computer

गणेशोत्सव स्पेशल : गणेशाचं स्त्री रूप 'विनायकी'...वाचा या प्राचीन देवतेची दुर्मिळ माहिती !!

विनायकी, गणेशीनी किंवा गजानिनी या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या गणेशाच्या स्त्री रुपाबद्दल आज फारशी माहिती उपलब्ध नाही. पुराणात किंवा प्राचीन ग्रंथात विनायकीचा फारसा महत्वपूर्ण उल्लेख आढळत नाही. गणेशचतुर्थी निमित्त आज आपण या प्राचीन देवतेबद्दल थोडी रोचक माहिती जाणून आहोत.

आपण जर स्वतंत्र देवता म्हणून या देवतेकडे बघितलं तर तिला खरं तर नावच नाही. विनायकी किंवा गणेशाचं स्त्री रूप हीच या देवतेची ओळख मानली जाते. असं म्हणतात की विनायकी ही ६४ योगिनींपैकी किंवा सप्तमातृकांपैकी एक आहे. काही अभ्यासकांचा असाही दावा आहे की विनायकी देवी ही पार्वती देवींची सहकारी ‘मालिनी’ आहे.

स्रोत

‘बालाजी मुंडकुर’ यांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हटलंय की विनायकीचा मत्स्य पुराणात उल्लेख येतो. तिथे ती शिवाच्या २०० रूपांपैकी एक दाखवली आहे. मत्स्य पुराणा सोबतच विष्णू धर्मोत्तर पुराणात देवींच्या यादीत विनायकी देवीला सामील केलेलं आढळतं. याखेरीज विनायकी देवी म्हणजेच गणेशाचं स्त्री रूप किंवा ‘शक्ती’ हे सिद्ध करणारी एक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहे. देवदत्त पटनायक यांनी ही दंतकथा सांगितली आहे ती अशी :

अंधकासुर नावाचा राक्षस होता. त्याला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होती. अंधकासुराला देवी पार्वतीशी विवाह करायचा होता. अंधकासुराने पार्वती देवींना जोरजबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला. पार्वती देवींनी भगवान शिवाला मदतीस बोलावलं. शिवाने अंधकाचा वध केला पण त्यामुळे झालं असं की अंधकाचं रक्त जमिनीवर सांडलं आणि आणखी एक अंधकासुर तयार झाला. अंधकाला मारण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर सांडला नाही पाहिजे. मग पार्वती देवींनी विविध शक्तींना मदतीला बोलावलं. विष्णूची शक्ती वैष्णवी, इंद्राची शक्ती इंद्राणी अशा विविध शक्ती धावून आल्या. त्याबरोबरच गणेशाची शक्ती सुद्धा आली. तीच ‘विनायकी’ किंवा ‘गणेशीनी’. या शक्तींनी मिळून अंधकाचं रक्त जमिनीवर सांडण्याआधीच ते पिऊन टाकलं. अशा प्रकारे शेवटी अंधकासुर मेला.

या दंतकथेवर आधारित मुंबई येथल्या घारापुरी लेण्यातले हे शिल्प. या शिल्पात भगवान शिवाच्या हाती रक्त जमा करण्यासाठी वाडगा दाखवण्यात आलाय. असं म्हणतात की शिवाने ऋषींना त्रास देणाऱ्या गजासुराला मारून त्याचे कातडे अंधकासुराच्या वधाच्यावेळी स्वतः भोवती गुंडाळले होते. हे चामड्याचे आच्छादन सुद्धा या शिल्पात आपण पाहू शकतो.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान भागातल्या प्राचीन मंदिरात विनायकी देवतेचं शिल्प आढळून येतं. ही देवता लुप्त कशी झाली किंवा तिच्याबद्दल एवढं कमी का लिहिलं गेलं हा शोधाचा मुद्दा आहे.

आता आपण बघूया भारतात विनायकीचे प्राचीन अवशेष कुठे सापडले आहेत ते....

१. कन्याकुमारीच्या तनुमलयन मंदिरात सुखासन घातलेल्या स्थितीत विनायकी दिसते.

२. जबलपूर मध्यप्रदेशच्या भेड़ाघाट भागात १० व्या शतकातील चौसष्ट योगिनी मंदिर आहे. या मंदिरात ४१ व्या योगिनीच्या रुपात विनायकी आढळते. या मंदिरात विनायकीला ‘अंगिनी’ म्हणून ओळखलं जातं.

३. विनायकीचं सर्वात जुनं शिल्प राजस्थानच्या ‘रैढ’ भागात सापडलं आहे. हे शिल्प इसविसनपूर्व पहिल्या शतकातील आहे.

४. जबलपूर सोबत हिरापूर भुवनेश्वर भागातील प्राचीन मंदिरात विनायकीला ६४ योगिनींच्या रुपात दाखवलं गेलंय. या मंदिरात असलेली मूर्ती एका दुर्मिळ नृत्य मुद्रेत आहे.

५. मध्यप्रदेशच्या मंदसौर भागात असलेल्या ‘हिंगलाजगढ़’ किल्ल्यात विनायकी आणखी एका वेगळ्या रुपात दिसते. इथे ती ‘ललिता’ रुपात आहे. या मूर्तीची मुद्रा ही अभयमुद्रा आहे.

६. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात विनायकीचं व्याघ्रपाद रूप पाहण्यास मिळतं. व्याघ्रपादचा अर्थ होतो या रुपाला मानवी पाय नसून वाघाचे पाय आहेत.

मंडळी, गणपतीचा सोहळा आपण ११ दिवस साजरा करतोच, पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने विनायकीचंही स्मरण करूयात. तुम्ही विनायकी देवीचे दर्शन कधी घेतले आसल्यास तिथले फोटो आमच्यासोबत शेअर करायलाही विसरु नका

सबस्क्राईब करा

* indicates required