जगातली पहिली महिला डॉक्टर आयुष्याची ५६ वर्षे पुरूषवेषात का जगली?

स्त्रियांना जगात सगळ्या ठिकाणी आपल्या हक्कांसाठी लढावं लागलंय. मग तो मतदानाचा हक्क असो, शिक्षणाचा असो किंवा मग समानतेचा. एकेकाळी स्त्रियांनी शिकणं हाच गुन्हा होता मग तेव्हा जर एखादीला डॉक्टर बनावंसं वाटलं असेल तर तिनं काय केलं असेल??

तिचं नांव आहे मार्गारेट ऍन बल्कली. पण तिची गोष्ट खूप विचित्र आहे. त्यामुळं जगातली पहिली महिला डॉक्टर म्हणून गुगल केलंत तर दुसरंच नांव सापडेल तुम्हांला. इलिझाबेथ ब्लॅकवेलचं. तिच्यानंतर तब्बल ३०वर्षांनंतर जन्मलेल्या बाईचं. मग असं काय झालं असेल की मार्गारेटचं नांवच त्या यादीत नाही? आहे. मार्गारेटचं नसलं तरी ती या इतिहासात आहे. वाचा तर मग..

स्त्रोत

१८६५ मध्ये प्रेताची साफसफाई करताना सोफिया बिशप नावाच्या बाईला आपण साफ करतोय हे प्रेत बुवाचं नाही, तर बाईचं आहे हे लक्षात आलं. तिच्या अनुभवी नजरेला पडले त्या प्रेताच्या पोटावर बाळंतपणात येतात तसे  स्ट्रेचमार्कस.  ते प्रेत होतं प्रसिद्ध सर्जनचं, एकेकाळी ब्रिटिश आर्मीमधल्या मिलिटरी हॉस्पीटलच्या इन्स्पेक्टर जनरल या सर्वोच्च पदावर असलेल्या डॉ. जेम्स बेरींचं.. स्त्रियांना मेडिकल शिक्षण निषिद्ध असणाच्या त्या काळात कुणा बाईनं जेम्स बेरी हे नांव धारण करून तब्बल ५६ वर्षं ब्रिटिश मिलिटरीला अंधारात ठेवलं!! घटना मोठी खळबळजनक होती.

ब्रिटिश आर्मीनं मग काय केलं माहित आहे? डॉ. जेम्स बेरींशी संबंधित सगळ्या कागदपत्रांना पुढच्या १००वर्षांसाठी सील ठोकलं!!

नक्की कोण होता हा जेम्स बेरी?

हा नाही, ही. ही होती मार्गारेट ऍन बल्कली. आयर्लंडमधल्या कॉर्क इथल्या एका भाजीपाला विकणार्‍याची मुलगी. त्या कुटुंबाला खूप कर्ज झालं आणि त्यातून त्यांना बाहेर काढलं मार्गारेटच्या मामानं- जेम्स बेरीनं. हा जेम्स बेरी कॉर्कंमधला नावाजलेला आर्टिस्ट होता आणि लंडनच्या रॉयल ऍकॅडमीमध्ये चित्रकलेचा प्रोफेसर होता. या जेम्स बेरी मामानं आणि त्याच्या मित्रांनी मार्गारेटला डॉ. जेम्स बेरी बनायला मदत केली.  हे मित्र होते व्हेनेझुएलाचे जनरल फ्रासिस्को द मिरांडा आणि डेव्हिड स्टुअर्ट अर्स्काईन, बुचनचे अकरावे अर्ल.  मार्गारेटचं नवं नांवही या सगळ्यांच्या नावाचं मिश्रण होतं- जेम्स मिरांडा स्टुअर्ट बेरी.

काय होता मूळ प्लान?

