computer

नव्या आर्थिक आघाडीकडे नेणारी अकाउंट ऍग्रिगेटर संकल्पना काय आहे समजून घ्या !

 दिवस गेले जेव्हा सोन्यावर कर्ज घेण्यासाठी पण मामाला तारण ठेवायला लागायचं! आता कर्ज घेणं फारच सोपं झालंय! दिवसाला दहा कंपन्या 'आमच्याकडूनच कर्ज घ्या' असा जोगवा मागत असतात!
पण ही फक्त सुरुवात असते.आधी फॉर्म भरा, आयटीआरच्या कॉप्या जोडा, चार फोटो, केवायसी द्या,कॅन्सल्ड् चेक द्या, पुढच्या हप्त्याचे पीडीसी द्या -एक नाही हजार चौकशांना तोंड देता देता कर्ज घेण्याची इच्छाच मरायला टेकते. पण म्हणतात ना, 'मरता क्या न करता' अशी परिस्थिती असली तर हे सगळं करावंच लागतं. थोडक्यात, आधी फक्त दोरीवरच्या उड्या मारण्याची कसरत प्रत्यक्षात १००० मीटरची अडथळ्याची शर्यत वाटायला लागते.

पण आता एक गुड न्यूज वाचा! रिझर्व बँकेने हे सगळेच पैशाचे व्यवहार सोपे करण्यासाठी 'अकाउंट अ‍ॅग्रीगेटर' ही संकल्पना अमलात आणली आहे. हे समजून घेण्याचे दोन मार्ग आहेत. त्यापैकी अगदी राजमार्ग म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मूळ सर्क्युलर वाचणे. अडचण अशी आहे की त्यात clause (iv) of sub-section 1 of section 3.... अशा खंग्री भाषेत शंभर दोनशे उल्लेख आहेत. ते सहन करता येत असेल तरच वाचा! आम्हाला ते वाचायला ७२ तास लागले तुमचं तुम्ही बघा बॉ! दुसरा सोप्पा मार्ग म्हणजे हा लेख पुढे वाचा !
 

एखादा खेळ आपण समजून घेतो तसे हे समजून घ्या.

सर्वात आधी या खेळात कोण कोण भिडू आहेत ते बघू या. एक नंबरचा भिडू आपण स्वतःच म्हणजे ग्राहक किंवा युझर. तो आपल्या फायनान्शिअल अ‍ॅसेटची म्हणजे आपली कागदावर दाखवता येईल अशी बचत-गुंतवणूकीची इत्थंभूत यादी एकाच ठिकाणी जमा करू शकतो. आता 'कागदा'वर असा उल्लेख करण्याचा उद्देश असा की घरातील सोनंनाणं -गावाकडला जमीन जुमला याचा अंतर्भाव त्यात करता येत नाही. आपल्या सोयीसाठी सोबत एक पूर्ण यादी देऊ शकतो, पण ती वाचताना कंटाळा येईल म्हणून ती लेखाच्या शेवटी जोडतो. आता चर्चेसाठी इतकेच लक्षात ठेवा की आपली बचत खाती- शेअर-डिबेंचर-एफडी-इन्शुरन्स पॉलीसी यांची एकत्र माहिती इथे जमा ठेवता येते. या सोबत केवायसीचे सर्व कागदपत्रं पण जमा होतात.

दुसर्‍या बाजूला सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा आणि गरजा यांचे पुरवठादार म्हणजे खेळातला भिडू नंबर दोन. त्यात बँका -म्युच्युअल फंड- एनबीएफसी- इन्शुरन्स कंपन्या वगैरे.अर्थात यांना या खेळात घ्यायचं अथवा नाही हे रिझर्व्ह बँक ठरवते. त्यासाठी त्यांची नोंदणी Financial Information Providers (FIP)/ Financial Information Users (FIU) या वर्गवारीत केली जाते. आता (FIP) आणि (FIU) म्हणजे कोण सोबतच्या चित्रात बघा.

दोन बाजूंचे खेळाडू आपल्याला समजले. पण या खेळात खेळाडूंपेक्षा अंपायरला किंवा रेफ्रीला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि त्याला म्हणतात अकाउंट अ‍ॅग्रीगेटर. तुमची माहिती सुरक्षित जमा ठेवणे आणि तुम्ही सांगाल त्या संस्थेला तुमच्या परवानगीनेच देणे हे अकाउंट अ‍ॅग्रीगेटरचे काम आहे.
आता साहजिकच आहे की तुम्ही म्हणाल गेम काय आहे ते तर सांगा राव!! तर आपण आता मुद्द्याला येऊ या. समजा तुम्हांला कर्ज हवे आहे आणि तुम्ही तुमचे नाव अ‍ॅग्रीगेटरकडे नोंदवले असेल तर तुम्ही परवानगी दिल्यावर तुमची सर्व माहिती कर्ज देणार्‍या बँकेला /संस्थेला एका क्लिकवर मर्यादीत काळासाठी दिली जाईल. इथे तुमची सहमती ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. देणार्‍याला आणि घेणार्‍याला संमती दिल्यावरच जोडण्याचे काम अकाउंट अ‍ॅग्रीगेटर करतो. तुमची सहमती ही जमा झालेल्या 'डेटा'ची चावी आहे. थोडक्यात, तुमच्या परवानगीशिवाय तुमची पत्रिका समोरच्या पार्टीकडे दिली जाणार नाही.

साध्या स्वरुपात सांगायचे तर अ‍ॅग्रीगेटरची भूमिका दोघांना जोडणार्‍या पाइपलाइनसारखी असेल.अ‍ॅग्रीगेटरकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गोपनीय माहितीचा साठा जमा असेल. या गोपनिय माहितीची सुरक्षा हीअ‍ॅग्रीगेटरची जबाबदारी असेल. ही जोडणी ज्या सॉफ्वेटअर द्वारे केली जाते त्याला एपीआय असे म्हणतात. हा एपीआय अभेद्य असला पाहीजे ही प्राथमिक जबाबदारी अ‍ॅग्रीगेटरचीच असेल. हा एपीआय कोणत्याही तांत्रिक अडचणी शिवाय सहज चालेल हा त्यातला दुय्यम मुद्दा आहे. असा एपीआय देणार्‍या कंपन्यांचे नोंदणीकरण करून त्यांचे वेळोवेळी ऑडीट करणे आणि दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे हे काम रिझर्व्ह बँक करणार आहे. अकाउंट अ‍ॅग्रीगेटरला कोणत्याही व्यवहारात भाग घेता येणार नाही. म्हणजे दलाली करता येणार नाही. एपीआय देण्याचा मेहेनताना हीच अ‍ॅग्रीगेटरची कमाई असेल.
 

आता या व्यवहारात कोणाला काय मिळेल ते सारांशात बघू या .

१ एरवी किचकट असलेल्या सर्व पायर्‍या टाळून सर्वसामान्य माणसाला एका क्लिकवर आर्थिक सेवांची सुविधा मिळेल. हा त्या ग्राहकाचा फायदा असेल.

२ कोणतीही आर्थिक सेवा देणार्‍या संस्थेला येणार्‍या ग्राहकाची माहिती विनासायास मिळेल हा संस्थेचा फायदा असेल.

३ दोघांना जोडणार्‍या अ‍ॅग्रीगेटरला माहितीपुरत्या मध्यस्थाचे काम करण्याचा मेहेनताना मिळेल.

आता फक्त तुम्ही प्रश्न विचारा आणि आम्ही उत्तर देण्याचा प्रयास करू.

सबस्क्राईब करा

* indicates required