computer

व्हॉट्सअॅपला संरक्षण देणारं 'टू स्टेप व्हेरिफिकेशन' आहे तरी काय?

कोणतं मेसेजिंग अॅप सुरक्षित आहे? उत्तर कोणाकडेच नाही. फेसबुक पाठोपाठ व्हॉट्सअॅपही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय. १२० भारतीयांच्या  व्हॉट्सअॅपवर अज्ञातांनी हल्ला केल्याची बातमी नुकतीच आली होती. सर्वसामान्य माणसांचं तर सोडा पण अमेझॉनचे मालक आणि जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमधले एक जेफ बेझॉस यांचा मोबाईल काही दिवसापूर्वीच हॅक झाला होता.  जेफ बेझॉस सारख्या मोठ्या व्यक्तीचा मोबाईल जर हॅक होऊ शकतो तर आपल्या सर्व सामान्य माणसाचं काय?

तर, इतर मेसेजिंग अॅप्सचं जाउद्या पण व्हॉट्सअॅप संरक्षण आता शक्य आहे.  कसं ते आजच्या लेखात जाऊन घेऊया.

याला म्हणतात टू स्टेप व्हेरिफिकेशन. आधी टू स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे ते समजून घेऊया.

टू स्टेप व्हेरिफिकेशन हे व्हॉट्सअॅपवर २०१७ पासून उपलब्ध आहे, पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. टू स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला एक पासवर्ड निश्चित करता येतो. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअॅप रिसेटिंग करता किंवा नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु करता तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड विचारला जातो. पासवर्ड वेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला नव्याने व्हॉट्सअॅप सुरु करता येत नाही. याचा उपयोग असा की समजा तुमचा सीमकार्ड चोरीला गेला आणि त्याचा उपयोग करून दुसऱ्या मोबाईलवर तुमच्या नावाने व्हॉट्सअॅप सेट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते शक्य होणार नाही. कारण त्याच्याकडे पासवर्ड नसेल.

टू स्टेप व्हेरिफिकेशन कसं कराल?

टू स्टेप व्हेरिफिकेशनची सुरुवात करण्यासाठी व्हॉट्सअॅपवर दिसणाऱ्या उजव्या कोपऱ्यातल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. त्यानंतर या क्रमाने क्लिक करत जा.

Settings > Account > Two-step verification >Settings > Enable.

या स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ६ अंकी पासवर्ड विचारला जाईल. हा पासवर्ड २ वेळा लिहून झाला की तुम्हाला ईमेल आयडी विचारला जाईल. ईमेल आयडी यासाठी की तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरलात तर या ईमेलद्वारे तुम्हाला अकाऊंट सुरु करता येईल. जर तुमच्याकडे ईमेल आयडी नसेल तरी हरकत नाही. हा एक पर्याय मात्र आहे. पण जर तुम्ही ईमेल आयडी देत असाल तर तो बरोबर आहे की नाही हे तपासण्याची  जबाबदारी तुमच्यावरच आहे. कारण व्हॉट्सअॅपकडून हा ईमेल आयडी वेरीफाय करण्यात येत नाही.

पासवर्ड आणि ईमेल आयडीची कटकट नको असेल तर तुम्ही फिंगरप्रिंटद्वारेही तुमचं व्हॉट्सअॅप सुरक्षित करू शकता. यासाठी उजव्या बाजूच्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा आणि खालील स्टेप्स करून पाहा.

Settings > Account > Privacy > Fingerprint lock 

तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट किती वेळात व्हॉट्सअॅप लॉक झालं पाहिजे यासाठी तुम्ही वेळही ठरवू शकता. लगेचच (Immediately), १ मिनिटांनी आणि ३० मिनिटांनी असे तीन पर्याय दिले जातात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडू शकता.

तर, या दोन प्रकारे तुम्हाला तुमचा व्हॉट्सअॅप सुरक्षित करता येईल. मोबाईल  हरवला, किंवा चोरीला गेला किंवा कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं अकाऊंट सुरक्षित राहील. चला तर लगेच  करून पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required