computer

'ब्लॅक कॅट कमांडोज'ची खतरनाक शस्त्रे - भाग १

एनएसजी - नॅशनल सिक्युरीटी गार्ड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला ! त्या अतिरेकी हल्ल्याचा सामना  सुरुवातीला केवळ एकटे मुंबई पोलीस करत होते पण हा हल्ला सर्वसामान्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडचा होता. आपल्या महाराष्ट्र पोलीसांच्या धैर्यात कमी नव्हती - विश्वास नांगरे पाटील -देवेन भारती यांच्या सारखे अधिकारी उपलब्ध असलेल्या शस्त्रांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देत होते पण त्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांना मर्यादा होत्या. समोर दुश्मनांच्या हातात अत्याधुनीक शस्त्रास्त्रे होती. अशावेळी गरज होती अत्यंत आधुनीक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आणि अतिरेकी हल्ल्याचा सामना करण्याचा अनुभव असलेल्या लढाऊ दलाची ! म्हणजेच “ब्लॅक कॅट कमांडोज”ची !! एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो आले आणि जवळ जवळ साठ तासाच्या लढाईनंतर जेव्हा ताजमध्ये शेवटचे चार अतिरेकी संपले तेव्हा हा अतिरेकी हल्ला संपुष्टात आला.

आज शनिवार स्पेशल मध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्लॅक कॅट कमांडो वापरात असलेल्या शस्त्रांबद्दल !!

भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे असणारा शस्त्रसाठा हा ब्रिटिशांनी वापरून उरलेला जुनाट शस्त्रसाठा होता. दुसऱ्या महायुद्धातील वापरले गेलेल्या काही तोफा पण आपल्याकडे होत्या. विकसनशील देशाला शस्त्रसाठ्यासाठी स्वतंत्र आणि मोठं बजेट देणं फार कठीण होतं, पण १९६५ आणि १९७१ या दोन युद्धानंतर शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण ही काळाची गरज होती.

मध्यपूर्वेत भडकलेल्या अनेक युद्धानंतर आधुनिक शस्त्रास्त्रे अतिरेकी गटांकडे आली. या अतिरेक्यांच्या हल्ल्याची दिशा जेव्हा भारताकडे वळली तेव्हा त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी अनेक नव्या शस्त्रदलांची स्थापना करावी लागली. उदाहरणार्थ, NSG, SPG, पॅरा कमांडो, वगैरे. अतुलनीय मनोबालासोबत आधुनिक शस्त्रास्त्रांचे पाठबळ आवश्यक होते. ती पूर्तता आता झाली आहे हे पुढे वाचल्यावर तुम्हाला कळेलच.

ग्लॉक-१७ पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर :

ज्याला 'स्मॉल आर्म्स' असे म्हटले जाते त्या क्ष्रेत्रात ग्लॉक हे नाव अग्रगण्य आहे. गॅस्ट्न ग्लॉक या इंजीनीअर ने सुरु केलेल्या या कंपनीच्या शाखा आता जगभर आहेत आणि बहुतेक सर्व देशांच्या अँटी टेररीस्ट पथकात ग्लॉक १७ ते ग्लॉक २० या जातीची पिस्तूलं वापरली जातात. या पिस्तूलाची कॅलीबर म्हणजे नळीचा व्यास ९ मिलीमिटर आणि काडतूसाची लांबी (पॅरबेलम)१९ मिलीमिटर असते. आपल्या ब्लॅककॅटच्या सैनिकांना दिल्या जाणार्‍या या पिस्तूलात साइडरेल म्हणजे एक खाच्या असतो ज्यामध्ये लेझर किरणांनी लक्ष्य केंद्रीत करण्याची सोय असते.

हेकलर कॉश सब मशीन गन.

Heckler & Koch MP5A3/A5/SD3/SD6/K या सबमशीन गन जर्मनीतून आयात केल्या जातात. सोबत दिलेल्या कोडमध्ये एमपी चा अर्थ मशीनेनपिस्टोल (Maschinenpistole ) - एसडी म्हणजे आवाज कमी करणारे किंवा आवाजाला दाबून टाकणारे (Schalldämpfer) -के म्हणजे कमी अंतरासाठी ( Kurz ) या प्रमाणे आहे. याची खासियत अशी की या सब मशीन गनचा रीकॉइल म्हणजे गोळी झाडल्यावर दस्ता मागे येण्याची क्रिया नियंत्रित असल्याने गोळीचे लक्ष्य सहज साधले जाते. त्याखेरीज गोळ्या झाडण्याची क्रिया नियंत्रीत करता येते. त्यामुळे काडतूसे वाया जात नाहीत. या प्रजातीतल्या अनेक वेगवेगळ्या सब मशीनगन आवश्यकतेप्रमाणे वापरल्या जातात.

