computer

ढाबा चालत नाही म्हणून रडणाऱ्या आजोबांचं पुढे काय झालं? व्हायरल व्हिडीओने काय कमाल केली आहे पाहा !!

सोशल मीडिया हा लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सोशल मिडियावर एखादा हिट झाला तर त्याची गोष्ट 'चला तो चांद पर नहीं तो घर पर' अशी होऊन बसते. आधी कसे व्हायचे एखादा ढाबा, एखादी हॉटेल पूर्ण परिसरात प्रसिद्ध असायचे. कारण काय तर माऊथ पब्लिसिटी!! आता हीच प्रसिद्धी सोशल मीडियावर व्हायला लागली आहे.

लॉकडाऊन मुळे दिल्लीत बाबा का ढाबा चालवणाऱ्या एका आजोबांचा ढाबा चालेनासा झाला होता. घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला होता. हे सगळं ते रडकुंडीला येऊन सांगत असतानाचा त्या आजोबांचा व्हिडीओ कुणीतरी सोशल मीडियावर टाकला.

या वयात मेहनत करण्याची तयारी आहे पण ग्राहक नाही म्हणून कमाई होत नाही, या गोष्टीचे अनेकांना वाईट वाटले. सोशल मीडियावर बघता बघता सगळीकडे व्हिडिओ वायरल झाला. रविना टंडन, रणदीप हुडा यांसारख्या स्टार्सनी त्यांच्या ढाब्यावर जाण्याचे लोकांना आवाहन केले.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या बाबा का ढाबावर ते आजोबा गेले. बघतात तर काय, समोर प्रचंड गर्दी, या गर्दीत तिथले स्थानिक आमदारसुद्धा होते. मिडीयादेखील तिथे गोळा झाला. कालपर्यंत त्यांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते, पण आज एवढी गर्दी बघून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

अनेक लोकांची मेहनत करण्याची तयारी आहे, पण सध्या अनेकांच्या हाताला काम नाही, म्हातारपणात ज्यांना घर सांभाळावे लागते, त्यांची तर अधिक वाईट स्थिती, अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक धावून येतात ही गोष्ट खरंच सुखावह आहे.

नीना गुप्तासारख्या अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्रीने मला काम हवं आहे अशी पोस्ट सोशल मिडियावर टाकली होती. त्यानंतर त्यांच्याकडे काही सिनेमे आले होते. लॉकडाऊनमुळे आजकाल सर्कशी चालत नाहीत. त्यातच वन्य प्राणी सर्कशीत दाखवण्यावर बंदी असल्याने तिथे फक्त कसरतीचे खेळच दाखवले जातात. त्यामुळेही सर्कस पाहायला जाणाऱ्या रसिकांचा ओघ आटला आहे. आपलं आणि कुटुंबाचं पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांच्यासमोरही आहे. आजकाल बुक माय शो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सर्कस दाखवली जात आहे आणि त्यांची तिकिटं घ्या असेही सोशल मिडियावर आवाहन केले जात आहे.

थोडक्यात, सोशल मिडियावर प्रख्यात अभिनेत्री ते लोकल ढाबा चालवणारे दोघांनाही मदतीची गरज असते तेव्हा मिळू शकते हेच सिद्ध होत आहे. अशी उदाहरणं पाहिली की सोशल मिडिया शाप की वरदान हा प्रश्नच पडत नाही. हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required