क्रूर सिरियल किलर्स: खुनानंतर मानवी मांस शिजवून खाणारा निठारी हत्याकांडाचा क्रूरकर्मा आता काय करत आहे?

उत्तर भारतात डिसेंबर हा प्रचंड थंडीचा महिना असतो. या प्रचंड थंडीत जो तो आपापल्या घरात टीव्हीसमोर बसलेला असायचा तो काळ, म्हणजे वर्ष २००६. या प्रचंड थंडीत कुठलेही न्यूज चॅनल सुरू केले, तरी प्रत्येक ठिकाणी एकच ब्रेकिंग न्यूज दिसत होती. देशाची राजधानी दिल्लीलगत विकसित झालेल्या नोएडामध्ये एका घरामागे मानवी सांगाडे सापडले होते.

ही स्टोरी समजून घेण्यासाठी थोडे फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. गोष्ट आहे २००३ सालची!! मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलं बेपत्ता झाल्याची घटना नोएडा येथीलच निठारी गावातील सेक्टर 31 मध्ये घडली होती. योगायोग म्हणजे ही घटना त्याच परिसरात एका मोठ्या बंगल्यात एक नवा नोकर आल्यानंतर घडली होती. 

या बंगल्याचा मालक मनिंदर सिंग हा चंदिगड येथे राहत असे. आता दिल्ली ते चंदिगड यात जवळपास सहा तासाचे असल्याने या बंगल्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी माणूस हवा होता. यासाठी त्याने सुरेंद्र कोहली नामक व्यक्तीची नियुक्ती केली आणि या घटनाक्रमास सुरुवात झाली. 

२००५ साल उजाडले. तोवर कुणाला काही अंदाज नव्हता. पण फेब्रुवारी २००५ मध्ये एक १४ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. तिच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल करण्याचा खूप प्रयत्न केला. पण काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ती तक्रार नोंदवली गेली नाही. एक महिना असाच निघून गेला. काही मुलं एका ग्राउंडवर क्रिकेट खेळत होती. खेळताना गटारात त्यांचा बॉल पडला म्हणून बॉल काढत असताना त्यांना एका प्लास्टिक पिशवीत माणसाचा हात सापडला आणि ती मुले चांगलीच हादरली. आता योगायोग म्हणजे ती जागा जिथे सुरेंद्र राहत होता त्याच्या बाजूलाच होती.

हा विषय पोलिसांत गेल्यावर पोलिसांनी परत तो हात एखाद्या मृत प्राण्याचा असेल असे म्हणून गावकऱ्यांना जे घडले ते विसरून जायला सांगितले. आता मे २००६ उजाडले होते. घटनांची साखळी तशीच सुरू होती. एके दिवशी पायल नावाची मुलगी आपण सिंग बंगल्यात जात असल्याचे सांगून घरातून निघाली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी बराच शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. शेवटी ते जेव्हा पोलिसांत गेले तेव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली.

यावेळेस मात्र या मुलीच्या वडिलांनी थेट नोयडाचे डिवायएसपी ऑफिस गाठले. तिथे प्राथमिक तक्रार नोंदविण्यात आली आणि त्यांनी तपासाचे आदेश दिले. तपास सुरू झाला. यात सर्वात महत्वाची गोष्ट पोलिसांना समजली ती म्हणजे, पायलचा मोबाईल अजूनही सुरू होता. लोकेशन ट्रेस केल्यावर समजले की ती जागा सिंग बंगल्याच्या मागे आहे. 

आता पोलीस पायलचे कॉल रेकॉर्ड चेक करू लागले. यात अजून एक महत्वपूर्ण गोष्ट समोर आली, ती म्हणजे पायलने शेवटचा कॉल सुरेंद्रला केला होता. पोलिसांनी सुरेंद्रला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही गोष्ट बंगल्याचा मालक मनिंदर सिंग याला समजल्यावर त्याने आपला पैसा आणि पॉवरचा वापर करून त्याला सोडवून आणले. पोलिसांकडे देखील पुरेसे पुरावे नसल्याने त्याला सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

पायलचे वडील मात्र हार मानायला तयार नव्हते, त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. या धावपळीत ऑक्टोबर महिना येऊन गेला होता. न्यायालयाने पोलिसांना पुन्हा केस सुरू करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी शोधाशोध सुरू केल्यावर त्यांना या बंगल्याच्या मागच्या बाजूच्या गटारीत काही प्लास्टिक बॅग सापडल्या. या बॅग्जमध्ये मानवी सांगाडे होते. डिसेंबर महिन्यात आणखी सांगाडे सापडले आणि मनिंदर सिंग आणि सुरेंद्र कोहली दोघांना अटक झाली. ही गोष्ट टीव्हीवर आली आणि संपूर्ण उत्तर भारत अक्षरशः हादरला.

