computer

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायचा विचार करताय? मग तत्पूर्वी ही माहिती वाचून घ्या..

पर्यटनासाठी चांगली जागा शोधणे सोपे काम नाही. फिरायला निघण्याआधी बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. एवढं वाचून तुमचं मन परदेशाचं सोडा, पण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या पर्यटनस्थळांना भेटी देऊन आलं असेल. पण थांबा, आम्ही तुम्हांला आपल्या महाराष्ट्रातलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण सुचवत आहोत आणि त्याचा अधिक विचार करावा म्हणून तिथे काय आहे याची यादीही देत आहोत..

ताडोबा महाराष्ट्रातले सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. याला ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून पण ओळखले जात असते. १९३५ साली या भागात शिकारीवर बंदी घालण्यात आली आणि १९५५ साली हे राष्ट्रीय उद्यान म्हणून अस्तित्वात आले. १९८६ साली या ठिकाणी अभयारण्य तयार करण्यात आले, तर १९९५ साली अभयारण्य आणि उद्यान यांचे विलीनीकरण करण्यात आले. हे उद्यान एकूण ६२५ चौरस किमी भागात पसरले आहे.

१९३५ साली या भागात शिकारीवर बंदी घालून १९५५ साली हे राष्ट्रीय उद्यान म्हणून अस्तित्वात आले. १९८६ साली अभयारण्य तयार करण्यात आले होते. तर १९९५ साली अभयारण्य आणि उद्यान यांचे विलीनीकरण करण्यात आले. हे उद्यान एकूण ६२५ वर्गकिमी भागात पसरले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील हे उद्यान नागपूरहुन १५० किमी अंतरावर आहे. २०१० साली झालेल्या मोजणीनुसार ताडोबामध्ये ४३ वाघ आहेत, जे देशात सर्वात जास्त आहेत. ताडोबाला तीन विविध क्षेत्रात विभागले गेले आहे. उत्तर ताडोबा, कोल्सा दक्षिण सीमा, मोहरली रेंज असे ते तीन भाग आहेत.

ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान- कसे जाल, काय पाहाल, किती खर्च येईल आणि बरंच काही जाणून घ्या..

 

पाण्याचे इथे तीन स्रोत आहेत. यात ताडोबा लेक, कोल्सा सरोवर, ताडोबा नदी यांचा समावेश आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान सफारी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. गाईडसोबत खुल्या जिप्सी किंवा बसमध्ये जंगल सफारी केली जाऊ शकते. खुली जीप सफारी जंगली जीवन, अस्वल आणि इतर गोष्टी शोधून त्याचा अनुभव घेणे मजेशीर ठरू शकते.

या व्यतिरिक्त हे उद्यान खालील विभागांमध्ये विभागण्यात आले आहेत.

ताडोबा झोन - हा भाग सुंदर ठिकाणे आणि पशु स्पॉटिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चार प्रवेशद्वार आहेत.

मोहरली किंवा महूरली झोन - प्राण्यांचा शोध घेण्यासाठी हे ठिकाण सर्वात चांगले आहे. सफारीच्या अनुषंगाने हे एक प्रसिद्ध आणि आदर्श स्थान आहे. एवढेच नव्हे तर उद्यानाचा प्रमुख भाग यालाच समजले जाते.

कोल्सा झोन - हा विभाग जंगलाने भरलेला आहे. जंगली प्राणी बघायला मिळणे इथे सोपे नाही.

उत्तर भाग - उद्यानाचा उत्तर भाग हा दाट जंगल आणि डोंगरांसाठी प्रसिध्द आहे. उंचीवरून बघितल्यावर हा भाग खऱ्या अर्थाने सुंदर दिसतो. उद्यानाच्या पश्चिम सीमेवर पण डोंगर आहेत, यांची उंची ही २०० ते ३५० मीटर इतकी आहे.

दक्षिण भाग - जवळपास ३०० एकरांचे ताडोबा सरोवर येथे आहे. हे एखाद्या सीमेप्रमाणे शेतीला उद्यानापासून वेगळे करते. या ठिकाणी मगर आणि इतर प्राणी दिसतात.

या उद्यानात साग ही प्रमुख झाडांची जात आढळून येते. याबरोबर ऐन (मगरीची साल), बिजा, तेंदू हे वनस्पती आढळतात. तसेच बांबूची झाडे इथे मुबलक आहेत. येथील खाज- कुईली ही वनस्पती पार्किन्सन या रोगावर उपयोगी आहे.

ताडोबा हे अनेक सस्तन प्राण्यांचे वसतिस्थान आहे. सांबर, हरण, नीलगाय, चितळ, चौशिंगा, यांचा यात समावेश होतो. तसेच लुप्त भारतीय अजगर, इंडियन कोब्रा हे देखील इथे आढळतात. येथे पक्ष्यांच्या १९५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे मंगळवारी बंद असते. तसेच पावसाच्या दिवसांत सहसा जून ते ऑक्टोबर या कालावधीतही ते बंद ठेवण्यात येते. ताडोबात प्रवेशासाठी २० रुपये दरडोई तिकीट आहे. उद्यानात फिरण्यासाठी वाहन असेल तर त्यासाठी ५० रूपये तिकीट आहे. तर कॅमेरा घेऊन जाण्यासाठी दोन रुपये आहेत. गाईडचे १०० रुपये द्यावे लागतात. यावरुन तुम्ही तुमच्या समूहासाठी किती खर्च येऊ शकेल याचा अंदाज बांधू शकाल.

ताडोबाला भेट देण्यासाठी खालील साधने उपलब्ध आहेत.

विमान - सर्वात जवळचे विमानतळ हे नागपूर इथे आहे. नागपूरहून अनेक गाड्या थेट ताडोबाला घेऊन जातात.

रेल्वे - चंद्रपूर रेल्वे स्टेशन हे ४५ किमी अंतरावर आहे. रेल्वेने चंद्रपूरला येऊन गाड्यांनी ताडोबाला जाता येते.

मग, विचार करा आणि ताडोबाला जायचा प्लॅन बनवा. तिथून आल्यावर वाघांचे आणि इतर प्राणी-झाडांचे फोटोही आमच्यासोबत शेअर करायला विसरु नका..

 

सबस्क्राईब करा

* indicates required