computer

ह्या खऱ्या प्रेमकथेने हॉलीवूड आणि मराठीतील प्रसिद्ध सिनेमांना जन्म दिला...

आपण सर्वांनी आपल्या आजी आजोबांना असं म्हणताना नक्कीच ऐकलं असणार की, "आमच्या काळातली प्रेम प्रकरणंच वेगळी होती. एका व्यक्तीवर प्रेम केलं की आयुष्यभर  त्याच व्यक्तीवर प्रेम असायचे. नाहीतर आजकालची ही मुलं, आज एकीसोबत तर उद्या दुसरीसोबत. त्यात भर त्या टिंडरची."

पण जुनी माणसं काहीही म्हणू देत किंवा काळ कोणताही असो, प्रेम कधीच बदललेलं नाहीये. निखळ प्रेमाची कहाणी सांगणारा हॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनलेला. २००४ रोजी तो प्रदर्शित झालेला. त्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. खूप लोकांना रडवलं ह्या सिनेमाने. तो सिनेमा होता 50 First Dates. बऱ्याच लोकांना माहीत असेल हा सिनेमा. पण ह्या सिनेमाची कथा ही एका सत्य घटनेवर आधारित होती हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात कोण होते ते दोघे. त्या आधी सिनेमा बद्दल थोडं.

ह्या सिनेमामध्ये हेन्री नावाचा एक तरुण आहे.  तो लुसी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. काहीकाळ सोबत घालवल्यानंतर हेन्रीला समजतं की लुसीला मागच्या दिवसातलं  काहीही आठवत नाही. मग त्याला समजतं की एका मोठ्या अपघातामुळे तिला Short Term Memory Loss म्हणजेच अल्पकालीन स्मृतीभ्रंशाचा आजार असतो. या आजाराबद्दल थोडक्यात सांगायचं तर तिच्या मेंदूत नवीन आठवणी साठणार नाहीत. अगदी हेन्री कोण, ती तिथे कशी आली, तिचं नाव काय, हे सर्व तिला रोज नव्याने सांगावं लागायचं. रोज तिच्यात विश्वास निर्माण करावा लागायचा.

रोज सकाळी ती उठायची तेव्हा हेन्री आपल्या आवाजात रेकॉर्ड केलेली एक टेप लावायचा. त्यात तो तिला त्यांचे भेटणे, त्यांचे लग्न, त्यांची मूलं ह्या सर्व गोष्टींची आठवण करून द्यायचा. ह्या सर्व घटनांचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ टीव्ही वर लावून ठेवायचा. तेव्हा कुठे लुसीला हाच माझा नवरा आहे ह्याची खात्री पटायची. हेन्री देखील हे सर्व न चुकता रोज करायचा.

तर, आता वळूया यातील सत्य घटनेकडे.

इंग्लंडमधील स्पाल्डिंग ह्या शहरापासून हजारो मैल दूर असलेल्या लिंकनशायर ह्या देशात हे जोडपे राहते. खऱ्या आयुष्यातील लुसीचं नाव आहे मिशेल फिलपॉट्स. तर तिच्या नवऱ्याचं नाव आहे आयान. आयान हा असा नवरा आहे ज्याच्या सहनशीलतेला आणि प्रेमाला कोणतीही मर्यादा माहीत नाहीये.

1985 ला मिशेलचा पहिला अपघात झाला आणि त्यानंतरही आणखी एकदा १९९० साली दुसरा अपघात झाला. दोन्ही अपघातामध्ये तिच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यात १९९४ साली तिला anterograde amnesia ह्या आजाराचे निदान झाले. त्यामुळे १९९४ पर्यंत घडलेल्या घटनाच तिच्या लक्षात राहिल्या. १९९७ साली तिचे आयान सोबत लग्न झाले. तेव्हापासून आजपर्यंत आयान रोज सकाळी तिला त्यांची भेट, लग्न, प्रेमाची आठवण करून देतो.

आयान आणि मिशेल १९८५ मध्ये एकमेकांना भेटले. त्यामुळे आयानसोबतच्या थोड्या तरी आठवणी मिशेलकडे आहेत. त्यामुळे आयान देखील देवाचे आभार मानतो. कारण तिला आठवण करून द्यायला 1985 पासून घेतलेले बरेच फोटो त्यांच्याकडे होते.

मिशेलही स्वतःहून बरेच प्रयत्न करते. ती शेकडो पोस्ट-इट नोट्स वापरते. छोटी कामे विसरू नये म्हणून कॅलेंडरवर कामाची नोंद करून ठेवते. असं हे मिशेल आणि आयान जोडपं. एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या कमतरतेला सावरत सुखाचा संसार करत आहेत.

विजू माने ह्यांचा गोजिरी सिनेमा देखील ह्याच घटनेवर आधारित होता. मधुरा वेलणकर हिने मिशेलची भूमिका साकारली होती.

आपण बऱ्याच प्रकारचे सिनेमे बघतो. थ्रिलर, भयपट, गूढ, विनोदी, पण काहीही असो, लव्ह स्टोरीज पाहायला मात्र सर्वांना आवडतेच. आपण कोणावर तरी प्रेम करतो आणि आपल्यावरही कोणी प्रेम करतं ही जाणीवच मनुष्याला समृद्ध बनवत असते.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required