computer

फिलिपाईन्सच्या आदिवासी जमातीने हार्ले-डेव्हिडसनला लाजवेल अशी चक्क 'लाकडी बाईक' तयार केली आहे !!

आज एकविसाव्या शतकात प्रवास करण्यासाठी अनेक प्रकारची वाहने उपलब्ध आहेत.  आपण अत्यंत निवांतपणे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत प्रवास करू शकतो. या सर्व वाहनांपैकी एक वाहन म्हणजे सायकल.  प्रदूषण विरहित प्रवास करण्यासाठी एकदम उत्तम पर्याय!! तसं सायकल चालवण्याचं प्रमाण आजकाल कमी होत चाललेल आहे,  मात्र फिलिपाईन्समध्ये एक आदिवासी जमात लाकडापासून सायकल तयार करते आणि तीही अगदी उत्तम. चला तर मग, जाणून घेऊयात या सायकल बनवणाऱ्या जमातीबद्दल....

फिलिपाईन्समधली " इगोलॉट गरोने" या नावाची एक आदिवासी जमात त्यांच्या वेगळ्या पद्धतीने सायकल बनवण्यासाठी आणि तीही  लाकडाची बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.  किंवा आपण असं म्हणू शकतो की ते लोक लाकूड कोरून एक प्रकारची सायकल तयार करतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून हे लोक अशा प्रकारची सायकल तयार करत आहेत आणि याच त्यांच्या कौशल्यामुळे जगप्रसिद्धही आहेत.

ही सायकल 100% लाकडापासून तयार केलेली असते. अगदी टायरपासून ते सीटपर्यंत सर्व काही लाकडापासून तयार केलेलं असतं. त्यातही सांगण्यासारखे एक वैशिष्ट्य म्हणजे एक सायकल दुसऱ्या सायकलपेक्षा आकाराने आणि दिसायला वेगळीच असते. या सायकलला शक्यतो घोडा, ड्रॅगन, सिंह असे प्राण्यांचे आकार दिले जातात. मात्र हिला कुठल्याही प्रकारचे ब्रेक तसेच पॅडल नसतात. त्यामुळे सायकल थांबवणं जोरात पळवणं दोन्ही शक्य नाही.  

मग ही सायकल चालवायची कशी असा प्रश्न  तुमच्या मनात आपसूकच आला असेल, तर ते सर्व तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे भाऊ!! ही सायकल चालवण्यासाठी ते त्यांचे पारंपरिक कपडे घालतात.  ही खासमखास सायकल तयार करण्यासाठी त्यांना अनेक महिने लागतात आणि अर्थातच या इगोलॉट गरोनेंना त्यांच्या या कौशल्याचा अभिमान आहे.

 

लेखक : रोहित लांडगे

सबस्क्राईब करा

* indicates required