computer

बोभाटा बाजार गप्पा : अमेरिका आणि चीनच्या कलगीतुऱ्याचा भारताच्या शेअर बाजारावर काय परिणाम होणार आहे ?

सतत सहा सत्र (ट्रेडिंग सेशन)शेअरबाजार पडतो आहे. गुंतवणूकदारांच्या समभागांचे बाजार मूल्य ५ लाख कोटींनी घसरले आहे. सध्या बाजारात एकच चर्चा आहे ती म्हणजे आता पुढे काय ?

हा प्रश्न फक्त शेअर बाजारापुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगाला हा प्रश्न सध्या भेडसावतो आहे. या समस्येचे मूळ आहे अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील ट्रेड वॉर म्हणजे जागतिक बाजारपेठेतला कलगीतुरा ! हे नक्की काय प्रकरण आहे हे समजून घेण्यापूर्वी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर एक नजर टाकूया.

युरोप मध्ये सध्या आर्थिक मंदी आली आहे. ब्रेक्झीटच्या प्रकरणानंतर इंग्लंड मध्ये अजून पुढची आर्थिक वाटचाल काय असेल याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. पाकिस्तान ते सिरीया या पट्ट्यातील सगळेच देश अस्थिर राजकीय परिस्थिती आणि इसीसच्या हिंसाचाराने गांजलेले आहेत. समृद्ध तेल उत्पादक देश नेहमीच अमेरिकेच्या गटात होते आणि आताही आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड हे दोन्ही देश कुठल्याच भाऊगर्दीत नसतात. अशा परिस्थितीत क्रमांक एकची आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न फक्त ३ देश बघत आहेत. रशियाचे स्वप्न आर्थिक महासत्ता होण्याचे नाही, तर लष्करी महासत्ता होण्याचे आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्येच आर्थिक स्पर्धा आहे. हे दोन्ही देश परस्परांवर अवलंबून आहेत. त्यामुळे भांडले तरी त्यांची अवस्था “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना !” अशी आहे.

‘शी जिनपिंग’ कायमस्वरूपी निवडून आल्यामुळे चीन मध्ये राजकीय स्थैर्य आहे. या उलट डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता मावळतीला चालली आहे. ट्रम्प यांच्या कारकीर्दीत लष्करी चढायांवर खर्च वाढलेला नाही. त्यांच्या अमेरिकन राष्ट्रवादी धोरणामुळे अमेरिका-चीन या दोन देशांमध्ये ट्रेड-वॉर सुरु झालेलं आहे. आशिया खंडात चीनचे वाढत जाणारे प्राबल्य हे अमेरिकेच्या डोळ्यात खुपायला लागले आहे.

जागतिक बाजारपेठेतून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग चीन आंतरराष्ट्रीय राजकीय सत्ता वाढवण्यासाठी वापरते आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानला पाठींबा देऊन अमेरिकेचा प्रभाव कमी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. याखेरीज श्रीलंका, मालदीव आणि इतर छोट्यामोठ्या आफ्रिकन देशांना चीनने कर्जाच्या सापळ्यात अडकवून ठेवले आहे. परिणामी अमेरिकेला जे लष्करी तळ उभे करण्यात अपयश आले ते चीनने मिळवून दाखवले आहे.

या महत्त्वाकांक्षेचे पंख वेळीच छाटून टाकण्यासाठी अमेरिकेने चीनमधून येत असणाऱ्या व्यापारी मालावर जास्त कर आकारणी सुरु केली आहे. सुरुवातीला अशा कर आकारणीच्या फक्त धमक्या दिल्या जात होत्या, आता मात्र १० ते २५ टक्के कर आकारणी वाढवून या युद्धाला तोंड फुटले आहे. चीनने तोडीसतोड उत्तर देताना अमेरिकन मालावर जास्त कर लादायला सुरुवात केली आहे. यामध्ये चीनची राजकीय खेळी अशी आहे की जो माल अमेरिकेत रिपब्लिकन सरकार असलेल्या राज्यातून येतो आहे त्याच मालावर वाढत्या कराची अंमलबजावणी करायची.

थोडक्यात येती निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकू नये असा चीनचा प्रयत्न आहे. आता आपण मूळ प्रश्नाकडे वळूया. तो असा की भारतीय शेअर बाजाराचा या ट्रेड वॉरशी काय संबंध आहे ? या ट्रेड वॉरचे अप्रत्यक्ष परिणाम भारतावर होणार आहेत. याची करणं अशी :

१. भारतीय शेअर बाजार अमेरिकन FII च्या गुंतवणुकीवर चालते.

२. अनेक अमेरिकन कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक आहे.

३. या ट्रेड वॉर मध्ये डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत वाढत जाणार आहे. परिणामी भारताला क्रुड-ऑइलसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

शेअर बाजाराच्या दृष्टीने पडझडीचे दुसरे कारण म्हणजे सध्या भारतात चालू असलेल्या निवडणुकांचे निकाल नक्की कोणत्या बाजूने झुकणार आहे याची अजूनही कल्पना येत नाही.

या सोबत येणारा मान्सून किती पाऊस आणेल याबद्दल नक्की मार्गदर्शक निरीक्षणे अजून बाजाराच्या हाती आलेली नाहीत. या तिन्हीचा परिपाक म्हणजे शेअर बाजारात होणारी पडझड.

अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे ?

३ पैकी शेवटच्या दोन कारणांचा उलगडा येत्या ३ आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत हातातील ब्ल्यू-चीप शेअर विकण्याची घाई करू नका. म्युचुअल फंडाचे हफ्ते (SIP) आहे तसेच चालू ठेवावेत. नवीन खरेदी करू नये. ३० मे नंतर गुंतवणुकीचा निश्चित अंदाज करता येईल. तोपर्यंत धीर धरा. “सब्र का फल मिठा होता है !!”

सबस्क्राईब करा

* indicates required