computer

अंधेरी-मालाड स्टेशनवर यमराज काय करतोय ? जाणून घ्या !!

मुंबईच्या लोकलचा प्रवास अनेक कारणांनी धोक्याचा आहे, पण काहीवेळा लोक स्वतःहून संकट ओढवून घेतात. उदाहरणार्थ रेल्वे रूळ ओलांडणे, दोन रुळांमधलं कुंपण ओलांडून जाणे. काहीही करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या घाईत असे प्रकार घडत असतात.  हे रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावर नेहमीच दर पाच मिनिटाने घोषणा होत असते. तरीही लोक ऐकत नाहीत हे बघून रेल्वे विभागाने आता एक नवीन शक्कल लढवली आहे.

पश्चिम रेल्वे विभागाने लोकांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून थांबवण्यासाठी आता थेट यमराजाला पाचारण केलंय. पण हा यमराज लोकांना स्वर्गात न्यायला आलेला नाही. तो प्रवाशांना वाचवायला आलाय. म्हणजे जेव्हा एखादा प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना दिसेल तेव्हा हे यमराज त्या प्रवाशाला उचलून सुरक्षित स्थळी पोचवतील.

हे यमराज म्हणजे यमराजच्या वेशातला माणूस हा रेल्वे संरक्षण दलातील जवान आहे. ६ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या जागरूकता मोहिमेत तो सामील झाला होता. पश्चिम रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या लोकांना उद्देशून “जो भी पटरी क्रॉस करेगा उसे उठाही लेके जाऊंगा” म्हणताना दिसतोय.

रेल्वे जागरूकता मोहिमेसाठी पश्चिम रेल्वेने अंधेरी आणि मालाड या दोन स्टेशन्सची निवड केली आहे, कारण रेल्वे रूळ ओलांडणे किंवा मधल्या कुंपणावरून उडी टाकणे असे प्रकार या भागात जास्त होतात.

सोशल मिडीयावर हा प्रकार चांगलाचगाजला आहे. तो व्हायरलही होतोय. पश्चिम रेल्वेने ज्या उद्देशाने यमराजला बोलावलंय त्याला या माध्यमातून यश यावं एवढंच वाटतं.