computer

ATM वर डल्ला : ATM 'स्कीमिंग' म्हणजे काय ? ते कसे ओळखाल ? त्यापासून सावध राहण्यासाठी काय कराल ?

कालच एसबीआय ने ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार वरून २० हजार पर्यंत कमी केली. एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांना ATM मधून फक्त २०,००० रुपये काढता येतील. अचानक झालेल्या या बदलाचं एक मुख्य कारण आहे ATM मधून होणारी चोरी.

मंडळी, एसबीआय बँकेकडे मागच्या काही काळामध्ये फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. अशा फसवणुकीची उदाहरणं वाढत असल्याने हा एक सर्वात मोठा फसवणुकीचा प्रकार होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे.

...पण सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतलेली असतानाही हे चोर ATM मधून पैसे लंपास करतात तरी कसे ? याचं उत्तर आहे ‘स्कीमिंग’. स्कीमिंग पद्धतीने ATM वर हात साफ करून आजवर लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. तुमच्या सोबत असं घडू नये म्हणून आज आम्ही सांगणार आहोत स्कीमिंग म्हणेज काय, तो कसा ओळखायचा आणि त्यापासून सावधान कसं राहायचं ते !!

चला जाणून घेऊया स्कीमिंग’ प्रकारा बद्दल.

१. स्कीमिंग म्हणजे कार्ड धारकाची माहिती चोरणे. यामध्ये ATM मशिनच्या कार्ड स्लॉट मध्ये एक लहानसं उपकरण बसवलं जातं. या उपकरणाला स्कीमर्स म्हणतात.

२. आपण जेव्हा कार्ड स्लॉट मध्ये कार्ड टाकून स्वाईप करतो तेव्हा या स्कीमर्सद्वारे कार्ड मधली माहिती चोरली जाते.

३. माहिती सोबत तुमचा पिन नंबर सुद्धा गरजेचा असतो. त्यासाठी किपॅडच्या वर कॅमेरा बसवला जातो. पिन नंबर टाईप केल्यावर लगेचच कॅमेरा तो पिन कैद करतो.

४. या माहितीचा वापर करून इतर ATM मशीन्स मधून पैसे लंपास केले जातात किंवा मग ऑनलाईन खरेदी केली जाते.

५. काहीवेळा पिन नंबर जाणून घेण्यासाठी किपॅडवर एक पातळ थर लावला जातो. आपण टाईप करताना उमटलेल्या ठश्यांचा वापर पिन नंबर ओळखण्यासाठी केला जातो.

 

अशा ATM मशीन्स कशा ओळखायच्या ?

१. ज्या ATM मशीन सोबत चोरांनी छेडछाड केली आहे तिथे कार्ड रीडर नवीन कार्ड स्वीकारण्यासाठी जास्त वेळ लावतो.

२. याशिवाय कार्ड रीडरचा भाग सहजपणे बाहेर काढता येण्यासारखा किंवा अधांतरी बसवलेला वाटू शकतो.

३. किपॅड मध्ये काही विचित्र प्रकार दिसू शकतात. जसे की सरकलेला किपॅड किंवा अलगद जोडलेला किपॅड. असे किपॅड्स पिन नंबर चोरण्यासाठी लावले असण्याची शक्यता असू शकते.

 

 

अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्याल ?

१. पिन नंबर टाकताना करताना आपल्या हातांनी किपॅड झाका. चोरांना तुमचा पिन नंबर माहित नसल्यास कार्ड मधून चोरलेल्या माहितीचा काहीच उपयोग होणार नाही.

२. जिथे माणसांची नेहमीच येजा असते तिथेव सहसा स्कीमर्स लावता येत नाहीत. तुरळक माणसं फिरकत असलेल्या ठिकाणी स्कीमर्सचा अधोका असू शकतो. बँकेच्या ATM मधून किंवा गर्दीच्या ठिकाणी असलेल्या ATM मधून पैसे काढणे कधीही सुरक्षित असते.

३. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरी गेल्याचा संशय येत असेल तर लगेचच तशी तक्रार करा.

४. RBI च्या सूचनेनुसार जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार दाखल कराल तेवढ्या लवकर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता असते.

तर मंडळी, एसबीआय बँकेच्या उदाहरणावरून सर्वच बँक खातेदारांनी धडा घेतला पाहिजे. हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन पद्धतीने पैशांची अफरातफर होत असते. आपल्या सोबत फसवणूक होऊ नये म्हणून वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा !!
...आणि हो इतरांसोबत पोस्ट शेअर करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required