हे तर खरोखरचे मनी प्लांट...

तुटणाऱ्या ताऱ्यांना बघून अनेकजण मनातली इच्छा बोलून ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करतात. काही लोक पापणीचा केस हातावर ठेवून मनातल्या मनात इच्छा बोलतात. काही लोक तर सरळ देवालाच साकडं घालतात. काही झालं तरी आपली इच्छा पूर्ण व्हावी हेच सगळ्यांना वाटत असतं. मंडळी,  आज आम्ही एका अशा झाडाबद्दल सांगणार आहोत ज्याने अनेकांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत, पण बदल्यात त्याने मोबदलादेखील घेतलाय राव.

वरील फोटोत दिसणारं झाड बघून चकित झालात ना? या झाडाला तर चक्क पैसे लागले आहेत. झाडावर नाण्यांचा पाऊस, ही काय भानगड आहे राव? चला जाणून घेऊ या...

स्रोत

ब्रिटनमधल्या स्कॉटिश हाईलॅंडच्या पीक झोन फॉरेस्टमध्ये हे झाड आहे. अशा प्रकारची ७ झाडं इथे आहेत. ही झाडं कापलेली आहेत आणि या झाडांच्या ओंडक्यांवर नाणी बसवलेली दिसत आहेत. असं म्हणतात की ही सगळी झाडं आणि नाणी चक्क १७०० वर्षं जुनी आहेत.

जेव्हा या झाडांचा शोध लागला तेव्हा अनेकजण बुचकळ्यात पडले. झाडांना कोणी नाणी का लावेल असा प्रश्न पडला, पण शोध घेतल्यावर यापाठचं कारण समोर आलं. असं म्हणतात की, मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाण्यांना अशा प्रकारे झाडांना लावण्याची पद्धत होती. आपली इच्छा काहीही असो, ती मनात जाहीर करायची आणि झाडाला या बदल्यात एक नाणं द्यायचं. असं करता करता ७ झाडे नाण्यांनी भरून गेली. म्हणजे अनेकांच्या इच्छा पूर्ण होत असाव्यात.

स्रोत

स्रोत

जर कोणी या नाण्यांना काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी समजूत त्या काळी होती. म्हणजे जर कोणी आजारपण जावं म्हणून इच्छा व्यक्त केली आणि नाणं अर्पण केलं, तर जो कोणी ते नाणं बाहेर काढेल त्याला तो आजार होणार. म्हणजे झाडाचे पैसे चोरायचे नाहीत असा दंडक होता.

मंडळी, इच्छा पूर्ण होत असो किंवा नसो.. पण आज ही सातही झाडं इतिहासाची साक्ष देत आहेत हे मान्य करायलाच हवं.

राव, जगातील हे पाहिलं झाड असेल जे एवढं मालामाल आहे. बरोबर ना ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required