computer

भारतात हे १० प्राणी तुम्हाला घरी पाळता येणार नाहीत, कारण तर जाणून घ्या !!

आपल्या आजूबाजूला पाळीव प्राणी पाळणारे अनेक लोक आपल्याला दिसत असतात. त्यांचे त्यांच्या पाळीव प्राण्यांवर असलेलं प्रेम बघून आपल्याला पण कधीकधी घरी एखादा प्राणी असावा असे वाटते. मग होतं काय, त्या प्राण्यांची शी-शू काढायच्या विचार मनात येतो आणि प्राणी पाळायच्या विचाराला तो पळवून लावतो. पण कधीकधी उलट होतं आणि आपण आता 'उद्याच कुत्रा-मांजर-पक्षी पाळायला आणायचाच" असं ठरवून टाकतो. 

प्राणी पाळणाऱ्यांमध्ये काही काही लोक तर इतके प्रेमळ असतात कि कुटुंबातील सदस्याप्रमाणं त्या पाळीव प्राण्यांना जीव लावतात. त्यांचं खाणं-पिणं अगदी प्रेमानं केलं जातं. फेसबुकवर तर परदेशी लोकांचे लै व्हिडिओ येतात, त्यात ते कधीकधी चक्क  जंगली प्राणी पाळताना दिसतात. त्यांचे व्हिडिओ बघून आपणही असं काहीतरी करावं असं लै लै वाटतं.  पण तुम्हांला  माहीत आहे का की  अनेक प्राणी पाळण्यावर भारतात बंदी आहे. जर तुम्ही पोपट किंवा कासव पाळण्याचा विचार करत असाल तर ते इतकं सोपं  तर जाऊच दे,  पण  धोकादायकसुद्धा आहे. हे प्राणी पाळण्यावर भारतात कायद्यानं बंदी आहे  ना राव!!  या प्राण्यांना पाळणं तुम्हाला सॉलीड महागात पडू शकतं आणि त्यामुळं तुम्हाला तुरुंगातसुद्धा जावं लागू शकतं.

आता तुम्ही म्हणाल कोणते प्राणी पाळण्यावर  बंदी आहे हे तर सांगा राव! सांगतो हो मंडळी..  तर तुमची उत्सुकता जास्त न ताणता आम्ही आपल्याला सांगतो की कुठले प्राणी पाळण्यावर भारतात बंदी आहे.

पक्षी

पक्षी खरेतर मुक्तपणे आकाशात उडतानाच सुंदर दिसतात. त्यांना कैदेत ठेवणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय असतो. पण तरीही आपल्यापैकी अनेकांना पक्षी आपल्या घरात असणं आकर्षक वाटतं. असतो कुणाला छंद. आपण काय करू शकतो त्याला?  तर मंडळी चिमणी, कावळा, पोपट, लाल मुनिया, जंगली मैना, मकाऊ म्हणजे रंगीबेरंगी पोपट, ककातू म्हणजे पांढऱ्या रंगाचा पोपट, अफ्रिकन राखाड़ी रंगाचा पोपट यांना जंगली प्रजातीविषयक कराराने परदेशी व्यापारापासून संरक्षित केलेले आहे. हे पक्षी तुम्ही घरात ठेऊ शकत नाही आणि ते सापडलेच, तर कुणाला विकूही शकत नाही. साधारणत: भारतीय आणि दुर्मिळ अशा प्रकारांत मोडणाऱ्या पक्ष्यांना पाळण्यावर भारतात बंदी आहे.

कासव

कासवाबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतात. कासव अत्यंत गरीब प्राणी असल्यानं आपल्या घरात असावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यात त्या फेंगशुई की कुठल्या फॅडामध्ये कासव घरात असले की धनवृद्धी होतं असं म्हणतात म्हणूनही लोकांना कासव घरात हवं असतं.  कासव आणि सशाची गोष्ट तर प्रत्येकाने ऐकली असते आणि कासव आवडत नाही असा माणूस तर शोधून सापडणार नाही. बरोबर ना? पण कासवाच्या काही प्रजाती पाळण्यावर भारतात बंदी आहे. अनेक लोकांना कासवाच्या वेगवेगळ्या प्रजातींमधील भेद ओळखता येत नाही, कारण ते बऱ्याचदा सारखे दिसतात.  पण मंडळी,  दिसतं तसं नसतं बरं.  एकसारखी दिसणारी कासवं पण वेगवेगळ्या जातींची असू शकतात.  लोक आपल्याला दुर्मिळ आणि ज्यांच्यावर बंदी आहे अशा जातींची कासवं आपल्याला विकू शकतात.  त्यामुळं बंदी असलेल्या कासवांच्या जाती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, इतकंच नाहीतर त्या ओळखताही आल्या पाहिजेत ना राव! 

