computer

ट्युलिप्स मेनिया- ट्युलिप्सने नेदरलँड्सच्या अर्थव्यवस्थेला कसा धक्का दिला याचा इतिहास!!

तुम्हाला जर कोणी म्हटलं की, "हा साधा दगड १ लाख रुपयांना विकत घे."  तर तुम्ही काय कराल? त्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण जर समजा त्याने म्हटलं, "हा दगड १ लाख रुपयांना विकत घे, उद्या जाऊन त्याची किंमत ५ लाख होणार आहे." तर तुम्ही थोडं थांबून तो दगड निरखून बघाल आणि थोडा विचार कराल.

या उदाहरणातली दगड ही फार सामान्य गोष्ट आहे. तो हिरा नव्हे की सोनं नव्हे. पण उद्या जाऊन त्याची किंमत ५ लाख होणार आहे या एका समजुतीवर त्याला किंमत आली आहे. या अशा समजुतीतून एखाद्या वस्तूची किंमत वाढणे आणि वाढतच राहणे याला फायनान्शियल बबल म्हणजे आर्थिक फुगा म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंमती वाढतच राहतात. हा फुगा एकेदिवशी फुटतो आणि बाजार कोसळतो.

आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती अशाच एका फायनान्शियल बबलची आहे. काही इतिहासकार त्याला जगातील पहिला फायनान्शियल बबल म्हणतात. 

या फायनान्शियल बबलच्या मध्यभागी आहे ट्युलिपचं फूल. इतिहासात याची नोंद ट्युलिप मेनिया नावाने आहे. मेनियाचा अर्थ होतो उन्माद, वेड, खूळ!! लोक वेड्यासारखी ट्युलिपची फुलं विकत घेत होते. ट्युलिप सुंदर दिसतं म्हणून नाही, तर उद्या जाऊन ट्युलिप विकून भरघोस कमाई होईल या लालसेने ट्युलिपबद्दल वेड पसरलं होतं. १६३४ च्या सुमारास या वेडाला सुरुवात झाली आणि १६३७ च्या अखेरीस लोक भानावर आले.

आजच्या लेखात ट्युलिप मेनियाची सुरुवात, त्याची करणे आणि अंत जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पार्श्वभूमी जाणून घेऊया.

१७ व्या शतकात नेदरलँड्सची अर्थव्यवस्था शिखरावर होती. जगातील सर्वात मजबूत आणि आघाडीची आर्थिक शक्ती म्हणून नेदरलँड्सकडे बघितलं जायचं. १६०० ते १७२० पर्यंत नेदरलँड्समध्ये सोन्याचे दिवस होते. याच काळात युरोपमध्ये नवीन गोष्टींचा शिरकाव होत होता. याच काळात बटाटा युरोपात आला. बटाट्यासोबत लाल आणि हिरवी मिरची आली, टोमॅटो, आर्टिचोक भाजी, इत्यादीही आले. यातच तुर्कस्थानातून आलेल्या ट्युलिपचा पण समावेश होता.

ट्युलिप फुलाचं मूळ हे आशिया खंडात आहे. ट्युलिप हे नावही फारसीमधल्या पगडीसाठी असलेल्या शब्दावरून तयार झालं आहे. साहजिकच ट्युलिप पहिल्यांदा युरोपमध्ये पोहोचलं तेव्हात्याची चर्चा झाली. हे फूल आहे हेच समजायला बराच काळ जावा लागला. काहींना ती भाजी वाटली. काहींनी तर खरोखर भाजी समजून तेल आणि व्हिनेगरसोबत ट्यूलिप्सभाजून खाल्ले. 

काही काळाने युरोपियन्सना ट्युलिप हे फूल असल्याचं समजलं. ट्युलिप हे ‘इम्पोर्टेड’ असल्याने ते स्टेट्स सिम्बॉल व्हायला वेळ लागला नाही. नेदरलँड्समध्ये ट्युलिप पोचल्यानंतर नेदरलँड्सच्या नवश्रीमंत लोकांनी ट्युलिप्स विकत घ्यायला सुरुवात केली आणि नेदरलँड्सच्या श्रीमंत अर्थव्यवस्थेत नवीन वेड तयार झालं.

"तुमच्याकडे ट्युलिप नसेल तर तुमची आवड वाईट आहे", असा समज त्याकाळी नेदरलँड्समध्ये पसरला होता. लोक एकमेकांचं अनुकरण करत होते. शेजाऱ्याकडे ट्युलिप आहे तर माझ्याही घरात असायला हवं अशी समजूत पसरली होती. लोक भरमसाठ वेगाने ट्युलिप विकत घेत होते. यात भर पडली ट्युलिपला लागलेल्या एका विशिष्ट रोगाने. या रोगाने ट्युलीच्या दिसण्यात बदल घडून आले. एकाच रंगात दिसणारं ट्युलिप आता वेगळ्या डिझाईनमध्ये मिळू लागलं. या नवीन प्रकाराने मागणीत आणखी भर पडली.