इतक्या मोठ्या प्रमाणावर मानवी सांगाडे सापडतात ही गोष्ट सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच धक्कादायक असते. एवढे सर्व असूनही या दोघांना शिक्षा देण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नव्हते. आता जसजसे सांगाडे सापडू लागले, तसतसे २००३ सालापासून गायब होणाऱ्या मुली आणि महिला यांच्या बेपत्ता होण्याशी ही गोष्ट जोडली जाऊ लागली. पूर्ण देश आता यामागचे सत्य समोर यायला पाहिजे ही मागणी करू लागला होता. 

या केसची चौकशी करण्याचे काम आता सीबीआयकडे सोपविण्यात आले. काही दिवसांपूर्वी निठारी गावाबाहेर कुणाला माहीत नसलेले हे प्रकरण देशव्यापी झाले होते. जवळपास २ महिने त्यांची चौकशी सुरू होती. शेवटी सुरेंद्र कोहलीने तोंड उघडले. त्याने जे सांगितले ते कुठल्याही सर्वसामान्य मनासाठी प्रचंड धक्कादायक होते. सुरेंद्र आपल्यासोबत तुम्हालाही नोकरी देतो असे आमिष दाखवून लोकांना बंगल्यात बोलवून घेत होता. पुढे बंगल्यात गेल्यावर तो जे करत असे ते क्रूरतेची परिसीमा होती.

९ अल्पवयीन मुली, २ अल्पवयीन मुले, ५ महिला यांना त्याने आधी बंगल्यात बोलावले. आधी तर तो त्यांचा थेट खून करत असे. नंतर त्यांचा बलात्कार करून, त्यांचे छोटेछोटे तुकडे करून ते मांस खाणे आणि बाकी बंगल्याबाहेरील गटारात फेकून देणे असे पाशवी कृत्य तो करत असे. त्याचे सगळे गुन्हे तो सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत करत असे. प्रत्येक खुनानंतर प्रेत जिना चढून वर बाथरूममध्ये घेऊन जाणे, तिथे त्या प्रेताचा बलात्कार करून त्याचे तुकडे करत असे. तो बाथरूम तसेच सोडून ते तुकडे शिजवून खायचा आणि मग बाथरूम साफ करायचा असे तो करायचा. 

बंगल्यात तो एकटा राहत नसे. त्याच्यासोबत आणखी ४ नोकर होते. एक ड्रायव्हर, एक माळी आणि दोन मोलकरणी तिथे राहत असत. पण या चौघांना कुठलीही अटक झाली नाही. इतकेच नव्हे तर मनिंदर सिंग याने देखील सुरेंद्र काय करत होता याची आपल्याला कुठलीही माहिती नव्हती सांगत हात झटकले. पोर्टमोर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी, ज्या पद्धतीने या बॉडीज कट केल्या होत्या त्यावरून अवयव विक्रीचीही शक्यता आहे असे नमूद केले होते. 

पण विषय जेव्हा महिला आणि बालविकास मंत्रालयापर्यंत गेला तेव्हा त्यांनी अवयवविक्रीची शक्यता खोडून काढली. वरून त्यांनी असेही नमूद केले की या खुनांमागील कारण स्पष्ट होत नाही. तेव्हा आणि आजही या हत्याकांडाविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जातात. एक म्हणजे तो खरंच माथेफिरू सिरीयल किलर होता का याविषयी स्पष्टता नाही. कारण तो खून करत असलेल्या लोकांचा एक पॅटर्न नव्हता. मग तो नेमके कशासाठी हे करत होता? त्याच्याकडून कोणीतरी हे करवून तर घेत नव्हता ना? अशाही शंका आहेत. 

बंगल्याच्या मागे असलेली गटार खूप खोल नव्हती, असे असूनही या प्रेतांचा कुणाला वास कसा आला नाही? सुरेंद्र स्वतः सांगतो की हे गुन्हे तो दिवसा करत होता. मग कुणालाही एकदाही सुगावा लागू नये? तसेच जे सांगाडे सापडले त्यात फक्त हाडे असल्याने अवयवविक्रीची शंका दाट होते.

ही घटना होऊन १५ हून अधिक वर्ष उलटली असली तरी गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. अजूनही तारीख पे तारीख सुरू आहे. या केसमध्ये मनिंदर सिंग आणि सुरेंद्र कोहली दोघे दोषी सिद्ध झाले आहेत. सिंगवर सुरेंद्रला साहाय्य करण्याचा आरोप आहे. २०१७ साली त्यांना सीबीआय न्यायालयाने फाशी सुनावली होती पण अजूनही मुख्य न्यायालयात खटला सुरू असल्याने फाशीचा अमल झालेला नाही. इतक्या लोकांचा क्रूरपणे जीव घेणारे अजूनही फक्त तुरुंगात आहेत.

देशाला हादरवून सोडणारा हा निठारी खटला आजही संवेदनशील लोकांना अस्वस्थ करतो. भारतीय इतिहासातील सर्वाधिक क्रूर हत्याकांडांपैकी हा एक समजला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required