computer

कोरोना संकटात बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे देवदूत.... !!

ते तिघंजण लखनौचे. एकजण कवी, दुसरा सामाजिक कार्यकर्ता आणि तिसरा राज्य सरकारी कर्मचारी. तसं म्हटलं तर त्यांच्यात एक समान असं काहीच नाही, पण मानवतेच्या धाग्याने मात्र ते एकमेकांशी बांधलेले आहेत आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी एक अनोखं काम करत आहेत. तेही सगळा देश कोरोना परिस्थितीचा सामना करत असताना. काय आहे त्यांची गोष्ट?

मार्च आणि जून च्या दरम्यान या तिघांनी १५ बेवारस प्रेतांवर भैसाकुंड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. भैसाकुंड ही लखनौमधली सर्वात मोठी स्मशानभूमी. कोरोनापूर्व काळात इथे महिन्याला सुमारे ८०० प्रेतांवर अंत्यसंस्कार केले जायचे. लखनौमध्ये बेघर लोकांसाठी २३ निवारे आहेत पण प्रत्यक्षात रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांची संख्या बरीच मोठी - ३००० च्या घरात - आहे.

ज्यांची घरंदारं, कुटुंबं, वारसदार यांचा पत्ता नाही अशा बेवारस अभागींवर इथे अंत्यसंस्कार केले जातात. यात कवयित्री असलेल्या वर्षा, रुरल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये क्लार्क म्हणून काम करणारे दीपक महाजन आणि सामाजिक कार्यकर्ता असलेला मोहम्मद अझर हुसेन हे तिघंजण सन २०१८ पासून पोलिसांना मदत करत आहेत. त्यांच्यासाठी हे अगदी रुटीन स्वरूपाचं काम. मात्र या कामाला खरी ओळख मिळाली ती कोरोनाच्या काळात. या काळात विशेषतः कोरोना संक्रमणाने मरण पावलेल्या मृतदेह कसे हाताळावेत यासंदर्भात केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यातून दुसऱ्या काही कारणाने मरण पावलेल्यांच्याही नशिबी नको ती अवहेलना आली. आपल्याच माणसाला हात लावणं, त्याचं अंत्यदर्शन घेणंही महाग ठरलं. कित्येक ठिकाणी तर नातेवाईक, शेजारी यांनीच प्रेत स्वीकारायला किंवा त्याचं आपल्या घराच्या जवळपास दफन करायला नकार दिला. सरकारने त्यांच्याबद्दल काहीच गाईडलाईन्स दिल्या नव्हत्या. मात्र तरीही वर्षा यांनी एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क, ग्लोव्ह्ज यांचा वापर चालू ठेवला आहे.

ज्यावेळी लोकांच्या मनात केवळ प्रेताच्या संपर्कामुळेही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती घर करून बसली होती तेव्हा या प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं आव्हान यांनी स्वीकारलं हेच त्यांचं वेगळेपण. स्वतः वर्षा यांनी बेघर लोकांचे हाल, आजारी पडल्यावर काळजी घेणारं कुणी नसल्याने त्यांची होणारी दयनीय स्थिती हे सगळं पाहिलं आहे, त्यांची वेदना समजून घेतलेली आहे. त्यातूनच त्यांना हे काम करण्याची उभारी मिळाली.

(वर्षा वर्मा)

रस्त्याच्या कडेला कुणी बेवारशी मनुष्य मरून पडला असेल तर त्याचं पुढे काय होतं माहीत आहे? ते प्रेत आधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्याचं पोस्टमॉर्टेम केलं जातं. मग त्यांची पोलीस विल्हेवाट लावतात. तो त्यांच्या कामाचाच भाग आहे. मात्र अनेकदा दुसरं काही काम असल्यास लखनौ पोलीस या कामासाठी वर्षाला बोलावतात. हे तिघंही सतत पोलिसांच्या संपर्कात असतात आणि अनेकदा आपणहून काही काम आहे का याची पोलिसांकडे चौकशीही करतात हे विशेष. हे काम करताना वर्षा आणि त्यांचे साथीदार त्या बेवारस मृत व्यक्तीला सन्मानपूर्वक विदा करतात. सहसा अशी प्रेतं पोलीस कापडात गुंडाळून रिक्षामधून नेतात. टीम वर्षा मात्र यासाठी खास बसची व्यवस्था करते. सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केल्यानंतर ते भैसाकुंड स्मशानभूमीच्या बाजूनेच वाहणाऱ्या गोमती नदीत राख विसर्जित करतात.

हे काम हे सर्वजण स्वखर्चाने करत आहेत. २०१७ मध्ये त्यांनी समाजकार्य करण्यासाठी दिव्य सेवा फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि आज ते या संस्थेच्या माध्यमातून उभा राहिलेला निधी या कामासाठी वापरत आहेत.

वर्षाचा नवरा राकेश याला मात्र सुरुवातीला- विशेषतः लॉक डाऊनच्या काळात- वर्षाच्या काम चालू ठेवण्याच्या निर्णयाबाबत आणि त्यात असलेल्या संभाव्य शारीरिक धोक्यांबाबत काळजी वाटत होती, आज मात्र त्याला आपल्या पत्नीचा अभिमान वाटतो. असंच काहीसं तिच्या मुलीचंही. तिच्या मुलीसाठी - नंदिनीसाठी - वर्षा रोल मॉडेल आहे. (बहुतेक मुलींप्रमाणेच!) पण यापुढे जाऊन तिला आईचंच काम पुढे न्यायचं आहे.

अंत्यसंस्कार हे खरंतर पुण्याचंच काम. मनुष्याचा या जगातला प्रवास संपून दुसऱ्या जगात प्रवेश करताना त्याला सन्मानपूर्वक निरोप द्यायचा अशी आपली परंपरा आहे. आज याच पुण्याच्या कामात वर्षा आणि त्यांचे सहकारी हातभार लावत आहेत.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required