computer

१९९० ची रिंकू पाटील केस आठवते का ? मुलींना जाळण्याचा नराधम पॅटर्न इथे सुरू झाला!!

हिंगणघाटची चिता आता विझली असेल. उरलेली राख काही दिवसांतच उडून जाईल. मूक मोर्चे आणि मेणबत्या काढणारे पुन्हा सगळे काही विसरून आपल्या कामाला लागतील. पुन्हा एकदा असे काही होईपर्यंत टीव्हीवाले गप्प बसतील. एखादा निर्माता यावर चित्रपट बनवून चार बक्षिसे पटकावून जाईल.  हे असे वर्षानुवर्षे होत आले आहे आणि असेच होत राहील. सामाजिक षंढत्व आहे तसेच राहील. मर्ढेकरांनी जे कवितेत लिहिले होते तसेच काही होत राहील. आज सर्वसामान्य जनतेच्या मनात अशीच भावना असेल. 

आजच्या या लेखात आम्हीही असेच का म्हणतो आहे हे समजण्यासाठी १९९० सालापर्यंत मागे जावे लागेल. काय झाले होते १९९० साली??

३० मार्च १९९०. उल्हासनगरच्या एका शाळेत, एसएससीच्या परीक्षा केंद्रात विद्यार्थी पेपर लिहित होते. अचानक मोठमोठ्या आवाजात ओरडत चार-पाच तरुण हातात तलवारी घेऊन परीक्षा केंद्रात घुसले. ते शोधत असलेली व्यक्ती त्यांना एका वर्गात दिसल्यावर त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून वर्गातल्या मुलामुलींना बाहेर हाकलून दिले. अपवाद फक्त एका मुलीचा! तिला वर्ग सोडून जाता आले नाही कारण ती मुलगीच त्यांचे सावज होती. वर्गाचा ताबा घेतल्यावर दोन गुंड दारावर पहारा देत उभे राहिले. केंद्रातील तैनात पोलीस कुठे गेले हे कोणालाच कळले नाही.

पुढे काय घडले ?

यापुढे जे घडले ते माणुसकीला काळिमा लावणारे होते. त्या गुंडांचे सावज होते एक सोळा वर्षांची, कोवळ्या वयाची मुलगी रिंकू पाटील! वर्गात घुसलेल्या गुंडाचे नाव होते हरेश पटेल! हरेश पटेलच्या हातात पेट्रोलचा कॅन होता. समोर काय प्रसंग बेतला आहे हे लक्षात आल्यावर रिंकूने किंचाळायला सुरुवात केली. पण त्या केंद्रातील एकही व्यक्ती पुढे येण्यास धजावली नाही. अंगात सैतान खवळलेल्या हरेशने रिंकूवर पेट्रोलचा कॅन ओतून काडी लावली आणि काही मिनिटांतच आक्रोश करणारी रिंकू जागीच राख झाली. हरेश पटेल आपल्या गुंडांसोबत बाहेर पडला तेव्हा लोकांनी वर्गाकडे धाव घेतली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता.  रिंकू जळून खाक झाली होती.

(प्रातिनिधिक फोटो)

हरेश पटेलने असे का केले?हरेश पटेल रिंकूच्या (संगीता पाटील) मागे अनेक दिवस होता. माझ्याशी लग्न कर असा त्याचा आग्रह होता. शाळेत असलेल्या रिंकूने त्याला नकार दिल्यावर तो नकार पचवण्याची मानसिक कुवत नसलेला हरेश दुखावला, त्याचा पुरुषी अहंकार दुखावला. सूडाच्या सैतानी भावनेने पछाडला. जर तू माझी होणार नसशील तर तू कोणाचीच होऊ शकणार नाही या भावनेतून मुळात गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या हरेश पटेलने रिंकूला संपवण्याचा बेत आखला. 
 

नंतर काय झाले?

