computer

डब्यावरच्या सूचना नीट वाचल्या नाहीत तर कधीतरी असंही घडू शकतं!!

कोणत्याही उत्पादनाच्या मागे लिहिलेल्या गोष्टी फारच कमी लोक वाचतात. ती अक्षरही लहान असल्याने वाचण्याचा कंटाळा येतो, पण ही चूक फार महागात पडू शकते. अमेरिकेतल्या मिसूरी येथे राहणाऱ्या या बाईंच उदाहरण घ्या. त्यांच्या कारमध्ये ठेवलेल्या ड्राय शाम्पूचा स्फोट होऊन कारच्या छताला भलंमोठं भगदाड पडलंय.

ख्रिश्चिन बॅडर डेब्रेच यांनी कार उन्हात पार्क केलेली. कारच्या कॅन्सोलमध्ये ड्राय शाम्पू होता. कॅन्सोलचं झाकण बंद होतं. थोड्यावेळाने मोठा आवाज झाला. ख्रिश्चिन यांना वाटलं की कारवर काहीतरी आदळलं आहे, पण बघितल्यावर लक्षात आलं की कारच्या आतून स्फोट झालाय. हा स्फोट ड्राय शाम्पूमुळे झाला होता.

मंडळी, ड्राय शाम्पू एरोसोल कॅनमध्ये येतो. एरोसोल कॅन म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर स्प्रे परफ्युमसाठी जो कॅन वापरतात त्याला एरोसोल कॅन म्हणतात.

ड्राय शाम्पूमध्ये द्रव पदार्थ नसतो. त्याला स्प्रे सारखं वापरलं जातं. वापरण्यास सोप्पा आणि पाण्याची गरज नसल्याने बरेचदा हा शाम्पू लोक प्रवासात जवळ बाळगतात. पण नेमकं मागची बाजू वाचत नाहीत.

एरोसोल कॅनमधला पदार्थ बाहेर फेकण्यासाठी प्रोपेन, ब्यूटेन किंवा आइसोब्यूटेन ही रसायनं असतात. या रसायनांनी कॅनचा ७० ते ९० टक्के भाग व्यापलेला असतो. शिवाय या कॅनमध्ये LPG आणि सिगरेट लाईटरमध्ये असलेला वायू सुद्धा असतो. हे सर्व पदार्थ ज्वलनशील असतात. त्यामुळेच उत्पादनाच्या मागे “store in a cool, dry place” अशी स्पष्ट सूचना दिलेली असते.

जर एरोसोल कॅनचा संपर्क उष्णतेशी आला तर त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. याखेरीज या कॅनला मोडणे, छिद्र पाडणे सुद्धा घातक ठरू शकतं. ख्रिश्चिन बाईंनी नेमकी ती सूचना वाचली नाही त्यामुळे त्यांच्या कारचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं.

मंडळी, तुमच्या घरातले एरोसोल कॅन थंड आणि उष्णतेचा संपर्क येणार नाही अशा जागी ठेवायला विसरू नका...आणि हो पोस्ट आवडली तर शेअर नक्की करा !!!

 

आणखी वाचा :

या भारतीयाने शाम्पूला जगभर पोचवलं..वाचा शाम्पूच्या जन्म आणि प्रवासाची कहाणी..

सबस्क्राईब करा

* indicates required