बोभाटा बाजार गप्पा : सोमवारच्या छप्परफाड तेजीनंतर पुढे काय होणार ?

रविवारी संध्याकाळी एक्झिट पोलचा मारा सुरु झाला ते बघून रात्री झोपण्यापूर्वी कोणी कोणी कसा विचार केला असेल ते आधी बघू या !
सर्वसामान्य गुंतवणूकदार : उद्या सक्काळी शेअरबाजारात शेअर घ्यायचे ..२१-२२-२३-२४ चार दिवसात रग्गड नफा कमवायचा. "असा चान्स वारंवार येत नाही बरं का "!!
फंड मॅनेजर : "च्यायला, वाटत होतं त्याच्या उलंटच कायतरी होणारा आहे, महिना पण संपत आलाय " उघडी पडलेली झाकायला पायजे "

मार्केटमधले अॅक्टीव्ह ट्रेडर : उद्या सकाळी तेजी आली की अंदाज घेऊ आणि हातातला माल आधी विकून टाकू मग दोन दिवस वाट बघून करू या काय ते !!
यानंतर काय झालं ते तुम्ही बघीतलंच आहे नाही का ? एकाच दिवसात तूफान तेजी आली, सेन्सेक्स एका दिवसात १४२१ पॉइंट वर गेला. काल परत खाली आला, आज काय होईल ते हा लेख तुम्ही वाचत असाल तेव्हा बघा. (पण फार काही मोठी हलचल नसेल.)
थोडक्यात आलेली तेजी सतत टिकून राहत नाही असं चित्र आज मार्केट बंद होताना दिसेल. बोभाटाच्या बाजार गप्पांमध्ये अशा परिस्थितीत सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी काय करायला हवं आहे त्याचा आज आपण विचार करू या.
सोमवारी जी तेजी आली त्या तेजीला "नी जर्क " रिअॅक्शन म्हणतात. बातमी ऐकल्यावर अभावितपणे झालेली हालचाल म्हणजे "नी जर्क " रिअॅक्शन. या हालचालीमागे काही तर्कशास्त्र नसते. काही वेळा आलेल्या संधीची बस चुकू नये अशा विचाराने अशी "नी जर्क " रिअॅक्शन येते. भूतकाळात चुकलेली संधी आठवून अशा गुंतवणूकीचा निर्णय घेतला जातो. याला आपण 'मिसिंग बस सिंड्रोम असं म्हणू या. लक्षात घ्या जे तर्कात बसत नाही ते उपयोगात येत नाही. यासाठी बातमी मिळाल्यावर ताबडतोब अभावित निर्णय घेणे हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी टाळायलाच हवे.
असे असेल फंड मॅनेजरने केलेला विचार हा वेगळा कसा होता ते पण बघणे आवाश्यक आहे. त्यांच्या नजरेतून एक्झिटपोल येण्यापूर्वीचे त्यांचे निर्णय 'अतिरिक्त नकारात्मक' असे होते, त्या निर्णयाची दुरुस्ती म्हणून सकारात्मक हालचाल करणे आवश्यक होते. म्हणजेच सामान्य गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी अभावित निर्णय होता तर फंडमॅनेजरचा निर्णय जोखीम कमी करण्याचा होता.
आता तिसर्या क्रमांकावर असलेल्या ट्रेडरचा विचार आणि त्यांचे निर्णय यामागचे तर्कशास्त्र बघू या. ट्रेडरला अशी रातोरात आलेली तेजी म्हणजे खरेदीची संधी न वाटता विक्रीची संधी वाटते. त्यांच्यासाठी विक्री नेमकी कोणत्या भाव पातळीवर करायची इतकाच निर्णय घ्यायचा बाकी असतो.
आता मंगळवारी काय घडलं ते बघा. सोमवारी तेजी तर मंगळवारी मार्केट पडलं !! आज बुधवारी हा लेख लिहीत असताना पण मार्केट मिळमिळीतच आहे. मग नक्की काय आणि कसा निर्णय घ्यायचा ते आता बघू या !!
१. सामान्य गुंतवणूकदारांनी आता या घडीला घाई न करता खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकावा. आपन ट्रेडर किंवा फंड मॅनेजर नसून गुंतवणूकदार आहोत हेच लक्षात ठेवावे.
२. शुक्रवारी ज्या पातळीवर मार्केट बंद झाले ती पातळी आणि सोमवारी मार्केट सुरु झाले ती पातळी या मध्ये जे अंतर आहे त्याला 'गॅप' म्हणतात. ही गॅप नंतरच्या काळात भरूनच येते. याचा अर्थ असा की शुक्रवारची भाव पातळी किंवा त्या खालची भाव पातळी भविष्यात दिसणार आहेच.
३. प्रत्येक अतिरिक्त तेजी आणि अतिरिक्त मंदीच्या काळात एक दुरुस्तीची लाट येते ज्याला ट्रेडर्स रिमोर्स असे म्हणतात. या ट्रेडर्स रिमोर्स नंतरच खरेदीचा निर्णय घ्यावा.
४. उद्या सरकार कोणतेही आले तरी येणार्या सरकारचे स्थैर्य - तडजोडीचे प्रमाण लक्षात घेउन मंत्रीमंडळ स्थापनेनंतरच काय तो निर्णय घ्यावा.
५. सरकार बहुमतात असले तरी मान्सून त्यांच्या हातात नाही. जून नंतर तेजी सरकारच्या हातात नाही तर पावसाच्या हातात आहे
पुढच्या आठवड्यात भेटूच !!