computer

इतिहासात हरवलेलं एक महान व्यक्तिमत्व...विनोबा भावे यांचे वडील नरहरी शंभुराव भावे

नरहरी शंभुराव भावे यांना केवळ विनोबांचे वडील म्हणणे म्हणजे एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा मोठाच अपमान होईल. विनोबांनी त्यांना 'मोठा अप्रसिद्ध पुरुष', म्हटले असले अथवा शिवाजीराव भावे यांनी विनोबा चरित्रात त्यांना एक प्रकरण दिले असले तरी ते त्यापलीकडे बरेच काही होते. विनोबांच्या साहित्यात, विशेषतः पत्रांमध्ये नरहरपंतांचे मनोज्ञ दर्शन होते.

वैदिक घरात जन्मलेला हा मुलगा, रसायनशास्त्राची कास धरतो आणि तो व्यवसाय निवडतो हीच त्याकाळी अनोखी गोष्ट होती. बडोदा संस्थानात ते रंगाच्या क्षेत्रातील संशोधक म्हणून काम करत होते. हे संशोधन त्यांनी व्यवहारातही आणले. स्वदेशी रुमालावर, स्वनिर्मित शाईने, अक्षरओळख करून देणारे रुमाल त्यांनी तयार केले. एवढेच नव्हे तर ते स्वतः बाजारात नेऊन विकले.

(नरहरी शंभुराव भावे)

विज्ञान ते विपणन अशा क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही आश्चर्यचकित व्हावे असे होते. त्यांना रसायन उद्योग काढायचा होता. विनोबादि भावंडांनी हे काम पुढे न्यावे अशी त्यांची इच्छा होती. 'भावे अँड सन्स', हे शब्द त्यांची मोठी आकांक्षा होती.

या क्षेत्रातील त्यांचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका युरोपिअन महिलेने त्यांच्या कामाची मोठीच वाखाणणी केली. अशा माणसाला मिळणारे तुटपुंजे वेतन वाढवावे यासाठी तिने स्वतःच बडोदा सरकारांकडे शब्द टाकला.

नरहरपंतांनी विनोबांना एकदा पत्र लिहिले. विनोबांनी सवयीप्रमाणे ते वाचून फाडून टाकले. 'ही माझी मोठीच चूक होती कारण त्या पत्रासाठी वापरलेले सर्व साहित्य स्वदेशी होते', असे विनोबांनी नंतर नोंदवले.

(विनोबा भावे)

त्यांची शास्त्रीयदृष्टी कामाच्या ठिकाणी तर होतीच पण घरातही ती तशीच होती. मुलांना मारायचे तर कंबरेखाली मारावे म्हणजे शिक्षा तर होते पण त्यांना इजा होत नाही. मुलांचा कितीही राग आला तरी त्यांना या नियमाचा विसर पडला नाही.

संशोधन, नोकरी आणि व्यवसाय त्यांनी जवळचे मानले पण ते सर्वस्व ठरवले नाही. बडोद्यात असताना त्यांना योगी अरविंदांचा स्नेह लाभला ही गोष्ट बोलकी होती.

पुढे पत्नीचे निधन झाले आणि नरहरपंतांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. तोवर तिन्ही मुलांनी आपले जीवनध्येय निवडले होते. ते चांगले असले तरी पंतांसाठी काहीसे अनपेक्षित होते. गांधीजींच्या आश्रमात राहण्याऐवजी ते बडोद्यात एकटे राहू लागले.

याच काळात त्यांनी संगीत साधना सुरू केली. एका मुस्लिम गवयाकडे ते धृपद संगीत शिकू लागले. दुर्मिळ धृपद बंदिशी, ठुमऱ्या आणि मृदुंगशास्त्र यांचा दस्तावेज ठेवण्याचे काम त्यांनी अंगावर घेतले. तशी पुस्तके लिहून ते तडीस नेले. महाराष्ट्राला लिखित रूपातील ठुमरी त्यांच्यामुळेच मिळाली. 'मृदंगबाज', हे पुस्तकही त्यांनी लिहिले.

(योगी अरविंद)

या संगीत साधनेला त्यांनी आहाराविषयक संशोधनाची जोड दिली. स्वतःस जडलेल्या मधुमेहामुळे त्यांना हे काम करावे लागले. सोयाबीन आणि मुद्दाम फाडलेले दूध असा आहार घेऊन, त्यांनी मधुमेहावर जवळपास संपूर्ण नियंत्रण मिळवले होते. या प्रयोगावर लिहावे आणि सामान्य जनतेस अधिक मार्गदर्शन करावे, अशी खुद्द गांधीजींची विनंती होती. हे प्रयोग सामान्यांच्या आटोक्यातील नव्हेत, असे सांगत त्यांनी त्यास नकार दिला.

एकदा प्रयोग करताना एक प्रकारचे अॅसिड त्यांच्या पायावर सांडले आणि अखेरच्या आजाराला सुरुवात झाली. अगदी निरुपाय झाला तेव्हा त्यांनी मुलांकडून सेवा घेतली.

विज्ञानाच्या विभिन्न शाखा ते संगीत अशा सर्वस्वी भिन्न वाटणाऱ्या क्षेत्रातील ही मुशाफिरी, १९४७ मधे आजच्या दिवशी संपली. विज्ञान निष्ठा आणि उद्यमशीलता श्री विजय दिवाण यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. तो अपवाद वगळता त्यांच्या विषयी फार वाचायला मिळत नाही.

(विनोबा भावे आणि गांधीजी)

विनोबांच्या वडिलांना ७२ वर्षांचे तर आईला ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. रामदास आणि तुकाराम या संतद्वयीलाही तेवढेच लौकिक आयुष्य मिळाले होते.

त्यामुळे विनोबा आई वडिलांच्या ठिकाणी तुकोबा आणि रामदासांना तर तुकोबा आणि रामदासांच्या ठिकाणी 'माता-पिता' पहायचे.

नरहर पंतांच्या संशोधक वृत्तीला, धर्म आणि स्वराज्य या दोन निष्ठांचे अस्तर होते. पुढे त्यांच्या स्मृतिस्थानावर 'अवघेची सुखी असावे ऐसी वासना,' हे तुकोबांचे वचन लिहावे असे विनोबांनी सुचवले यातच सर्वकाही आले.

 

लेखक : अतुल सुलाखे

सबस्क्राईब करा

* indicates required