 भारतीय स्टार कासव आणि लाल कानाचा कासव यासारख्या सरपटणाऱ्या कासवांच्या जाती अपार्टमेंटसारख्या ठिकाणी पाळू नयेत.  कारण त्यांची सर्व देखभाल करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे जिकिरीचं काम आहे आणि त्याचप्रमाणं ते बेकायदेशीरपण आहे.

सागरी प्राणी

आपल्याला परदेशातली अनेक लोकं सागरी प्राणी पाळतानाची उदाहरणं माहीत असतील. पण बऱ्याचवेळा सागरी प्राणी बाहेरच्या हवामानात जगणं कठीण असते. नियमितपणे सागरीपाण्याच्या सहवासात असल्यानेच ते जगू शकतात. आणि म्हणूनच अशाच काही सागरी प्राणी पाळण्यावर कायद्याने बंदी आहे. डॉल्फिन, व्हेल, पेंग्विन, पानमांजरी यांना पाळण्यावर वनजीवन संरक्षण कायदा १९७२अन्वये बंदी आहे. त्याचप्रमाणे संरक्षित सागरी जीवांना पाळणे आणि त्यांचा व्यापार करण्यावरसुध्दा बंदी आहे. 

साप

मित्रांनो भारत पुरातन काळापासुन गारुड़ी आणि मदाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपला जंगल परिसरात राहणारा आदिवासी भाऊ या सापांचा मित्र असतो. पण हेच साप अनेकांना हौस म्हणून म्हणा किंवा इतर कारणाने म्हणा,  घरात पाळण्याची लई हौस असते.  तर अशी ही हौस तुम्हाला महागात पडू शकते राव! कारण कुठल्याही प्रकारचा साप पाळण्यावर भारतात बंदी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या व्यापाराला समर्थन न करणं हे आपलं कर्तव्य आहे. व्यापाराच्या उद्देशाने जंगलातून आणत असताना अनेक सापांचा मध्येच मृत्यू होत असतो आणि म्हणूनच आपण त्यांच्या जगण्यावर अतिक्रमण केले नाही तर ते आपल्या जगण्यावर अतिक्रमण करणार नाहीत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

माकड

माकड म्हणजे हनुमानाचेच दुसरे रूप! आणि माकड हा मुळातच चंचल प्राणी म्हणून त्याच्याबद्दल आवड असणे पण स्वाभाविक.  त्यातल्या त्यात आपल्याला अनेक देवस्थानांवर नेहमी माकड उड्या मारताना दिसतात.  आपल्या आजूबाजूलादेखील काही माकडे बऱ्याचवेळा फिरतात दिसतात. माकडाची पुजासुद्धा आपल्याकडे मोठ्या  भक्तिभावाने केली जाते. पण माकडांच्या पाळण्यावर आणि त्यांना सर्कस इत्यादींमध्ये खेळण्यासाठी ट्रेनिंग देऊन शिकविण्यास PCA act १९६०च्या कलम २२अन्वये बंदी आहे.

तर मंडळी,  प्राणी पाळायची हौस असेल, तर आधी त्याबाबतचे कायदे जाणून घ्या. नाहीतर बिनाभाड्याच्या सरकारी खोलीत विनाकारण जावे लागेल. जेव्हा कधी तुम्ही पाळीव प्राणी पाळण्याचा विचार कराल,  तेव्हा तुम्हाला आमचा हा लेख निश्चितच उपयोगी पडेल. तुमच्या आसपास कुणी घरी एखादा प्राणी पाळायला आणायचा विचार करत असेल तर हा लेख त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि तुमच्या घरी एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याचा फोटो कमेंटबॉक्समध्ये आम्हांला नक्की  पाठवा.

सबस्क्राईब करा

* indicates required