computer

बी. आर. चोप्रांच्या महाभारताविषयी माहित नसलेल्या खास आणि खमंग ‌गोष्टी... नक्की वाचा!

१९८८ मध्ये ‌आलेली बी. आर. चोप्रा‌ंची 'महाभारत' मालिका आपल्यापैकी अनेकांनी त्याकाळी अगदी आवडीने पाहिली असेल मंडळी. रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'रामायण' मालिकेनंतर बी. आर. चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा या दोघांनी मिळून महाभारतावर आधारीत ही टिव्ही सिरीयल‌ बनवली आणि तीही 'रामायण'इतकीच लोकांना आवडली. आता ‌लॉकडाऊनच्या काळात दुरदर्शन, स्टार भारत आणि कलर्स या वाहिन्या परत एकदा‌ 'महाभारत'चं‌ पुन:प्रक्षेपण करत आहेत. आज‌ आपण जाणून घेऊया या 'महाभारत' टिव्ही सिरियलविषयी काही ‌खास आणि आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी...

बी. आर. चोप्रांना महाभारताच्या युद्धाचा सीन मुंबईमध्ये चित्रित करायचा होता. पण मुंबईत त्यांना विजेचे खांब नसलेलं एकही मोकळं मैदान मिळालं‌ नाही. त्यामुळे त्यांना हे शुटिंग जयपूर जवळच्या एका गावात हलवावं लागलं. सगळीकडे पसरलेल्या या विजेच्या खांबांनी अगदी महाभारतातल्या पराक्रमी वीरांनाही आव्हान दिलेलं दिसतंय!

भलीमोठी तगडी स्टारकास्ट असली तरी युध्दाच्या भव्यदिव्य सीनसाठी निर्मात्यांना भरपूर कलाकारांची गरज‌ होती. पण प्रचंड प्रमाणात शुटिंग पहायला येणा-या स्थानिक लोकांनी हा प्रश्न मिटवला. त्यांनी युध्दाच्या दृश्यामध्ये सैनिक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली, आणि तेही अगदी एक रूपयाही मानधन न घेता!

द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. आजच्या काळात द्रौपदीचं न संपणारं अखंड वस्त्र व्हिज्युअल इफेक्ट्सच्या साहाय्यानं दाखवणं सहज शक्य आहे. पण तो काळ होता १९८८ चा! तेव्हा या सीनसाठी चोप्रांनी एका कापड गिरणीला शेकडो मीटर कापडाची अॉर्डर दिली होती!

या महाभारत मालिकेत एकूण ९४ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोडचा खर्च जवळपास ६ ते ७ लाख रूपये होता. आणि मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराला एका एपिसोडसाठी मानधन होतं ३००० रूपये. विशेष म्हणजे सगळ्या कलाकारांना समान मानधन दिलं गेलं!!

या मालिकेत अर्जुनाची भुमिका साकारणाऱ्या फिरोज खान यांनी स्वत:चं मूळ नाव बदलून अर्जुनच ठेवलं होतं. अर्थात याला दोन कारणं होती. एक म्हणजे या नावाचे एक आधीच मोठे कलाकार या इंडस्ट्रीमध्ये होते आणि दुसरं म्हणजे जी भूमिका त्यांना नाव मिळवून देणार होती, तिचं उतराई व्हायचं होतं. ) या भूमिकेसाठी त्यांची २३,००० लोकांमधून निवड झाली होती. 

मालिकेत रूपा गांगुली यांनी केलेली द्रौपदीची भुमिका प्रेक्षकांच्या मनाला बरीच भावून गेली. त्यामुळं आपल्याला या भूमिकेसाठी दुस-या एखाद्या स्त्री कलाकाराची कल्पना करणं थोडं जड जाईल.

पण रूपा गांगुली यांच्याआधी या भुमिकेसाठी जुही चावलाला विचारण्यात आलं होतं. पण जुहीने 'कयामत से कयामत तक' या चित्रपटासाठी या 'महाभारत' मालिकेची अॉफर नाकारली.

महाभारताचा कर्ताकरविता असणाऱ्या श्रीकृष्णाच्या पात्रासाठी तर तब्बल ५५ स्क्रीन टेस्ट घेतल्या गेल्या होत्या. युधिष्ठिराची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान आणि शंतनूची भूमिका साकारणारे ऋषभ शुक्ला यांचाही विचार श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी केला गेला. पण शेवटी ही भुमिका मिळाली ती नितीश भारद्वाज यांना. त्यांची स्माईल ही श्रीकृष्णाच्या पात्राला साजेशी आहे असा रवी चोप्रांचा विचार होता. आणि तो खराही ठरला. आजपर्यंत पडद्यावर अनेकांनी श्रीकृष्णाच्या भूमिका साकारल्या पण नितीश भारद्वाजांच्या रूपातल्या श्रीकृष्णानं लोकांच्या मनात आपली जागा कायमची पक्की‌ केलीय.

अशी ही महाभारत सिरीयल जगातल्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टिव्ही कार्यक्रमांपैकी एक होती. आणि हो, माहिती आवडली तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required