काय होणार? आज जे हिंगणघाटला घडले तेच! गर्दी गोळा झाली, पोलीस नेहमीप्रमाणे गर्दीला लाठ्यांनी हुसकत घटनास्थळी पोहचले. रिंकूचे पालक शाळेत पोहचले, पण त्यांना बाहेरच रोखून धरण्यात आले. शेवटी संध्याकाळी पालकांना रिंकू जागेवरच गेल्याची कबुली पोलिसांनी दिली. तिचे कलेवर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात रिंकू पाटील ही मथळ्याची बातमी झाली. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली.

.... पण हरेश पटेल कुठे गेला?

हरेश आणि त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले . दोन दिवसानंतर हरेश पटेलने कल्याण स्टेशनच्या रुळावर गाडीखाली आत्महत्या केली. त्याचे प्रेत मिळाले. पोलिसांच्या दृष्टीने प्रकरण संपल्यात जमा झाले. काही दिवसांनंतर त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

हे प्रकरण इथेच संपले का?

फक्त रिंकूचा विचार केला तर हो, संपले. कारण निरपराध स्त्रिया पुरुषांच्या इगोला बळी त्या अगोदरही पडल्याची अनेक उदाहरणे इतिहासात असतील. पण चार गुंड हाताशी धरून सार्वजनिक ठिकाणी स्त्रीला जाळण्याचा नवा 'पॅटर्न' या प्रकरणामुळे जन्माला आला. त्यानंतर ऍसिड हल्ल्याचा 'पॅटर्न' जन्माला आला.

सूड, क्रौर्य आणि हत्येचा ट्रेंड जो त्यावेळी जन्माला तो आजपर्यंत थांबलेला नाही. आज हिंगणघाटच्या जळीतानंतर जे रोज आपण टीव्हीवर बघतोय तेच तेव्हाही झाले. काही दिवसांतच जनता सर्व काही विसरली.

या प्रकरणात काही विवाद उत्पन झाले.. 

१. काहीजणांच्या मते हरेश पटेलने त्या सर्व प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. त्या व्हिडिओच्या कॉपीज् उल्हासनगरमध्ये काही हजारांत विकल्या गेल्या.
२. रेल्वे रुळावर सापडलेले प्रेत हरेश पटेलचे नव्हतेच असाही एक प्रवाद होता.
३. रिंकूने आणि हरेशचे प्रेम प्रकरण होते आणि काही काळाने रिंकूने त्याला झिडकारले असाही प्रचार करण्यात आला.
४. या प्रकरणाचे काही पुसट उल्लेख वगळता इंटरनेटवर आजही काहीच संदर्भ सापडत नाही. एरवी छोट्या-मोठ्या प्रकरणावर विकी पेज असलेल्या विकिपीडियावर कुठंही रिंकुचा उल्लेख नाही. इंडिया कानून किंवा केसमाईनसारख्या गाजलेल्या संकेतस्थळावर पण ही केस वाचायला मिळत नाही. कुठेही या प्रकरणाचा मागमूस नाही. असे का याचे उत्तर नाही. जर तुम्ही काही शोधू शकलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

(रिंकू पाटील)

५. एक जमेची बाजू अशी की 'चित्रलेखा' ने त्याकाळी एक विशेष लेख प्रसिद्ध केला होता. त्या लेखाचा उल्लेख यावर्षीच्या स्पेशल इश्यूत आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. परवानगी मिळाल्यास तो लेख बोभाटावर उपलब्ध करुन देऊ.
६. श्रीदीपलक्ष्मीच्या अंकात १४ पानांचा लेख उपलब्ध आहे. तो काही दिवसांत उपलब्ध असेल.
७. आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे रिंकू पाटील प्रकरणावर आधारित ' निष्पाप' नावाचा एक चित्रपट त्यानंतर येऊन गेला.

झिडकारलेल्या प्रेमप्रकरणाच्या आणि त्यामुळे घेतल्या गेलेल्या सूडांच्या अनेक कथा त्यानंतर घडल्या आहेत आणि मिडीयातही आल्या आहेत. पण आपण कधी सुधारणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे  ही खेदाची गोष्ट आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required