चक्क मतदानाच्या शाईने उलगडली मर्डर मिस्ट्री....फिल्मी नाही, खरी स्टोरी आहे भाऊ !!

मंडळी, बोटावरची मतदानाची शाई मतदान संपलं की काही कामाची नसते असंच आपल्याला वाटतं. पण मुंबईच्या एका माणसासाठी ती चक्क मेल्यानंतरही उपयोगी पडली आहे. चला तर आज एक आगळीवेगळी पोलीस केस पाहूया.
तर गोष्ट आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर एका माणसाचा मृतदेह आढळला होता. या माणसाचा अर्धा चेहरा खुन्याने दगडाने ठेचला होता. त्यामुळे तो कोण आहे हे पोलिसांच्या लक्षात येत नव्हते. तपासणी केल्यावर त्याच्या शरीरावर गोंदलेलं क्रॉसचं चिन्ह व B आणि K अक्षरं आढळली. याखेरीज त्याच्या बोटांवर मतदानाची शाई पण होती.
या केसमध्ये खुनी कोण आहे हे शोधण्यासाठी फार वेळ लागला नाही. नियाज चौधरी आणि शफीउल्लाह कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. पोलीस कोठडीत ते पोपटासारखे बोलले. त्यांच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी नशेसाठी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला पकडलं होतं. तो जेव्हा प्रतिकार करू लागला तेव्हा दोघांनी मिळून त्याला जीवे मारलं.
मंडळी, दोघांनी एवढी माहिती तर दिली. पण अजून हे माहित कळालं नव्हतं की ही व्यक्ती होती आहे तरी कोण? दोघांना याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की “आम्ही याला ओळखत नाही.” खरंतर दोघांनी समोर जो दिसेल त्याला लुटायचं ठरवलं होतं
पोलिसांकडे आता मृताची ओळख पटण्यासाठी केवळ त्याच्या शरीरावरच्या खुणांचाच आधार राहिला होता. त्यांनी मृत व्यक्तीचा थोडाफार चेहरा असलेले पोस्टर्स शिवाजी नगर आणि देवनार भागात लावले. स्थानिक टीव्ही चॅनेलवरून त्याच्याबद्दल माहिती दिली, पण मृत व्यक्तीला ओळखणारं कोणीही आलं नाही.
पोलिसांना एक गोष्ट समजली होती की ती व्यक्ती स्थानिक भागात राहणारीच आहे. त्याच्या हातावरची शाई पण हेच सांगत होती. पोलिसांनी मग एक टीम तयार करून त्या भागतल्या सगळ्या मतदारांची यादी मागवली. या यादीत तब्बल ३.५ लाख नावं होती. आता या लाखांच्या ढिगाऱ्यातून त्या एकाला कसं शोधायचं ?
मंडळी, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, CID मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की पोलीस एकेक धागा पकडत शेवटापर्यंत जातात. या केसमध्ये पण अशाच लहान लहान धाग्यांचा उपयोग झाला. पहिली गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचं वय हे ४० च्या आत होतं त्यामुळे जेवढे पुरुष ४० पेक्षा जास्त वयाचे होते त्यांना काढून टाकण्यात आलं. पोस्टमॉर्टेममध्ये असं आढळलं होतं की मृत व्यक्तीची सुंता झाली नव्हती, त्यामुळे ती व्यक्ती मुस्लिम नसणार हे पक्कं झालं आणि सगळ्या मुस्लिम व्यक्तींना यादीतून वगळण्यात आलं. उरलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्याशी मृताचा चेहरा जुळतोय का हे बघण्यात आलं. याखेरीज त्या व्यक्तीच्या हातावर क्रॉसचं चिन्ह असल्याने कोणी नजीकच्या काळात धर्म बदलला आहे का याचाही पडताळा करण्यात आला. यादीत B आणि K पासून सुरु होणाऱ्या नावांची वेगळी यादी काढण्यात आली होती.
एवढ्या सगळ्या गाळणीतून गेल्यावर ३.५ लाख नावांमधून उरली ती केवळ १२५ नावं. या मधून त्या एका व्यक्तीला ओळखण्यात पोलिसांना यश आलं. हे नाव होतं ‘किरण वानखेडे’.
किरणच्या घरी जाऊन तपासणी केल्यावर त्याच्या आईने मुलाला ओळखले. तिच्याकडे चौकशी केल्यावर समजलं की त्याच्या हातावरचं K हे त्याच्या स्वतःच्या नावाचं अक्षर होतं, तर B हे त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या नावाचं अक्षर होतं. उरला प्रश्न क्रॉसचा, तर त्याबद्दल आईने सांगितलं की त्याचे मित्र क्रॉस गोंदवून घेत होते तर त्यानेही तो सहज गोंदवून घेतला होता.
तर मंडळी, अशा प्रकारे एका मतदानाच्या शाईने लाखोंच्या ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला शोधून काढण्यात मदत केली.