सलग तीन वर्षे किताब मिळवणारी ही खरोखरी सर्वोत्कृष्ट श्वान होती?

आपण एखाद्या व्यक्तीला महान किंवा सर्वोत्कृष्ट म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये इतरांपेक्षा नक्कीच काही तरी वेगळं असतं. धावपटू म्हटल्यावर पी.टी. उषा किंवा उसेन बोल्ट ही दोन नावं आपल्याला आठवतात किंवा क्रिकेटचा विचार केला तर सचिन तेंडूलकर, डॉनल्ड ब्रॅडमन ही नावं समोर येतात. ही नावं त्यांच्या अफलातून कामगिऱ्यांसाठी आपल्याला लक्षात राहिली आहेत. पुढच्या अनेक पिढ्या ही नावं याच कारणांनी आपल्या लक्षात राहतील.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का एका प्राण्याने आपल्या हयातीत अशी काही कामगिरी केली की त्याचं नाव इतिहासात कोरलं गेलं आणि त्याला सर्वोत्कृष्ट म्हटलं गेलं? आज आम्ही माणसाबद्दल नाही, तर एका कुत्र्याबद्दल बोलत आहोत. तिचं नाव आहे ‘वॉरेन रेमेडी’. आहे म्हणण्यापेक्षा होती कारण ती १९०० व्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेली. म्हणजे आजपासून १०० वर्षांपूर्वी.
वॉरेन रेमेडीला एखाद्या सेलिब्रिटीचा दर्जा मिळण्याचं कारण ठरली ‘वेस्टमिन्स्टर केनल क्लब डॉग शो’ ही स्पर्धा. ही स्पर्धा कुत्र्यांच्या सर्व प्रजातींसाठी खुली असते आणि ती १८७७ सालापासून आजतागायत सुरु आहे. या स्पर्धेला अमेरिकेत आणि जगभरातही मोठा मान आहे. वॉरेन रेमेडीने या शोच्या १९०७, १९०८ आणि १९०९ या तिन्ही वर्षांचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे ती एका रात्रीत सेलिब्रिटी झाली. चौथ्या वर्षात तिला हार पत्करावी लागली. मात्र ज्या कुत्र्याने तिला हरवलं होतं तो तिच्याच कुटुंबातला होता.
पुढे वाचण्यापूर्वी आपण आधी वॉरेन रेमेडी ज्या श्वान प्रजातीतील होती त्याबद्दल वाचूया.
वॉरेन रेमेडी ‘फॉक्स टेरियर’ श्वान प्रजातीतील स्मूथ फॉक्स टेरियर प्रकारातील होती. फॉक्स टेरियर प्रजातीचा इतिहास खणला तर तो ब्रिटीश आयल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वीपसमूहांपर्यंत जाऊन पोहोचतो. १९ व्या शतकात या कुत्र्यांचा वापर उंदीर पकडण्यासाठी केला जायचा. त्यांच्या चपळाईमुळे ही जमात चांगली प्रसिद्ध होती.
फॉक्स टेरियर प्रजातीत दोन प्रकार होते. स्मूथ फॉक्स टेरियर आणि वायर फॉक्स टेरियर. मूळ ब्रिटीश टेरियर जमातीतून हे दोन प्रकार तयार झाले. पुढे या दोन प्रकारातून आणखी प्रकार तयार झाले. या दोन मुख्य प्रकारांमध्ये वायर फॉक्स टेरियर जमातीतील कुत्रे केसाळ असतात. शिवाय स्मूथ फॉक्स टेरियरच्या मानाने त्यांच्या शरीरावर जास्त चट्टे असतात. दोघांच्या उंचीतही फरक असतो. सोबत दिलेले फोटो पाहा.

(स्मूथ फॉक्स टेरियर आणि वायर फॉक्स टेरियर)
आता पुन्हा वळूया आपल्या स्टारकडे. १८८० साली मॅनहॅटन येथे राहणाऱ्या विंथ्रोप रुदरफर्ड नावाच्या उच्चभ्रू व्यक्तीने फॉक्स टेरियर प्रजातीचं संवर्धन सुरु केलं होतं. रदरफर्ड यांनी संपूर्ण अमेरिकेत या प्रजातीचा प्रचार, प्रसार केला. ते ‘अमेरिकन फॉक्स टेरियर क्लबचे’ अध्यक्ष होते. त्यांनी न्यूजर्सी राज्यातल्या वॉरेन तालुक्यात कुत्र्यांसाठीच्या कॅनल्सची (घर) स्थापना केली होती. अमेरिकेतलं फॉक्स टेरियर जमातीचं हे पहिलं कॅनल होतं. वॉरेन तालुक्यामुळे तिथे सांभाळल्या जाणाऱ्या कुत्र्यांनाही तशीच नावे मिळाली. आता समजलं वॉरेन रेमेडीला ‘वॉरेन’ रेमेडी कां म्हणतात?