कालांतराने ट्युलिपचं वेड श्रीमंतांमधून सामान्य लोकांमध्ये पसरलं. एकूणच अख्खा डच (नेदरलँड्सचे लोक) समाज ट्युलिपच्या वेडाने पछाडला गेला होता. ट्युलिपची मागणी वाढत होती तसा त्यात फायदा दिसू लागला होता. शेअर्समध्ये ट्रेडिंग करतात तसं आज ट्युलिप घेऊ आणि उद्या विकू या इच्छेने लोक ट्युलिप विकत घेत होते. आधीच श्रीमंतीचं प्रतिक असलेलं ट्युलिप आता गुंतवणुकीचं नवीन साधन झालं होतं. इतिहासातला एक उल्लेख सांगतो की एका व्यक्तीने आपली १२ एकर जागा विकून दोन ट्युलिप्स विकत घेतले होते. अशा तऱ्हेने लोक आपल्याकडच्या महागड्या वस्तू, जमीन घर विकून ट्युलिप्स विकत घेत होते.

एक ट्युलिप किती किमतीला मिळत होतं? इतिहासातील नोंदीप्रमाणे ट्युलिपची सर्वात मोठी किंमत ५२०० गिल्डर्स होती. आजच्या काळात ५२०० गिल्डर्स म्हणजे जवळजवळ २,१३,००० रुपये. ही किंमत रोज कमी जास्त व्हायची. एक वेळ अशी आली की ट्युलिपचा बाजार स्टॉक मार्केट मध्ये आला. 

याचा अर्थ ट्युलीप्स फक्त महागच होते असं नाही. ट्युलीप्सच्या दिसण्यावरून आणि दुर्मिळ प्रजातीचं परिमाण लावून ही किंमत ठरायची. काही ट्युलीप्स अगदी स्वस्तातही मिळत होते. पण म्हणतात ना, जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठा फायदा. लोकांनी उद्याच्या फायद्यासाठी जास्तीत जास्त पैसा गुंतवला, 

ट्युलिपचा फुगा कसा फुटला?

लोकांचा असा गैरसमज झाला होता की ट्युलिप्सच्या किंमती कधीच कमी होणार नाहीत. म्हणजे नुकसान कधीच होणार नाही. १६३७ च्या सुमारास ट्युलिपच्या किमती घसरू लागल्या. एखाद्या वस्तूची किंमत तेव्हाच वाढत जाते जेव्हा ती विकत घेण्यासाठी ग्राहक असतो. ट्युलिप्सच्या किंमती एवढया फुगून बसल्या की एका मर्यादेनंतर त्यांना घ्यायला ग्राहकच नव्हते. तिथूनच ट्युलीप्सचा फुगा फुटायला सुरुवात झाली. फुगा फुटतो तेव्हा आवाजही येतो. ट्युलिपने निर्माण केलेला फुगा असाच आवाज करत फुटला.

काही वर्षांपर्यंत असा समज होता की ट्युलिप्स मेनियाने नेदरलँड्सची अर्थव्यवस्था कोसळली. पण ते चूक आहे. नेदरलँड्सची अर्थव्यवस्था त्यानंतरही अनेक वर्ष समृद्धच राहिली. पण नुकसान मात्र झालं यात वाद नाही. विश्वासावर चालणाऱ्या खरेदीविक्रीवर मोठा परिणाम झाला. उद्या ट्युलीप्स विकत घेऊ असा शब्द दिलेल्या अनेकांनी ट्युलिप विकत घेणं परवडणार नाही म्हणून हात वर केले. कारण काय होतं? तर किंमती भरमसाठ वाढल्या होत्या. नेदरलँड्सच्या सरकारने फार काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली. सरकारने जाहीर केलं की भविष्यात ट्युलिप्स खरेदी करण्यासाठी कंत्राट खरेदी केलेले लोक १० टक्के फी भरून त्यांचा करार रद्द करू शकतात.

ट्युलिप्स मेनिया फक्त नेदरलँड्सपुरता मर्यादित नव्हता. संबंध युरोपमध्ये थोड्याफार फरकाने ट्युलिप्स मेनिया आला आणि गेला. नेदरलँड्सची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी असल्याने नेदरलँड्समधला ट्युलिप्स मेनिया दंतकथा बनून राहिला. दंतकथेत काल्पनिक घटनाही मिसळल्या जातात. नेदरलँड्सच्या ट्युलिप्स मेनियावर कथा कादंबऱ्या रचल्या गेल्या. या कथेतील घटनाक्रम आणि खरोखर घडलेला इतिहास यात गफलत होऊन एक नवीनच दंतकथा तयार झाली. 

एक मात्र खरं की ट्युलिप्स मेनिया होता आणि त्याने  जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला थोडा का होईना,पण धक्का दिला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required