computer

तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात आहेत या मौल्यवान प्राचीन वस्तू...शिवाजी महाराजांनीसुद्धा अर्पण केलाय हा दागिना !!

उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होते आहे. त्यानिमित्ताने आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्याबद्दल जाणून घेणार आहोत. हा खजिना मागील शेकडो वर्षात तयार झालाय. तुळजाभवानी देवीचा उल्लेख १३९८ सालच्या शिलालेखात पहिल्यांदा आढळतो. काही तज्ञांच्या मते तुळजाभवानीची मूर्ती ही त्याहीपेक्षा जुनी आहे. हे सांगण्याचं कारण असं की, तेव्हापासूनचे देवीला अर्पण केलेले दागिने आज या खजिन्यात आहेत. या खजिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी अर्पण केलेल्या अलंकाराचाही यात समावेश आहे.

मंडळी, तुळजाभवानीचा हा खजिना फक्त खजिना नसून शेकडो वर्ष जुना इतिहास आहे. त्याकाळात स्त्रिया कोणते अलंकार घालत, त्याकाळातली दागिने घडवण्याची पद्धत कशी होती याबद्दल तर माहिती मिळतेच शिवाय महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींच्या हस्ते अर्पण केलेले अलंकार मराठा साम्राज्याचा इतिहास सांगून जातात.

चला तर आई तुळजाभवानीच्या खजिन्यात काय काय आहे ते पाहूयात.

१. खजिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेली १०१ मोहरांची अडीच फूट व्यास असलेली दोन पदरी सोन्याच्या मोहरांची माळ आहे. ही माळ १५६० ग्रॅम वजनाची आहे.

२. छत्रपती संभाजी महाराजांनी अर्पण केलेले प्रत्येकी ३० किलो वजनाचे, दोन फूट उंच आणि अडीच फूट लांबीचे दोन चांदीचे सिंह आजही खजिन्यात पहावयास मिळतात.

३. तुळजाभवानी देवीच्या गुप्त खजिन्यात ७ पेट्या असून प्रत्येक पेटीत पुरातन दागिने ठेवलेले आहेत.

४. पहिल्या पेटीत तुळजाभवानीच्या वर्षभराच्या उत्सवाचे दागिने आहेत. यात ४१ नेत्रजोड व अनेक अलंकार असून पुष्कराज हिरा, माणिक, मोतीने सजलेला ५ शतकांपेक्षा जुना सोन्याचा मुकुट पण आहे.

५. तुळजाभवानी देवीच्या खजिन्याची शान वाढवणारा आणखी एक दागिना म्हणजे महादजी शिंदे यांच्या मुलींने अर्पण केलेली हिऱ्यांची वेणी. हा अप्रतिम दागिना ३५६ ग्रॅम वजनाचा असून एकमेवाद्वितीय दागिन्याचा अस्सल नमुना आहे.

६. याशिवाय देवीच्या खजिन्यात पाचू असलेली माणकांची अनेक पदकं, शिंपल्यांच्या आकाराचे मोती, २१ माणिक, २१ पाचू व माणकांची माळ यांचा समावेश आहे.

७. असं म्हणतात की खजिन्यातील एक दागिना हा चक्क एका फ्रांसच्या सेनापतीने अर्पण केला होता. सेनापती बुसीने याने १८३६ ग्रॅम वजनाची पाच पदरी माळ १५ व्या शतकात अर्पण केली होती.

८. शतकानुशतके महाराष्ट्रातील स्त्रिया घालत असत त्या सर्व प्रकारच्या दागिन्यांचा खच खजिन्यात आढळतो. स्त्रियांचा सात पदरी जवस माळ, ५३ हिऱ्यांची माळ इत्यादींचा यात समावेश होतो.

९. खजिन्यात १८५६ साली तयार केलेल्या अस्सल चांदीच्या सिंहासनाचा समावेश होतो.

मंडळी, आजच्या काळात या खजिन्याची किंमत ही अनेक कोटी रुपयांमध्ये आहे. पण इतिहासाचा हा ठेवा पैश्यांमध्ये मोजता येणार नाही हेच खरं.

सबस्क्राईब करा

* indicates required