अ‍ॅसॉल्ट रायफल :

या रायफल आवश्यकता असेल त्याप्रमाणे  ऑटोमॅटीक किंवा सेमी ऑटोमॅटीक अशा दोन्ही पध्दतीने वापरता येतात. या प्रकाराला सिलेक्टीव्ह फायरींग असेही म्हटले जाते. वर उल्लेख केलेल्या सब मशीनगनपेक्षा या रायफलचा पल्ला जास्त असतो. ब्लॅक कॅट कमांडोंच्या या रायफल अनेक वेगवेगळ्या देशात बनवलेल्या आणि त्या अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या असतात.

SIG SG 551SB/SG 553LB/SG 553SB

या रायफल स्वित्झरलंडमध्ये बनतात. SIG म्हणजे (Schweizerische Industrie Gesellschaft)  SG म्हणजे sturmgewehr.  हा एक जर्मन शब्द असून याचा अर्थ होतो अ‍ॅसॉल्ट रायफल.

बॅरेटा SC70/90

युरोपातील सर्वात जुनी शस्त्र बनवण्याची परंपरा असलेली कंपनी म्हणजे बेरेटा.आपल्या इतिहासात १५२६ साली जेव्हा पानीपतची पहिली लढाई झाली तेव्हा युरोपात या कंपनीची स्थापना झाली . पाचशे  वर्षांहून अधिक इतिहास असणार्‍या या कंपनीचे मूळ नाव FABBRICA D’ARMI PIETRO BERETTA S.p.A.असे आहे. सध्या या कंपनीचा कारभार बघणारी ही १५ वी पिढी आहे. Beretta SC70/90 या रायफलचा उपयोग बर्‍याच देशात केला जातो.

M16A2

M16A2 ही अ‍ॅसॉल्ट रायफल सुरुवातीला  M16 या नावामे अमेरीकेच्या हवाईदलासाठी तयार करण्यात आली होती. या जातीच्या बंदूकांमध्ये जसेजसे बदल झाले त्याप्रमाणे मॉडेलची नावे बदलण्यात आली. व्हिएटनाम च्या युध्दात आलेले अनुभव लक्षात घेउन त्यानंतर बरेच बदल करण्यात आले. ही रायफल वापरणारा सैनीक जर अनुनभवी असेल ऑटोमॅटीक मोडमध्ये तर गोळ्यांचा मारा अचूक होत नाही. यासाठी तीन वेगवेगळ्या राउंडमध्ये गोळ्या झाडल्या जातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या खेरीज बंदूकीचा दस्ता ड्युपाँटच्या खास प्लॅस्टीक आणि ग्लासचा वपर करून बनवण्यात आला आहे. नळीचे टोक रॉकेट लॉंचर सारखे वापरता येईल अशी पण व्यवस्था करण्यात आली आहे. या रायफलची पुढची आवृत्ती  M16A4 आल्यानंतर अमेरीकन लष्करात  या अ‍ॅसॉल्ट रायफलचा वापर केला जात नाही.

FN SCAR-L

FN SCAR-L ही पण एक अ‍ॅसॉल्ट रायफल या सदरात मोडणारी बंदूक आहे. FN चा अर्थ फॅब्रीक नॅशनल तर SCAR हा शब्द  Special  Combat Assault Rifle यामधील सुरुवातीचे एक अक्षर घेऊन करण्यात आले आहे .या रायफलचे वैशिष्ट्य असे की ही गॅस ऑपरेटेड  आहे. त्याखेरीज ही रायफल पूर्णपणे मॉड्यूलर स्वरुपाची आहे. मॉड्यूलर म्हण्बजे या रायफलचे भाग सुटे  करून ठेवता येतात.

AKMS - एके -४७

AKMS - एके -४७ हे नाव आपल्या परीचयाचे आहेच. एके -४७ ज्या तज्ञाने, मिखाइल कॅलॅश्नीकोव्हने, डिझाइन केली त्यानेच AKMS ही अ‍ॅसॉल्ट रायफल बनवली.महत्वाचा फरक असा आहे की या रायफलची नळी स्टँपींग करून बनवली आहे. एके -४७ ची नळी ओतीव होती. या खेरीज हे डिझाईन आटोपशीर बनवण्यात आलेले आहे. रशियात तयार होणारी ही रायफल शंभराहून अधिक देशात वापरली जाते.

 

याखेरीज बऱ्याच शस्त्रास्त्रांची माहिती आपण पुढच्या शनिवारी दुसऱ्या भागात वाचणार आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required