computer

आपण 'किस' का करतो ? वाचा शास्त्रीय कारण !!

काय मंडळी? शीर्षक वाचल्याबरोबर गुदगुल्या झाल्या ना? चुंबन म्हणजे काय असते हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तेवढे जाणकार नक्कीच आहात. पण चुंबन किती प्रकारचे असते आणि आपण चुंबन का घेतो हे जाणून घ्यायला आवडेल ना? चला तर मग करूया चुंबनमीमांसा…

ही गोष्ट फारच खाजगी स्वरूपाची आहे. आपण उठसूट हस्तांदोलन करतो किंवा गळाभेट घेतो तसे कुणाचे चुंबन घेत नाही. यासाठी समोरची व्यक्ती तुमच्या फारच जवळची असायला हवी. नाहीतर तुमचा मिका सिंग झालाच म्हणून समजा. आठवतंय ना ते राखी सावंत प्रकरण? 

तर चुंबन कोणत्या प्रकारचे आहे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. कधी सेक्सची पहिली पायरी म्हणून किस केले जाते, कधी फक्त प्रेम दर्शवण्यासाठी केले जाते, कधी शुभेच्छा देण्यासाठी तर कधी निरोप घेताना सुद्धा चुंबन दिले घेतले जाते. आईने बाळाचे घेतलेले चुंबन हा वात्सल्य दर्शवण्याचा प्रकार असतो. मोठ्या माणसांनी लहानांच्या कपाळाचे घेतलेले चुंबन हे आपुलकी दर्शवणारे असते. 

चुंबन हा प्रकार कसा अस्तित्वात आला याविषयी अनेक थेअरी आहेत. एका शास्त्रज्ञांच्या मतानुसार पूर्वी मनुष्य आदिम अवस्थेत असताना आई आपल्या बाळाला स्वतःच्या तोंडाने भरवत असे. एखादा घन खाद्यपदार्थ आधी स्वतः चावून त्याला बाळाच्या खाण्यायोग्य करून नंतर त्याच्या मुखात सोडत असे आणि इथूनच चुंबनाची सुरुवात झाली असावी. काही जणांच्या मतानुसार चुंबन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही शिकण्याची गरज नाही. आपण भूक लागल्यावर जेवतो तसेच चुंबनही आपोआप घेतो. पण एक मात्र खरं की, अभ्यासानुसार जगातली दहा टक्के लोक अजिबात चुंबनाच्या फंदात पडत नाहीत. ते काय गमावत आहेत याची जाणीव त्यांना नाही असेच म्हणावे लागेल. 

तर आणखी थोडा अभ्यास केला असता असे दिसून येते की, चुंबन हा हार्मोन्सचा खेळ आहे. आपण जेव्हा चुंबन घेतो तेव्हा मेंदूमध्ये ‘ऑक्सिटोसीन’ नावाचे हार्मोन पाझरते. या हार्मोनला ‘लव्ह हार्मोन’ असे सुद्धा म्हटले जाते. ऑक्सिटोसीन आपल्या मेंदूत आनंदलहरी निर्माण करते आणि याच हार्मोनमुळे घनिष्ठता वाढते. 

2013 मध्ये केल्या गेलेल्या अभ्यासानुसार ऑक्सिटोसीन नात्यांमधील बंध मजबूत करण्यासाठी आणि जोडीदाराविषयी एकनिष्ठता राखण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावते. 

महिला जेव्हा आपल्या बाळाला छातीशी धरून दूध पाजवतात तेव्हा हेच हार्मोन स्रवते. त्यामुळे आई आणि मुलांमधील वात्सल्य आणि प्रेमाचे नाते आणखी घट्ट होते. 

एखाद्या विरुध्दलिंगी व्यक्तीला तुम्ही बघता तेव्हा तुमच्या मनात तिच्याविषयी आकर्षण निर्माण होते ना? तिचे चुंबन घेण्याची तीव्र इच्छा मनात येते ना? या कृतीला साहित्यिकांनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. कुणी त्याला ‘लव्ह ऍट फर्स्ट साईट’ असेही म्हणतात. आपल्या आचार्य अत्र्यांनी यावर एक चपखल गाणे लिहिले आहे… 

ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला
छातीत इष्क भाला, की आरपार गेला

तर मंडळी ही कलिजा खलास करण्याची करामत ‘डोपामाईन’ या हार्मोनची आहे बरं का! डोपामाईन हार्मोन हे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात असताना वेगाने स्रवते. याला हॅपी हार्मोन असेही म्हणतात. हे जेवढे जास्त स्त्रवेल तेवढेच शरीराला आणखी हवे असते. थोडक्यात याचे व्यसनच लागते म्हणा ना. ‘लीप लॉक’ अवस्थेत असताना याचे प्रमाणही सर्वोच्च पातळीवर पोचलेले असते. म्हणूनच ओठ लवकर विलग करावे वाटत नाहीत. आहे की नाही गंमत? 

ज्या जोडप्यांचे लग्न दीर्घकाळ टिकते त्यांनी एकमेकांचे दीर्घकाळ चुंबन घेतलेले असते असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. याउलट जे चुंबन टाळतात त्यांचे संसार लवकर मोडतात असेही दिसून आले आहे. 

सेक्स चांगल्या प्रकारे होण्यासाठी चुंबनाचा वाटाही मोठा असावा लागतो. इतर अवयवांपेक्षा ओठांवर शरीरातील सर्वात जास्त नर्व्ह एंडिंग असतात. याचाच फायदा उद्युक्त होण्यासाठी घेतला जातो. जे पुरुष चुंबन घेत नाहीत त्यांच्याशी सेक्स करण्यात स्त्रिया नाखूष असतात असे सर्व्हेमध्ये स्पष्ट झालं आहे. जितका जास्त वेळ चुंबन घ्याल तितकाच जोडीदार खुलतो असं म्हणायला हरकत नाही. 

शेवटी इतकंच सांगता येईल की, चुंबन हे शरीरासाठी आणि नात्यांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु हे सुद्धा लक्षात ठेवावे की, तुम्हाला कितीही चुंबन घेण्याची इच्छा झाली तरी जोडीदाराची इच्छा सुद्धा लक्षात घ्यायला हवी. कुणाचे जबरदस्तीने चुंबन घेणे हा अनैतिक प्रकार आहे, तो टाळायलाच हवा! 

आणखी एक… चुंबनासाठी तोंडाची स्वच्छता राखणेही महत्वाचे आहे! तोंडात जखम असेल, इन्फेक्शन असेल तर अजिबात चुंबन घेऊ नका… 
या गोष्टींचे पथ्य पाळून चुंबनाचा आनंद घ्या. 

लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

 

 

आणखी वाचा :

चक्क ५० तासांच्या चुंबनानंतर तिला बक्षिस म्हणून मिळाली झगमगीत कार !!

सबस्क्राईब करा

* indicates required