युनिसेफ फोटो ऑफ द इयर २०२१: दोन भारतीयांनी मिळवलाय पहिला आणि दुसरा पुरस्कार
युनिसेफकडून दरवर्षी फोटो ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा घेतली जात असते. यंदा या स्पर्धेचे २२ वे वर्ष आहे. आपल्या कॅमेऱ्यातून त्या त्या वर्षी इतरांपेक्षा वेगळे फोटो काढणारे जगभरातील भन्नाट असे फोटोग्राफर या स्पर्धेत भाग घेत असतात.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जगभरात नावाजलेल्या गेलेल्या फोटोग्राफी एक्सपर्ट्सकडून शिफारस गेलेली असली पाहिजे. त्यानंतर एक स्वतंत्र जज या विजेत्यांची नावे निश्चित करत असतो. एखादी परिस्थिती इतरांपेक्षा प्रभावीपणे आपल्या फोटोतून मांडण्याची कला ज्यांना अवगत असते ते या स्पर्धेत बाजी मारतात.
जगातील प्रत्येक देशातील एकाहून एक भन्नाट फोटोग्राफर या स्पर्धेत भाग घेत असल्याने या स्पर्धेत विजेते होणे हे तसे फोटोग्राफर्सचे स्वप्न असते. यंदाची स्पर्धा मात्र भारतासाठी डबल आनंद देणारी आहे. कारण यंदा पहिला आणि दुसरा असे दोन्ही क्रमांक भारतीय फोटोग्राफर्सना मिळाले आहेत.
१) बुडती आशा
गंगा नदीच्या किनाऱ्यावर जेव्हा वादळ येतात तेव्हा नदीकिनारी असणाऱ्या गावांची होणारी वाताहत हा मोठा प्रश्न आहे. पुरामुळे १२ वर्षीय पल्लवी पांडुया आणि तिच्या कुटुंबाला नामखाना बेटावर स्थलांतरित व्हावे लागले कारण त्यांची चहाची दुकान पुरात वाहून गेली. त्यावेळी खिन्न नजरेने बघणारी पल्लवीचा फोटो सुप्रतिम भट्टाचार्जी यांनी गेल्या वर्षी टिपला होता.
भारत आणि बांगलादेश सीमेजवळील सुंदरबन नावाचा पाणथळ प्रदेश हा अनेकांसाठी आयुष्यभराचे दुःख देणारा ठरतो. कारण पुरामुळे कधीकधी गावेच्या गावे वाहून जातात. मुलांचे शाळेत जाण्याचे रस्ते सुद्धा पाण्याने भरलेले असतात. पाणथळ भागातील वृक्षतोड आणि समुद्रसपाटीची वाढणारी उंची यामुळे किनारी भागातील लोकांचे जनजीवन धोक्यात येत आहे. युनिसेफनुसार दरवर्षी आशिया आणि आफ्रिका खंडात ५० कोटींपेक्षा जास्त बालके हे पूरग्रस्त भागात वाढत आहेत.
२) कोरोनावर मिळवलेला छोटा पण महत्वाचा विजय
देशात लॉकडाऊन लागल्याने ऑनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले. एकीकडे एक वर्ग होता ज्याला मोबाईल इंटरनेट सहज उपलब्ध होते तर दुसरा वर्ग हा मोबाईल आणि इंटरनेट पासून कोसो दूर असलेला आहे. अशावेळी या लोकांना शिक्षणापासून वंचित राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण काही शिक्षकानी थेट शाळांच्या भिंतीवर अभ्यासक्रम कोरला.
दीप नारायण नायक यांनी असाच प्रयोग करत आपल्या गावातील भिंती अभ्यासक्रमाने भरून टाकल्या. स्थानिक मुलांना यामुळे अभ्यास करणे शक्य झाले. सौरव दास यांनी हा सिन कॅमेऱ्यात कैद केला. या फोटोला युनिसेफने दुसरा क्रमांक देत जगभरातील लहान मुलांच्या शिक्षणाचे महत्व विशद केले आहे. जगभर आजही १.६ अब्ज मुले शिक्षणापासून वंचित आहेत.
३) उघड्या जखमा
मुले दिव्यांग असल्यावर पालकांना जसा त्रास होतो तसेच उलट देखील घडते. जेव्हा बापाला एक हात नसेल तेव्हा काय होते याचा अनुभव एका फोटोतून जगापुढे मांडण्याची किमया इराकचे फोटोग्राफर युनिस मोहम्मद यांनी साधली आहे.
आयसिस सोबत लढताना अनेकांना दिव्यांगत्व आले. अशावेळी त्यांचे मुले ज्या पद्धतीने आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले ते खरोखर वाखाणण्याजोगे होते. नैराश्याने ग्रासलेल्या वातावरणात या मुलांच्या चेहऱ्यावरील तेज लोकांना प्रेरणा देत असते.
या तीन फोटोंबरोबर ९ फोटोंच्या सिरीज देखील विजेतेपदाचे मानकरी ठरले आहेत.