१४ वर्षांच्या मार्गारेटला तिच्या आईनं मुलाचे कपडे घालून समुद्रमार्गे एडिनबर्गला घेऊन यायचं.  तिनं तिथल्या युनिव्हर्सिटीतल्या मेडिकल कॉलेजात प्रवेश घ्यायचा. अर्थातच प्रवेश मिळवून देण्यासाठी, म्हणजेच आधीच १४ वर्षं वय, मुलगी असल्यामुळं असणारा नाजूकपणा, न फुटलेला आवाज, त्यामुळं मुलगी असण्याचा येणारा संशय यातून पार पडण्यासाठी मामांचे मित्र मदत करतील. एकदा का शिक्षण झालं, की ती व्हेनेझुएलामध्ये जाऊन आपलं डॉक्टरकीचं काम चालू करेल. व्हेनेझुएलामध्ये अद्याप कुणी स्त्री-डॉक्टर झाली नसली तरी तिथं त्यासाठी किमान आडकाठी तरी नव्हती.

पण असं व्हायचं नव्हतं. मार्गारेटचं शिक्षण संपेपर्यंत जनरल फ्रासिस्को द मिरांडा यांना तुरूंगात टाकण्यात आलं आणि मार्गारॆटला आपल्या आहे त्या पुरूष वेषातच पुढ्चं आयुष्य काढावं लागलं.

जेम्सचं मेडिकल शिक्षण..

[  १८४०च्या दरम्यान काढलेला जेम्स बेरींचा फोटो  स्त्रोत]

अपेक्षित असल्याप्रमाणं जेम्सची लहानखुरी चण त्याच्या शिक्षणाच्या आड येऊ पाहात होती. युनिव्हर्सिटीच्या अधिकार्‍यांना जेम्स शेवटच्या डिग्री परिक्षेसाठी खूप लहान वाटत होता. तो २२ नाही, तर १२ वर्षांचा दिसतो असं काही लोकांचं म्हणणं होतं. लॉर्ड बुचननी तिथं योग्य वेळी हस्तक्षेप केला. शिक्षण संपल्यावर त्याला ब्रिटिश आर्मीमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून नोकरी मिळाली. तिथल्या अधिकार्‍यालाही जेम्स हा अजून लहान मुलगाच आहे असं वाटत होतं.

जेम्स आपलं बाईपण चक्क ५६ वर्षं कसं लपवू शकला?

ब्रिटिश शिष्टाचार आणि त्याकाळी मेडिकल टेस्ट अत्यंत कसोशीनं व्हायची नाही, या दोन्ही गोष्टींमुळं जेम्सचं स्त्री असणं त्याच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या दोन्ही ठिकाणी उघडकीस आलं नाही.

असं म्हणतात की त्याच्यासोबत एक नोकर सतत असे. तो दररोज जेम्सला सहा लहान टॉवेल्स देई. या टॉवेल्सच्या मदतीनं जेम्स आपल्या शरीरावरचे उभार लपवत असे. तो कपडे बदलत असताना त्याच्या खोलीत येण्याची सगळ्यांनाच मनाई होती. त्यानं आपल्या मृत्यूनंतर आपल्याला ताबडतोब आहे त्या कपड्यांत दफन केलं जावं, असंही लिहून ठेवलं होतं. ते बहुतेक कुणाच्या लक्षात आलं नाही आणि सोफिया बिशपला आपला मालक नक्की कोण होता हे कळालं.

तसा तो स्त्रियांना आवडे. तो काहीजणींसोबत फ्लर्टही करत असं म्हणतात. कदाचित आपण स्त्री नाही हे दाखवण्याचा त्याचा हा प्रयत्न असू शकतो. पण तो वागण्यात भलताच तिरसटपणा दाखवे. रूग्णांवर आणि इतर सहकार्‍यांवर ओरडे. एकदा तर त्यानं फ्लॉरेन्स नाईंटिंगेलसोबतही वाद घातला होता. कारण काय तर भर टळटळीत उन्हात ती फक्त टोपी घालून बाहेर पडली होती.  

[जेम्स बेरींसोबत त्यांचा नोकर आणि साईक(Psyche) नावाचा कुत्रा स्त्रोत]

जेम्सच नक्की मार्गारेट आहे हे कशावरून?

