computer

गोष्ट मुंबई पोलिसांनी केलेल्या दंगलीची. का झाली, आटोक्यात कुणी आणली? किती बळी गेले?

हा फोटो एका दंगलीचा आहे हे वेगळं सांगायला नकोच. फोटोत दिसणारा बळी हा कोणत्याही जात, वंश, धर्म, औद्योगिक असंतोष यातून निर्माण झालेल्या दंगलीचा नसून १९८२ साली मुंबईत झालेल्या पोलिसांच्या दंगलीचा आहे. आश्चर्य वाटलं ना ? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या वचनाला जगणारे मुंबईचे पोलीसदल स्वतःच दंगल घडवतील यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. पण ही सत्य घटना आहे. १९८२ साली मुंबई पोलिसांनी जी दंगल केली होती त्या दंगलीचा हा फोटो आहे.

दंगल का झाली ?

पोलिसांचे आयुष्य अत्यंत तणावपूर्ण असते. एकदा वर्दी अंगावर चढवली की घरी कधी परत येणार या प्रश्नाला उत्तर नसतं. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि पगार अत्यंत तुटपुंजे असतात. १९८२ साली एकूण २२,००० पोलीस मुंबईत तैनात होते. नायगाव आणि वरळी येथील पोलीस वसाहती वगळता बाकीच्या पोलिसांना मिळेल त्या जागेत, अगदी झोपडपट्टीतही आयुष्य काढावे लागायचे. घरभाड्यापोटी मिळणारा भत्ता जेमतेम २५ ते ३० रुपये होता.

मुंबई पोलीस कर्मचारी संघटना

१९८२ हे साल चळवळी आणि युनियनबाजीचे होते. मुंबईत अनेक क्षेत्रात तेव्हा औद्योगिक असंतोष मजला होता. अशावेळी सगळ्यांचीच जर युनियन असेल तर आपल्या समस्यांची दाद मागण्यासाठी एखादी संघटना असावी या विचारातून मुंबई पोलीस कॉन्स्टेबल संघटनेची निर्मिती झाली. ८० च्या दशकात पोलीस खात्यात राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणत होता. त्याचाही उपयोग ही संघटना निर्माण होण्यास झाला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरीस्टर ‘अ र अंतुले’ यांनी या संघटनेला जागा पण दिली होती.

१९८२ च्या ऑगस्ट महिन्यात काय घडले ?

पोलीस कर्मचारी संघटनेने एकूण ३६ कलमी मागण्या सरकारपुढे ठेवल्या होत्या. सरकारी दिरंगाईच्या धोरणात त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. निषेध म्हणून १५ ऑगस्टला पोलीसदलाच्या कर्मचाऱ्यांनी दंडावर काळी रिबन बांधण्याचे निश्चित केले होते. तत्कालीन आयजीपी श्री. मेढेकर यांनी या काळ्या फितीला विरोध दर्शवला. त्यांच्या मते ध्वजारोहणाच्या प्रसंगी पोलीसदलाने काळी फित बंधणे हा एक प्रकारे राजद्रोह होता. अंतिमतः ध्वजारोहण संपल्यानंतर काळी फित बांधण्यात आली. हा तोडगा मान्य झाला. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदतच होता.

(ज्युलिओ रिबेरो)

पोलीस अधिकारी काय करत होते ?

त्यावेळी मुंबईचे पोलीस कमिशनर ज्युलिओ रिबेरो होते. त्यांचे या चळवळीकडे बारीक लक्ष होते. यात भर पडली ती एका चुकीच्या माहितीची. काही शस्त्रागाराचे पोलीस शस्त्र ताब्यात घेऊन दंगल घडवणार आहेत अशी माहिती रिबेरोंना त्यांच्या वरिष्ठ वर्तुळातून देण्यात आली. १६ ऑगस्टच्या मध्यरात्री चळवळीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उचलून ताब्यात घेण्यात आले. यापैकी एक श्री. शेवाळे मात्र निसटण्यात यशस्वी झाले. त्यांनी सर्वत्र ही बातमी पसरवली आणि असंतोषाचा भडका उडला. मुंबईचे सर्व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि दंगलीला सुरुवात झाली. त्यातच भर म्हणून अशी एक बातमी आली की नायगावच्या पोलीस वसाहतीचं पाणी मुद्दाम तोडण्यात आलंय.

सरकार तेव्हा काय करत होतं ?

दंगल झाली तेव्हा मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले दिल्लीत तळ ठोकून बसले होते. त्यांच्याच मंत्रिमंडळातील २२ आमदारांनी त्यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळ धोक्यात होते.

(बाबासाहेब भोसले)

पुढे काय झाले ?

ज्युलिओ रिबेरो यांना मुंबई पोलीस कमिशनर झाल्यावरच सहा महिन्याआधी असे काही घडेल याची दाट शक्यता वाटत होती. यासाठी त्यांनी गणेशोत्सवाचे कारण पुढे करून सीआरपीएफ चे हजारो जवान मुंबईत तैनात ठेवले होते. दुपारी पोलिसांची दंगल शिगेला पोचली. वरळीत सेंच्युरी बाजार फोडून लुटालूट सुरु झाली. पोलिसाच नाही म्हटल्यावर अनेक समाजकंटक लुटालूट आणि जाळपोळ करायला रस्त्यावर उतरले. दंगलीवर काबू मिळवण्यासाठी गोळीबार करावा लागला. परिणामी २ पोलीस, २ लहान मुलं आणि ४ नागरिक या दंगलीत बळी गेले.

(रिबेरो यांचं आत्मचरित्र)

ज्युलिओ रिबेरो यांनी आधी १३ वर्ष सीआरपीएफचे नेतृत्व केले असल्याने त्यांना बरेच सहकार्य मिळाले. दुःखाची गोष्टी अशी की स्थानिक पोलिसांविरुद्धच त्यांना लढावं लागलं. रिबेरो यांच्या ‘बुलेट फॉर बुलेट’ या आत्मचरित्रात या प्रकरणाबद्दल अधिक माहिती वाचकांना मिळू शकते.

आज काय परिस्थिती आहे ?

पोलिसांना मिळणाऱ्या काही सुविधांमध्ये नक्कीच लक्षणीय प्रगती आहे. नैराश्यापोटी आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आहे. हे पोलीसदलाकडे अजूनही दुर्लक्ष होण्याचे द्योतक आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required