computer

या भारतीयाने शाम्पूला जगभर पोचवलं..वाचा शाम्पूच्या जन्म आणि प्रवासाची कहाणी..

या व्यक्तीबद्दल खरं तर आपल्या भारतीयांनाच फार कमी माहिती आहे. या व्यक्तीची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. ही तीच व्यक्ती आहे जिने शांपूला जगभर पोहोचवलं. चला तर त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया.

मंडळी, शांपूचा आणि भारतीयांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो. खर तर शांपू ही भारतीयांनीच जगाला दिलेली भेट आहे. शांपू हा शब्दच मुळात संस्कृतच्या चंपी या शब्दाचा अपभ्रंश आहे. चंपीचा अर्थ होतो मालिश. इथूनच हा जगप्रसिद्ध ‘शांपू’ तयार झाला. या शांपू बद्दल आम्ही आणखी माहिती देऊ, पण आजचा आपला विषय आहे या भारतीय शांपूला जगभर पोहोचवणाऱ्या माणसाबद्दल !!

या व्यक्तीचं नाव आहे ‘शेख दीन मोहम्मद’. या शेख दीनच्या नावाचा उच्चार आज ‘सेक डीन मोहम्मद’ असा केला जातो. हे नाव कसं बदललं हे जरी जाणून घेतलं तरी या माणसाचा संपूर्ण प्रवास आपल्या लक्षात येईल. 

१५ जानेवारी, १७५९ साली पटना मध्ये शेख दीन मोहम्मदचा यांचा जन्म झाला. त्यावेळी पटनावर बंगाल च्या नवाबाचं राज्य होतं. त्यांचे वडील हे ‘नाई’ म्हणजे न्हावी समाजातील होते. ते सरकार दरबारी काम करायचे. प्लासीच्या लढाईनंतर जेव्हा पटना ब्रिटीशांच्या ताब्यात गेला तेव्हा त्यांनी ब्रिटीशांकडे नोकरी पत्करली.

तर, वडील न्हावी त्यामुळे आपसूकच शेख दीन यांनी त्याकाळी न्हावी कामासाठी गरजेची असलेली सगळी कौशल्ये शिकून घेतली. जसे की साबण, अल्कली, क्लेन्झर तयार करणे, चंपी करणे इत्यादी. आणि महत्वाचं म्हणजे शांपू तयार करणे. फार पूर्वीपासून भारतात डोक्याच्या चंपीसाठी शांपू सदृश्य उत्पादन तयार करण्याची परंपरा आहे. पारंपारिकरीत्या हा शांपू आवळ्यापासून तयार करण्यात यायचा. १६-१७ व्या शतकात शांपू तयार करण्याचं काम हे न्हाव्याकडेच असायचं. अशा प्रकारे हे काम शेख दीन यांनी पण शिकून घेतलं.

(प्रातिनिधिक फोटो)

शेख दीन १० वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचा पुढील सांभाळ ब्रिटीश ऑफिसर कॅप्टन ‘गॉड्फ्रे बेकर’ यांनी केला. गॉड्फ्रे हे ब्रिटीश सैन्यात होते. काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी १८८४ साली कामाचा राजीनामा दिला. तोपर्यंत शेख दीन यांनी ब्रिटीशांच्या सैन्यासाठी शिकाऊ सर्जन म्हणून काम सुरु केलं होतं. त्यांनी ज्या सैन्यासाठी काम केलं त्याच सैन्याने मराठ्यांशी दोन हात केले होते. गॉड्फ्रे यांनी नोकरी सोडल्यानंतर शेख दीन यांनी देखील नोकरी सोडली आणि तिथून पुढे त्यांचं आयुष्य बदलत गेलं.

