उत्तराखंडच्या पुरात भारतीय सैन्य दिवसरात्र बचावकार्य कसं करत आहे? भारतीय सैन्याच्या कामाचा आढावा घेणारा लेख !!

उत्तराखंडच्या देवभूमीत तपोवनमध्ये आलेल्या प्रलयामुळे सगळीकडे हाहाकार माजला. हिमनदीत आलेल्या पुरामुळे सगळीकडे गाळ साठला. त्या पाण्यात, गाळात आपल्या भारतीय लष्कराच्या बचाव पथकाला बोलावण्यात आले. भारतीय लष्कर तिथे प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आहे. आतापर्यंत ३०हून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलेले आहे. अजून २००च्यावर लोक बेपत्ता आहेत.
रविवारी झालेल्या आपत्तीनंतर भारतीय लष्कर तिथे न थांबता अनेक तास पाण्यात उभे राहून काम करत आहे. पुरात अडकलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी सैन्य दल गेले सहा दिवस प्रयत्न करत आहे. बोगद्यातून गाळ आणि ढिगारे साफ करण्यासाठी आणि जिथे लोक अडकले आहेत त्या लहान बोगद्यपर्यंत पोहोचण्यासाठी एकाच वेळी खोदकाम सुरू आहे. लेख लिहित असताना आलेल्या माहितीनुसार ११४ मीटरपर्यंतचा भाग साफ करण्यात आला आहे. अनेक जनावरेही या पुराच्या कहारात अडकली गेली आहेत.
पुरामुळे सीमेवरील अनेक गावांचा संपर्क तुटला त्यामुळे तेथील अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून खाद्यपदार्थांची हवाबंद पाकिटे देण्यास सुरुवात केली आहे. हे खाद्यपदार्थ दिर्घकाळ टिकतील असे दिले आहेत. जवळपास ९ गावांना खाद्यपदार्थ पोहोचवण्यात आले आहेत.
बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतेक लोक तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील आणि धरणातील कामगार आहेत एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी पाच कॅमेरे ड्रोनसह बोगद्याच्या छोट्या भागामध्ये पाठविण्यात आले होते, परंतु जिवंत किंवा मृत कोणीही दिसून आले नाही. हेलिकॉप्टरच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.
इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) ने उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील भूमिगत बोगद्यातून अनेक लोकांना वाचवले. हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य रात्रंदिवस सुरू आहे. अजून कुमक लागली तर बोलावण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या मार्कोस संघाने नवी दिल्ली येथे १६ आणि मुंबई येथे ४० कर्मचारी तैनात ठेवले आहेत. अशी माहितीही भारतीय सैन्याने दिली.
बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनरेटर आणि सर्चलाइट्स बसवून शोधकार्य सुरू आहे. हवाईदल, नौदल, आणि सेना सगळे मिळून या अडकलेल्या लोकांना शोधण्याचे काम करत आहेत. तसेच जी गावं पाण्यामुळे तुटली गेली आहेत तिथल्या लोकांना धीर द्यायचे काम करत आहे.
मोठ्या धैर्याने भारतीय सैन्य तिथल्या संकटाचा सामना करत आहे. अजूनही काही कामगार वाचतील अशी त्यांना आशा आहे. मृत कामगारांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. खूप कमी वेळेत या गोष्टी शिस्तबद्धपणे करणे गरजेचे आहे कारण जरी कोणी पाण्यात बचावले असेल तरी त्यांना हायपोथर्मियाचा धोका आहेच. हायपोथर्मिया म्हणजे खुप थंड वातावरणामुळे येणारा मृत्यू.
२०१३ मध्येही केदारनाथ येथे आलेल्या विनाशकारी पुरानंतर भारतीय सैन्यातील कमांडोना तिथे बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. तेथेही अनेक दिवस बचावकार्य चालले. फोटोमधून तुम्हाला लक्षात येईलच हे कार्य किती मोठे आहे.
भारतीय लष्कर फक्त शत्रूंपासून आपला बचाव करते असं नाही तर अश्या संकटात ही धावून येते. त्यांच्या या प्रयत्नांना लवकर यश मिळो आणि राहिलेल्या सर्व कामगारांचा लवकरात लवकर शोध लागो हीच प्रार्थना.