computer

जन्मतःच पोलिओग्रस्त होती, आज ती अनेक मुलाचं आयुष्य उजळत आहे !!

आयुष्यात संकटे आली म्हणून हात टेकणारे लोक अनेक असतात. आजारपणाला कंटाळलेले लोक सुद्धा असतात. त्याचप्रमाणे आजारपणाला हरवून इतरांच्या आयुष्यात आनंद यावा यासाठी झटणारे अवलीये देखील आपल्या समाजातच असतात.

उत्तराखंड राज्यात बॉर्डरनजीक चंपावत नावाचा जिल्हा आहे. आपल्या आजच्या गोष्टीची नायिका याच भागातली. तिचं नाव जानकी चंद. तिला जन्मतःच पोलिओ होता. जानकी 13 वर्षांची झाली तोवर तिला दिव्यांगांसाठी असलेल्या साधनांचा वापर करून चालावे लागत असे. त्यानंतर देखील तिला चालण्यासाठी काठीचा आधार लागे.

असे असले तरी तिने हार मानली नाही. आपल्या वाट्याला त्रास आला असला तरी हा त्रास इतरांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून ती सातत्याने कष्ट घेत असते. जानकी १० वर्षांची असताना तिचे दारुडे वडील तिच्या आईला आणि तिच्या 4 भावंडांना सोडून निघून गेले होते.

तिने आपल्या आईच्या खांद्याला खांदा भिडवून काम केले. तिच्या आई आणि बहिणीने देखील तिला शिक्षणासाठी मदत केली. अशा सर्व संकटातून जाऊन २००६ साली तिला अंगणवाडीमध्ये नोकरी मिळाली. नोकरी लागल्यावर तिने जेव्हा बघितले मुले शिक्षणाऐवजी इतर गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत, तेव्हा तिला याचे वाईट वाटले.

तिला सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी एक वर्ष लागला. या काळात तिने तरुणांसोबत बोलून त्यांना योग्य कामांमध्ये सक्रिय होण्यासाठी प्रेरित केले. ज्या लहान मुलांना आर्थिक कारणांनी शिक्षण घेता येत नाही  अशा मुलांना जानकी स्वतः शिकवते. तसेच परिस्थितीमुळे हिंमत हारणाऱ्या मुलींना धीर देऊन त्यांना पुढे जाण्यास प्रेरित करण्याचे काम जानकी सातत्याने करत असते.

जानकी सांगते की 'आपले छोटेसे काम हे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. आपल्या आजूबाजूला लोक अडचणीत आहेत ही गोष्ट दिसत असताना आपण शांत राहू शकत नाहीत.' जानकीला तिच्या कामासाठी २०११ साली राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला आहे.

जानकीच्या कामात अनेक अडचणी येत असतात पण तरी देखील ती हिमतीने पुढे जात आहे. तिला आपले काम आणखी वाढवायचे आहे. जानकी सारखी लोक हे खऱ्या अर्थाने समाजाचे भूषण असतात.

सबस्क्राईब करा

* indicates required