computer

या वाघाने १५० दिवसात १३०० किलोमीटरचा प्रवास का केला ? कारण विचार करायला भाग पाडेल !!

माणूस जास्तीत जास्त जंगल तोडून स्वतःसाठी अधिकाधिक जागा तयार करतोय आणि ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. या समस्येचा परिणाम स्वतः माणसावर फारसा झालेला नसला तरी प्राण्यांसाठी मात्र ही जीवाची लढाई होऊन बसली आहे. आज आम्ही जी बातमी घेऊन आलो आहोत ती तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल.

कोणताही प्राणी स्वतःचा प्रदेश ठरवून ठेवत असतो. त्या प्रदेशात इतर प्राण्यांनी आलेलं त्याला चालत नाही. वाघ हा प्राणी आपल्या प्रदेशाच्या बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा जास्त संरक्षणात्मक असतो. त्याला कारणही आहे.  ज्या जागी मुबलक पाणी, अन्न आणि जोडीदार असेल तिथेच वाघ ठाण राहतो. अशी बरोबर जागा शोधण्यासाठी त्याला बराच प्रवास करावा लागतो. सध्या जंगल कमी होत असल्याने हा प्रवास कैकपटीने वाढला आहे. या वाघाला तर आपला प्रदेश शोधण्यासाठी तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेने या वाघाला TWLS-T1-C1 नाव दिलं आहे. या लेखापुरतं आपण त्याला C1 म्हणूया. तर, C1 वाघ तब्बल १५० दिवस प्रवास करत होतं. त्याचं जन्मस्थान असलेल्या टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पापासून त्याने जून २०१९ मध्ये चालायला सुरुवात केली. तिथून सलग १५० दिवस प्रवास करत त्याने महाराष्ट्रातील ६ जिल्हे ओलांडून तेलंगणा राज्यात प्रवेश केला. हवी तशी जागा न मिळाल्याने तिथून फिरत तो पुन्हा महाराष्ट्रात आला. शेवटी त्याला ज्ञानगंगा अभयारण्यात मनाजोगती जागा सापडली.

वाघाचा प्रवास कसा टिपण्यात आला ?

भारतीय वन्यजीव संस्था काही वर्षांपासून वाघांच्या प्रवासावर नजर ठेवण्यासाठी वाघांच्या गळ्याभोवती रेडीओ कॉलर लावत आहे. रेडीओ कॉलरमुळे वाघ कुठे आहे याचा नेमका पत्ता शोधता येतो. या अभ्यासाचा भाग म्हणून २७ मार्च, २०१९ साली C1 वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आला होता.

(टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प)

C1  ने २ राज्यातून प्रवास केला आणि बऱ्याचदा मानवी वस्तीतून त्याने प्रवास केला, पण त्याच्यामुळे कोणालाही इजा पोहोचली नाही किंवा त्यालाही माणसांकडून धोका निर्माण झाला नाही, ही महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. काही ठिकाणी त्याला पोट भरण्यासाठी जनावरं मारून खावी लागली. हिंगोलीमध्ये असताना एकदा त्याची आणि गावकऱ्यांची चकमक होता होता राहिली होती. या किरकोळ घटना सोडल्या तर C1  ने आपला प्रवास सुखरूप पार पाडला.

C1  वाघाच्या प्रवासातून काय दिसून येतं ?  

सर्वात प्रकर्षाने दिसून आलेली गोष्ट म्हणजे, वाघांना योग्य जागा शोधण्यासाठी मानवी वस्तीतून, जंगल नसलेल्या ठिकाणावरून प्रवास करावा लागत आहे. जंगल कमी होत असल्याने हा प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चालला आहे.या घटनेत योगायोगाने वाघाचा आणि माणसाचा संपर्क आला नाही. संपर्क आला असता तर दोघांच्याही जीवावर बेतलं असतं.

तर मंडळी, आता तुमचं मत येउद्या !! या समस्येवर उपाय आहे का ?

सबस्क्राईब करा

* indicates required