computer

हे गाव वर्षातून एकदाच पाण्याबाहेर येतं ? काय आहे या गावाचं रहस्य ?

गोवा म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र, दारु आणि  कमी कपड्यांतल्या फिरंगी बायका!! गोव्याचा समुद्र किनारा म्हणजे भारतातला सगळ्यात जास्त लोकप्रिय सर्वात जास्त समुद्र किनारा असेल. अर्थात त्याचे कारण म्हणजे गोव्यात प्रत्येक गोष्टीसाठी असलेले स्वातंत्र्य आहे!! गोवा आपल्या महाराष्ट्राला इतका जवळ आहे की तुम्ही आतापर्यंत तिथे किमान एकदा जाऊन आला असाल आणि गेला नसाल तर हजारो वेळा मनोमन तिकडे जाण्याचे प्लॅन्स तर नक्कीच केले असतील. पण जे गोवा फिरून आलेत आणि ज्यांचे फिरायचे राहिले आहे  अशा तमाम जनतेला माहित नसेल अशी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

मंडळी, गोव्यात असे एक गांव आहे जे वर्षातून फक्त एकदा दिसते. आश्चर्य वाटतंय ना? पण हे खरे आहे राव!! बीबीसीच्या जर्नलिस्ट सुप्रिया वोरा यांनी हे शोधून काढलंय.  गोव्यातले कुर्डी नावाचे खेडे वर्षातील अकरा महिने पाण्याखाली राहते. मंडळी, तुम्ही म्हणाल जर एकच महिने ते गांव पाण्याच्या वर असते, तर तिथले गावकरी अकरा महिने काय करतात? तर मित्रांनो, त्या गावातले लोक दुसऱ्या गावी जाऊन राहतात.  पण जेव्हा गांव पाण्याखालून वरती येते, तेव्हा ते सगळे महिनाभर एकत्र येऊन जल्लोष करतात.

हे टुमदार गाव सह्याद्रीच्या दोन टेकड्यांदरम्यान वसले आहे. साळवली नावाची नदी या गावातून जाते. पण १९८६ सालच्या एका घटनेमुळे त्या गावातले सगळे बदलूनच गेले. १९८६मध्ये तिथे गोव्यातले पहिले धरण बांधण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे ते गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले. पण दरवर्षी मे महिन्यात पाणी कमी झाले की ते गाव पाण्याच्या वर दिसायला लागते. पण११ महिने पाण्याखाली राहिल्यामुळे गावाचे रूप पूर्ण भकास झालेले दिसते. घराचे अवषेश, पडलेली मंदिरे,  अस्ताव्यस्त झालेले घराचे सामान असं हे गाव दिसते.

हे गाव आधी सुजलाम सुफलाम समजले जायचे राव!! ३ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात लोक शेती करून आनंदाने राहत होते. एवढेच नाही मंडळी, या गावात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे आनंदाने एकमेकांसोबत राहत होते. या गावात मंदिर, मस्जिद आणि चर्चसुद्धा होते. एकाप्रकारे भारताच्या संस्कृतीचे दर्शन इथे व्हायचे.

 

सगळं काही व्यवस्थित चालू होते. १९६१ साली गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त झाल्यावर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी या गावाला भेट दिली. त्यांनी या गावात धरण बांधण्याची घोषणा केली आणि या गावाचे नशीब फुटले राव!! मंडळी, या धरणामुळे गोव्याचा मोठा फायदा झाला तरी त्या गावाचे मात्र  खूप नुकसान झाले आहे.

बीबीसीच्या रिपोर्टरला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्या गावाचे गावकरी कुर्डीकर म्हणतात कि जरी आमचे खूप नुकसान झाले असले तरी आम्ही गोव्याच्या भल्यासाठी तो त्याग आनंदाने केला आहे. कुर्डीकर आणि इतर गावकऱ्यांना दुसऱ्या गावात वसवण्यात आले, त्याबदल्यात त्यांना जमीन आणि पैसे देण्यात आले. साळवली सिंचन प्रकल्प नावाचा हा प्रकल्प गोव्याला पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी पाणी पुरवत असतो. मंडळी, या धरणातून तब्बल ४ कोटी लिटर पाण्याचा सप्लाय करण्यात येतो.

(साळवली सिंचन)

मे महिन्यात जेव्हा कुर्डी पाण्याच्या वर येते तेव्हा तो गावकऱ्यांसाठी सण असतो. इकडेतिकडे विखुरले गेलेले सगळे गावकरी एकत्र येतात.  ख्रिश्चन लोक चर्चमध्ये येऊन त्यांची प्रार्थना करतात तर हिंदू लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात.

 

मग, एखाद्या वर्षी मे मध्ये गोव्याला गेलात तर गुगल मॅप्सवर कुर्डी शोधून गावाला नक्की भेट द्या, गावकऱ्यांशी बोला आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा..