computer

इरफान खान यांच्याविषयी सर्वांना माहित नसलेल्या १० महत्त्वाच्या गोष्टी !!

फार कमी कलाकार असतात ज्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत 'खरी' पोकळी निर्माण होते. गेले वर्ष अनेक गुणी अभिनेत्यांना घेऊन गेलं. त्यापैकी इरफान खान हे नाव. त्यांनी फक्त भारतीय चित्रपटसृष्टीच नाही तर हॉलिवूडमध्येही आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाने छाप सोडली. कोणाच्याही शिफारसी किंवा ओळख न सांगता यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कोणीही गॉडफादर नसलेला हा "सेल्फ मेड"  असा अभिनेता म्हणता येईल. 

चला तर आज पाहुयात इरफान खान यांच्याबद्दल काही अश्या गोष्टी ज्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे.

१. इरफान खान यांचे संपूर्ण नाव 'साहेबजादे इरफान अली खान' असे आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील टोंक जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव यासीन अली खान तर आईचे सईदा बेगम खान हे आहे. त्यांचे कुटुंब शाही कुटुंब म्हणून ओळखले जायचे. ७ जानेवारी १९६७ रोजी इरफान खान यांचा जन्म झाला.

२. त्यांचे वडील टायर व्यावसायिक होते. इरफान यांचे बालपण टोंक आणि जयपूर येथे गेले. शाळेत असताना त्यांना क्रिकेटची आवड होती. ते खेळायचेही अतिशय उत्तम म्हणून त्यांची सी. के. नायडू ट्रॉफीसाठी निवडही झाली होती. पण ते जाऊ शकले नाहीत. कारण त्यांच्या आईवडिलांचा पाठिंबा नव्हता. पण त्यांचे मामा तेव्हा जयपूरच्या नाट्यक्षेत्रात कामाला होते. इरफान यांनी तेव्हा काही नाटकांत छोट्यामोठ्या भूमिकाही केल्या तसेच एम. ए. चे शिक्षणही चालू ठेवले.  शिक्षण चालू असतानाच त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये (एनएसडी) मध्ये शिष्यवृत्ती मिळवली. तिथेच  १९८४ मध्ये प्रवेश घेऊन  त्यांनी डिप्लोमा इन ड्रामाटीक आर्ट ही पदवी मिळवली.

३. चित्रपटात काम हवे तर मुंबईच्या मायानगरीमध्ये येणेच गरजेचे आहे म्हणून राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधील शिक्षण संपल्यावर इरफान खान चित्रपटांत काम शोधण्यासाठी मुंबईला आले. पण कोणी त्यांना फारश्या भूमिका द्यायला उत्सुक नव्हते. याचं एक कारण म्हणजे त्यांची उंची ६.१" फूट उंची होती. पण लहानलहान भूमिकाही ते करत राहिले. त्यांनी १९८७ मध्ये सलाम बॉम्बे या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या चित्रपटात कामही केले होते, पण त्यांची भूमिका केलेला भाग नंतर काढून टाकण्यात आला. 

४. त्यांनी टीव्हीवर अनेक मालिकांमध्ये काम केले. भारत एक खोज, श्रीकांत, चाणक्य, सारा जहाँ हमारा, बनेगी अपनी बात, अनुगूंज, स्पर्श आणि द ग्रेट मराठा इत्यादी या मालिकांतील त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. पण त्यांच्या खरा ओढा चित्रपटसृष्टीकडे होता. पण काही चांगले काम मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात मुंबई सोडून जायचा विचारही आला. तो काळ त्यांच्यासाठी फार कठीण होता. त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते.

५. पण म्हणतात ना दुर्दम्य इच्छा असेल तर प्रयत्नांना यश जरुर मिळते. २००१ साली आसिफ कपाडिया यांच्या द वॉरीअर (२००१) या चित्रपटात केलेल्या मुख्य अभिनेत्याची भूमिका खूप गाजली. एक रात्रीत त्यांना एक नवीन ओळख मिळाली. याच भूमिकेमुळे इरफान खान यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे दारही उघडले गेले.

६. २००७ मध्ये केलेल्या 'द नेमसेक' या चित्रपटमधली त्यांची भूमिका खूप गाजली. त्या जुलिया रॉबर्टचा किस्सा आहे. ऑस्कर सोहळ्यात त्यांची  जुलिया रॉबर्टची भेट झाली तेव्हा तिने या चित्रपटात त्यांनी केलेला कामाचे कौतुक केले. त्याच्यासाठी हा सुखद धक्काच होता.

७. त्यांच्या इंग्रजी नावाच्या स्पेल्लिंगमध्ये दोनदा ' r' हे अक्षर आहे पण हे काही संख्याशास्त्र(numerrology) म्हणून नाही तर त्यामुळे होणारा वेगळा उच्चार इरफान यांना आवडायचा. या नावामुळे अडचणी ही आल्या. त्याचे नाव एक दहशतवादीच्या नावाशी मिळतेजुळते असल्यामुळे अमेरिकेत एअरपोर्ट वर त्यांना अडवण्यात आले.

८. १९९५ साली इरफान खान यांनी सुतापा सिकंदर यांच्याशी लग्न केले. सुतापा याही एनएसडीत होत्या. तिथेच दोघांच प्रेम जुळलं. त्यांना बाबिल व अयान अशी दोन मुले आहेत.

९. इरफान खान हे असे पहिलेच बॉलीवूड अभिनेते आहेत ज्यांच्या दोन चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. स्लमडॉग मिलेनिअर (२००८) आणि लाइफ ऑफ पाय (२०१२) हे ते दोन चित्रपट आहेत. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड रेल डी’ऑर पुरस्कार  व बाफ्ता नामांकन मिळवणारा द लंचबॉक्स (२०१३) हा त्यांचा चित्रपट ठरला. त्यांनी या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका केली होती. प्रवाहाविरुद्ध वेगळे सिनेमे निवडून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली.

१०. इरफान खान यांनी चार वेळा फिल्मफेअर पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार, आशियाई पुरस्कारही मिळवले. हिंदी सोबतच अनेक भारतीय भाषांमध्ये आणि हॉलिवूड व इतर देशांतील चित्रपटांतही त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. २०११ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांचासाठी सर्वोच्च अभिमानाचा क्षण ठरला.

ते जर आज असते तर अजूनही त्यांनी आपल्या अभिनयाने अनेकानेक उत्तम चित्रपट दिले असते. पण या सगळ्या जर-तर च्या गोष्टी आहेत. अवघ्या पन्नाशीत त्यांचे न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर या आजारामुळे त्यांचे २०२० साली मुंबई येथे अकाली निधन झाले. त्यांचे चित्रपट संवाद हसवता-हसवता खूपदा विचार करायला लावत. पिकू चित्रपटातला एक डायलॉग खूप गाजला होता.."डेथ और शीट (Shit) .. यह दो चीजें है किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है" . 

अश्या या अभिनेत्याला बोभाटाकडून भावपूर्ण आदरांजली/श्रद्धांजली.

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required