त्याच्या मृत्यूनंतर जवळजवळ ९० वर्षांनी म्हणजेच १९५०मध्ये इसाबेल रे नावाच्या एका इतिहास संशोधकाला ब्रिटिश आर्मीची काही जुनी कागदपत्रं सापडली आणि त्यावरून तिनं डॉ. जेम्स बेरी ही खरंतर आर्टिस्ट जेम्स बेरीची भाची मार्गारेट आहे असा निष्कर्ष काढला. पण त्यासाठी तिच्याकडं भक्कम पुरावे नव्हते. त्यानंतर ५० वर्षांनी सन २००१ मध्ये डॉ. प्रीझ यांनी या रहस्याची उकल करण्याचा चंग बांधला. त्यांनी खूप सारी कागदपत्रं जमा केली. यात मार्गारेटने लिहिलेली आणि जेम्सने एडिनबर्गच्या कॉलेजमध्ये असताना लिहिलेली अशी दोन्ही प्रकारची पत्रं हा महत्वाचा ऐवज होता. हस्ताक्षर तज्ञानं ही दोन्ही अक्षरं एकाच व्यक्तीची असल्याचा निर्वाळा दिला. बेरी कुटुंबाचे सॉलिसिटर  डॅनियल रिअर्डन यांच्याकडेही एक पत्र मिळालं. १४ डिसेंबर १८०९ मध्ये त्यांना डॉ. जेम्स बेरींनी मार्गारेट बेल्कलीसाठी आलेली पत्रं मेरी बल्कली म्हणजेच मार्गारेटच्या आईकडे पुढे पाठवण्यात यावी असं लिहिलं होतं. या सॉलिसिटरना आलेलं पत्र कुणाकडून आणि किती तारखेला आलं आहे हे पत्राच्या लिफाफ्यावर लिहायची सवय होती. त्यांनी लिहिलं, कु. बल्कली, १४ डिसेंबर!!

[ पहिलं पत्र मार्गारेट या नावानं १८०४साली  लिहिलं गेलं आहे, तर दुसरं पत्र आहे १४ डिसेंबर १८०९ रोजी आलेलं, तेच ते निर्णायक पत्र..  स्त्रोत]

जेम्स बेरीचं कार्य-

बेरी त्याच्या कामानिमित्त खूप देश फिरला. दक्षिण आफ्रिकेत  केप टाऊनला तो १२ वर्षं होता.  तिथं त्यानं स्वच्छता, योग्य पाणीपुरवठा, रूग्ण आणि  गुलामांसाठी थोडं सुसह्य जीवन यांचा पाठपुरावा केला. त्यानंतर तो  वेस्ट इंडिज बेटं, कॅनडा आणि इतर बर्‍याच देशांत गेला. वेस्ट इंडिज बेटांत त्यानं सैनिकांसाठी औषधोपचार आणि त्यांच्या चांगल्या राहणीमानासाठी खूप प्रयत्न केले. इथंच त्याला प्रिन्सिपल मेडिकल ऑफिसर म्हणून बढती मिळाली. 

बेरी ब्रिटिश साम्राज्यात जिथं जिथं गेला, तिथं तिथं तो तुरूंगातले कैदी, महारोगी, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना  पौष्टिक आहार, स्वच्छता आणि योग्य वैद्यकीय मदत मिळावी म्हणून आग्रही होता. हे करताना गोष्टी कधी कधी इतक्या थराला गेल्या की त्यासाठी तो आर्मीच्या अधिकार्‍यांशी वाद घालत असे. त्याच्याविरूद्ध बरेचदा तक्रारी दाखल करण्यात आल्या, त्याला पदावनती देण्यात आली, तर कधी कधी चक्क अटकसुद्धा करण्यात आली होती.   १८२६साली सिझेरियन सेक्शन ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडून आई आणि बाळ दोघांनाही वाचवण्याचं काम करणारा तो पहिला ब्रिटिश सर्जन ठरला.  

काही लोक मेल्यानंतर प्रसिद्ध होतात. इथं जेम्स त्याच्या मृत्यूनंतर कुप्रसिद्ध झाला. इतका की, त्याच्यासंबंधीची सगळी कागदपत्रं सील करण्यात आली. आज मात्र जग अभिमानानं त्याच्यावर संशोधन करत आहे. तो, अहं,  ती.. मार्गारेट ऍन बल्कली, आहे जगातली पहिली महिला डॉक्टर, पहिली महिला सर्जन आणि पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टरसुद्धा!!

सबस्क्राईब करा

* indicates required