(विंथ्रोप रुदरफर्ड)
तर, विंथ्रोप रुदरफर्ड यांनी अख्ख्या अमेरिकेत फॉक्स टेरियर जमातीचा बोभाटा केल्यानंतर त्याला आणखी प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम या वॉरेन रेमेडीने केलं. वॉरेन रेमेडीच्या सलग तीन वर्षातल्या विजयानंतर पुढील स्पर्धांमध्ये फॉक्स टेरियर प्रजातीचा दबदबा निर्माण झाला. हा दबदबा आजही तसाच आहे. २०१९ सालचा विजेता असलेला ‘किंग’ हा वायर फॉक्स टेरियर्स प्रजातीतील आहे. हा पण एक गोष्ट इथे नमूद करावीच लागेल. ती अशी की वॉरेन रेमेडी नंतर स्मूथ फॉक्स टेरियर प्रकारातील कोणालाही विजय मिळवता आलेला नाही.
तर, आता शेवटी जाता जाता एका महत्त्वाच्या प्रश्नावर बोलूया. वॉरेन रेमेडीला श्वान प्रजातीत सर्वोत्कृष्ट का मानलं जातं?
या प्रश्नाचं उत्तर आहे, ती सर्वोत्कृष्ट होती पण तिला श्वान प्रजातीतील सर्वोत्कृष्ट म्हणता येणार नाही. तिने सलग तीन वर्षं विजय मिळवला असला तरी त्याकाळात अमेरिकेत होणाऱ्या इतर स्पर्धा इतर श्वान प्रजाती गाजवत होत्या.
तिच्या विजयाला एक वेगळी बाजू देखील होती. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा विंथ्रोप रुदरफर्ड साहेबांकडे जावं लागेल.
१८७७ साली ‘वेस्टमिन्स्टर केनल क्लब’ने सर्व श्वान प्रजातींसाठी ‘वेस्टमिन्स्टर कॅनल क्लब डॉग शो’ ही स्पर्धा सुरु केली. १८७७ ते १९०७ पर्यंत ही स्पर्धा एक सामान्य स्पर्धा म्हणून गणली जायची. १८८० साली विंथ्रोप रुदरफर्ड यांनी फॉक्स टेरियर कुत्र्यांसाठी कॅनल तयार केला. १९०७ साल उजाडेपर्यंत विंथ्रोप रुदरफर्ड हे वेस्टमिन्स्टर कॅनल क्लबच्या कमिटीचे सदस्य झाले होते. त्यांनी स्पधेचे मापदंड ठरवले. त्यांनी स्वतःचं वजन वापरून स्पर्धेत फक्त स्मूथ फॉक्स टेरियर आणि वायर फॉक्स टेरियर जिंकतील याची व्यवस्था केली होती.
या पडद्या मागच्या गोष्टींचा विचार केला तर वॉरेन रेमेडीने सलग ३ वेळा विजय मिळवला याचं आश्चर्य वाटणार नाही. पण रियालिटी शो नसलेल्या काळात हा विजय सगळ्यांनीच डोक्यावर घेतला. ती एका रात्रीत स्टार बनली. तिने कुत्र्यांसाठी खास तयार करण्यात येणाऱ्या ‘डॉग केक्स’ची जाहिरात केली. तिच्याबद्दल वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातमी असायची. एवढंच नाही तर आज इतिहासात तिचं नाव आहे.
६ ते ७ वर्षांच्या आयुष्यात तिने ती सगळी प्रसिद्धी उपभोगली जी एका कुत्र्याला त्या काळात किंवा आजही मिळणं दुर्मिळ आहे. या प्रसिद्धी मागे विंथ्रोप रुदरफर्ड या उच्चभ्रूचा वरदहस्तही होता ही गोष्ट नितळ पाण्यासारखी स्वच्छ आहे.
स्पर्धेतलं गौडबंगाल बाजूला ठेवलं तरी तिची पुण्याई विसरून चालणार नाही. तिच्यामुळे संपूर्ण फॉक्स टेरियर जमातीला वरचं स्थान मिळालं. ते स्थान आजही टिकून आहे.