आज वेळाअमावस्या...का, कुठे आणि कशी साजरी करतात? जाणून घ्या आजच्या दिवसाची महती!

आज काय आहे माहित आहे? आज आहे वेळाअमावस्या!!! आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण.  ही वेळाअमावस्या  लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसं पाहायला गेलं तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो  महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे.

काय करतात या अमावस्येला?

तर, आजचा दिवस आहे शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा. ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी तुम्हांला गावात कुणी सापडणार नाही. जणू सगळीकडे अघोषित संचारबंदीच असते. मात्र शेतं आणि शिवारं गर्दीने फुलून गेले असतात.

 भागात जे मुख्य पीक असतं त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटलं जातं. या दिवसांत पिकं ज्वारी पोटऱ्यात येण्याच्या म्हणजेच म्हणजेच कणीस भरण्याची स्थितीत असतात.  म्हणजेच यावेळी लक्ष्मी गर्भवती आहे असे समजून तिच्या डोहाळेजेवणासाठी काही खास पदार्थ केले जातात. डोहाळजेवण आणि त्यात थंडी!! म्हणून वेळाअमावास्येचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं.

हा असतो वेळाअमावस्येचा मेन्यू..

या काळात रान विविध भाज्यांनी फुललेलं असतं.   त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील!! या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात.

या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात.  पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात.   पूजेनंतरसगळेजण  एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात.  हा स्वयंपाकही तिथं शेतातच केलेला असतो. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचं स्वतःचं शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात.

या दिवशी सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायच्या या सणाची पुढच्या वर्षी पर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते.

सबस्क्राईब करा

* indicates required