computer

बोभाटा बाजार गप्पा : पेप्सीने गुजरातच्या शेतकऱ्यांविरुद्ध केस का केली आहे ? त्यांच्यातला राडा समजावून घ्या !!

बोभाटा-बाजार गप्पा हा एक प्रयोग गेले काही दिवस आम्ही केला. आता मात्र आम्ही या लेख मालिकेची पुनर्रचना करत आहोत. बाजारगप्पा फक्त शेअर बाजारापुरत्या मर्यादित न ठेवता यानंतरच्या लेखांमध्ये शेअर बाजारासोबत सामाजिक अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा समावेश करण्याचा आमचा मानस आहे. 

'लहेर पेप्सी' च्या माध्यमातून भारतीय बाजारात अमेरिकन कोला कंपन्या कशा परत आल्या हा इतिहास आहे. पण सध्या हे इतिहासाचं पान पेटत आहे. हे पेटतं पान आज गुजरातमधील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांशी कसं जोडलं गेलं आहे ते बाजारगप्पामधून आज आपण वाचू या!

आधी पाहू या अमेरिकन कंपन्या काम कशा करतात!! अमेरिकन कंपन्यांची व्यापाराची पद्धत बौद्धिक संपदेच्या म्हणून इंटलेक्चुअल प्रॉपर्टीच्या आणि स्वामीत्वाच्या नियमानुसार चालते. या नियमांच्या जोरावर अमेरिकन कंपन्या एखादी बाजारपेठ काबीज करून 'मोनोपोली' म्हणजे एकाधिकार स्थापित करतात. आता या सगळ्या प्रकरणाचा संबंध गुजरातमधल्या शेतकरी समस्येशी कसा आला ते बघू या!

तर मंडळी, १९९० साली पेप्सी भारतात आली तेव्हा लेजसाठी लागणाऱ्या बटाट्याचे वाण अमेरिकेतून इथे घेऊन आली. २००० साली WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन च्या करारावर भारताने सह्या केल्या. २००१ साली या करारातील मसुद्यानुसार Protection of Plant Varieties and Farmers’ Rights Act, 2001 (PPV&FRA). हा कायदा अंमलात आणला. या कायद्याचा वापर करून FC5 हे बटाट्याचे वाण फक्त पेप्सीच वापरू शकते. या बियाण्याचा वापर पेप्सीच्या बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनाच करता येतो आणि संपूर्ण उत्पादन फक्त पेप्सीच विकत घेते

आता गुजरातच्या समस्येकडे वळू या. गुजरातमध्ये अनेक शेतकरी मॅकडोनाल्डस कंपनीसाठी रसेट बटाटा आणि पेप्सीसाठी FC5 बटाट्याचे उत्पादन करतात. या शेतकऱ्यांनी हा बटाटा पेप्सीला न विकता इतर कंपन्यांना विकला असा पेप्सीचा आरोप आहे. त्यामुळे पेप्सीचे जे नुकसान झाले त्यासाठी करोडो रुपयांचा दावा पेप्सीने ठोकला आहे. हे सर्व शेतकरी चार-पाच एकर जमीन असणारे छोटे शेतकरी आहेत. हा खटला तूर्तास मागे घेऊन पेप्सीने वाद फक्त टाळला आहे. ही शेतकऱ्यांना दाखवलेली कायद्याच्या बडग्याची झलक होती. इंग्रजीत म्हणतात तसे हा 'टायगर बाय टेल' असा प्रकार आहे. आज दिसली ती वाघाची शेपूट आहे, पुढे सहा फूट वाघ अजून शिल्लक आहे.

पेप्सीचे टार्गेट मोठे शेतकरी आहेत जे पेप्सीचे बियाणे वापरून बटाटा पेप्सीला ना विकता वेफर्स बनवणाऱ्या इतर कंपन्यांना विकत आहेत. पेप्सीला भारतीय बाजारात पाय रोवण्यास वीस वर्षे लागली. गेल्या दोन वर्षांपासून पेप्सी नफ्यात आली आहे. या नफ्यात लेज वेफर्सचा हिस्सा सगळ्यात जास्त आहे. अशा परिस्थितीत सध्या पेप्सीने माघार घेतली असे दिसत असले तरी ही व्यापारी युद्धाची सुरुवात आहे.

 

आणखी वाचा :

मॅकडॉनाल्ड फ्रेंच फ्राइज कसे बनवते तुम्हाला माहित आहे का ?

सबस्क्राईब करा

* indicates required