गॉड्फ्रे राजीनाम्यानंतर मायदेशी आयर्लंडला परतले. त्यांच्यासोबत शेख दीन पण होते. दोघेही आयर्लंडच्या कॉर्क शहरी आले. शेख दीन यांनी तिथेच आपलं पुढील शिक्षण सुरु केलं. त्यांचा अभ्यासाचा विषय इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्य हा होता. पुढे ते एका आयरिश मुलीच्या प्रेमातही पडले. त्यांच्या लग्नाला त्या काळी आयरिश लोकांनी प्रखर विरोध केला. शेवटी लग्नासाठी त्यांनी आपला धर्म बदलला आणि त्यांचं लग्न पार पडलं.

शांपूचं युरोपातील आगमन

१८०७ च्या दरम्यान शेख मोहम्मद यांनी पत्नी आणि मुलांसोबत इंग्लंड गाठलं. तिथे त्यांनी बॅसिल कॉक्रेन या उद्योगपतीसाठी काम केलं. बॅसिल कॉक्रेनने त्याच्या घरात एक स्टीम बाथ तयार केलं होतं. या स्टीम बाथचे वैद्यकीय फायदे आहेत असा त्याने प्रचार केला होता. याच स्टीम बाथच्या निमित्ताने युरोप खंडातला शांपूचा पहिला प्रयोग पार पडला. त्याकाळी पहिल्यांदा त्याला चॅम्पू असंच म्हटलं गेलं होतं.

कदाचित शेख दीन यांना स्वतःची ही आयडिया भयंकर आवडली असावी. त्यानी १८१४ साली इंग्लंडच्या ब्राईटटन भागात जाऊन स्वतःचं ‘शांपूईंग स्टीम बाथ’ सुरु केलं. त्यांनीही या बाथचा प्रचार ‘सगळ्या आजारांवर जालीम गुणकारी’ असाच केला होता.

शेख दीन यांच्या ‘शांपूईंग’ पद्धतीमुळे त्यांना वर्षभरातच ‘शांपूईंग सर्जन’ म्हटलं जाऊ लागलं. त्यांच्या खास चंपी आणि मसाज तेलांनी ‘पंचम जॉर्ज’ आणि ‘किंग विल्यम पाचवा’ या राजे मंडळींवर प्रभाव टाकला होता. त्याकाळी तर डॉक्टर ‘शेख दीन ला जाऊन भेट’ असा सल्ला द्यायचे.

राव, या कामात त्यांचं मन फार काळ रमलं नाही. त्यांनी आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर करून घेतला. अर्थात आपण कोणता तरी रेकॉर्ड करतोय हे त्यांना त्याकाळी माहित नव्हतं. त्यांनी १८१० साली इंग्लंड मधलं पाहिलं भारतीय हॉटेल सुरु केलं. या हॉटेलचं नाव होतं ‘’हिंदुस्थान कॉफी हाऊस”.

हे हॉटेल फार काळ चाललं नाही. दुसऱ्याच वर्षी १८११ साली हॉटेल बंद पडलं. गेल्यावर्षी जून, २०१८ रोजी या हॉटेलचं हस्तलिखित मेन्यू तब्बल ८,५०० पाउंडना विकला गेलं.

शेख दीन यांच्या नावे आणखी एक विक्रम आहे. ते इंग्रजीत पुस्तक प्रसिद्ध करणारा पहिले भारतीय आहेत. त्यांनी ‘The Travels of Dean Mahomet’ हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकातून भारताच्या इतिहासाबद्दल आणि तत्कालीन समाजजीवनाबद्दल बरीच नवी माहिती मिळते.

शेख दीन मोहोम्मद यांचा १८५१ साली ब्राईटटन येथे मृत्यू झाला. मृत्यूनंतर काही काळातच त्यांना लोक विसरून गेले. १९८० साली त्याच्याबद्दल पुन्हा माहिती शेधून काढण्यात आली. आणि आज ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

तर मंडळी, अशा या ‘शांपूईंग सर्जन’चं इतिहासात एक महत्वाचं स्थान आहे. शेख दीन मोहोम्मद  यांना बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required