प्रकारच्या काहीशी भीतीची छाया आहे. इथे वाघाने हल्ला केल्याच्या, ठार केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 

अशीच एक दुर्दैवी स्त्री म्हणजे पारुल हलदर. चाळिशीतली ही महिला सतजेलिया या गावात आपल्या ११ वर्षाच्या पपरी या मुलीबरोबर राहते. मासेमारीसाठी  घनदाट जंगलात गेलेल्या तिच्या नवऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केलं होतं. आता तिच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आहे. ती स्वतः मासेमारी करून आणि खेकडे पकडून उदरनिर्वाह चालवते. यातून तिची दरमहा कमाई आहे फक्त दोन हजार. पण त्यातही आपल्या मुलीला चांगलं शिकवून स्वतःच्या पायावर उभं करण्याचं स्वप्न ती पाहत आहे. 

कुमीरमारी येथील ३० वर्षीय अष्टमी मोंडलची कहाणी वेगळी नाही. तिचा नवरा हरीपदा हा भारतभर लॉकडाऊन लागू होण्याच्या काहीच दिवस आधी घरी आला होता. तो एका बांधकामाच्या साईटवर काम करायचा. लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यांच्या कुटुंबासमोर बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला. जवळपास मासेमारीला जावं आणि शे दोनशे रुपये कमावून आणावेत... तेवढाच घरखर्चाला हातभार, असा विचार करून एक दिवस भल्या पहाटे उजाडण्यापूर्वीच निघाला तो घरी परतलाच नाही. खोल जंगलात शिरला आणि वाघाची शिकार झाला. "जर कोरोना नसता किंवा लॉकडाऊन नसतं तर आज तो जिवंत असता'' असं म्हणत आजही अष्टमी नशिबाला बोल लावते.

या झाल्या एकदोन प्रातिनिधिक घटना. अशा अनेक महिला या गावात आहेत. वाघाच्या हल्ल्यात नवरा गमावलेल्या. त्यातल्या कुणी मासेमारी, खेकडे पकडणं अशी कामं करतात तर कुणी शेतात मजूर म्हणून राबतात. परिस्थितीने त्यांना पार बोट वल्हवायला पण शिकवलं आहे. खरी आत्मनिर्भरता इथे निसर्गानेच त्यांच्या अंगवळणी पाडली आहे! यात सतजेलियामधली ३२ वर्षीय नमिता मोंडल आहे, तशाच तिथल्या ७० वर्षाच्या आरती मोंडल या आजीबाई पण आहेत. विशेष म्हणजे यातल्या कित्येक हल्ल्यांच्या घटना रेकॉर्डवर आलेल्या नाहीत. याचं कारण मुळात या जंगलांच्या इतक्या अंतर्भागात जाणंच मुळात बेकायदेशीर आहे. पण तरी लोक जातात. कधी अज्ञानापोटी, कधी निव्वळ बेफिकिरीतून तर कधी पोटाची खळगी भरण्यासाठी. दोष तरी नक्की कुणाला द्यायचा? माणसाला, वाघाला, की परिस्थितीला?  

एक मात्र खरं, सुंदरबन रमणीय आहे ते आपण तिथे पर्यटक म्हणून जातो त्यामुळे. प्रत्यक्षात परिस्थिती 'घी देखा लेकिन बडगा नहीं देखा' अशीच आहे.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required