व्हिडीओ ऑफ दि डे : माणसांनी लॉकडाऊनमध्ये ढेऱ्या वाढवल्या, पण हे हत्ती तर चक्क योग करत आहेत ना भाऊ!!

अमेरिकेतल्या ओहायोमधल्या कोलंबस प्राणीसंग्रहालयाने एक व्हिडीओ पोस्ट करून सगळ्यांनाच चकित केलंय. व्हिडीओमध्ये प्राणीसंग्रहालायातील दोन हत्ती चक्क योग करत आहेत. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा
कोलंबस प्राणीसंग्रहालयाने हातींच्या आरोग्यासाठी 'एलिफन्ट योगा प्रोग्रॅम' हाती घेतलाय. सध्या या कार्यक्रमांतर्गत कॉनी आणि हँक या दोन हत्तींना प्रशिक्षण दिलं जात आहे. एक ट्रेनर त्यांच्याकडून योग करवून घेतो. आता या दोघांची निवड का केली याचं उत्तर प्राणीसंग्रहालायाने व्हिडीओसोबत दिलं आहे.
कॉनी हत्तीण ही ४५ वर्षांची आहे. उतार वयातही ती कार्यक्षम राहावी आणि तिचे स्नायू आणि सांधे बळकट राहावे म्हणून तिला रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. हँक हा प्राणीसंग्रहालायाचा सर्वात अवाढव्य हत्ती आहे. त्याचं वजन जवळजवळ ६,८००(!) एवढं आहे. तो उतार वयाकडे झुकायला लागल्यानंतर त्याचं शरीर वृद्धापकाळासाठी तयार असावं म्हणून त्याच्याकडून व्यायाम करून घेतला जात आहे.
नेटकऱ्यांना ही कल्पना चांगलीच आवडली आहे. आतापर्यंत ८४,००० लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ६००० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओवर काही ना काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे की हत्तींना त्यांचा योगाभ्यास आवडलेला दिसतोय. काहींनी तर म्हटलंय की हत्ती माझ्यापेक्षा चांगला योग करू करत आहेत.
तुम्हाला काय वाटतं? या व्हिडीओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.