computer

कॉपीराइट म्हणजे काय ?

आपल्याकडे कॉपीराइट कायदा १९१४ साली प्रथम लागू केला गेला,तो इंग्लिश कॉपीराइट कायदा १९११ यावर आधारित होता.
कॉपीराइट हक्क पुढील बाबींबाबत निर्माण होऊ शकतात,मिळतात.
1) वाङ्मयीन कलाकृती-लेखकाला.
2) संगीत कला - गायक-वादकाला.
3) संगणक आज्ञाप्रणाली बनवणाऱ्याला.
4) अन्य कलाकृती-निर्माण करणाऱ्याला.
5) सिनेमा- निर्मात्याला.
6) साउंड रेकॉर्डिंग- करवून घेणाऱ्याला.
जर एखादी कलाकृती एकाहून जास्त व्यक्तींनी मिळून निर्माण केली असेल तर त्यांना हा हक्क एकत्रितरीत्या प्राप्त होतो. येथे प्राप्त होतो असे लिहिले आहे. कारण कॉपीराइट हा अर्ज करून मिळविण्याचा हक्क नाही.
   

  कॉपीराइट हे निर्मिती झालेल्या (कला) कृतीबाबत असतात. मनात आलेल्या किंवा सुचलेल्या संकल्पनेबाबत नाही. म्हणजे असे, की समजा मला एक कल्पना सुचली, की ज्यापासून एक चांगले नाटक तयार होऊ शकते. जोपर्यंत मी ती कल्पना वा त्यावरचे नाटक लिहून काढून प्रकाशित करत नाही, तोपर्यंत मला कोणताच हक्क प्राप्त होत नाही, पण ज्या क्षणी माझे लिखाण मी प्रकाशित करतो, त्या क्षणी मला कॉपीराइटचे हक्क मिळतात.
   आपल्याकडे कॉपीराइट मिळविण्यासाठी कोणत्याही कायद्याचे सोपस्कार पूर्ण करावे लागत नाहीत. हे हक्क कलाकृती जनकाला आपोआप मिळतात, आपल्या आणि अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्यात मोठा फरक आहे, त्याचा अनुभव संगणक आशाप्रणाली बनविणाऱ्या भारतीयांना येत आहेच, कारण अमेरिकेत सर्व प्रकारच्या कॉपीराइटसाठी अर्ज करावा लागतो, जे आपल्याकडे करावे लागत नाही; पण म्हणूनच भारतात कॉपीराइट धारण करणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडे असे हक्क आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोर्टकचेऱ्या कराव्या लागतात. हे टाळण्यासाठी आपल्याकडेसुद्धा कॉपीराइटचे नोंदणीकरण करता येते.
     
 

सामान्यपणे कॉपीराइट हक्क कलाकृतीजनकाला तो जिवंत असेपर्यंत आणि त्याच्या मृत्यूनंतर 25 वर्षे त्याच्या वारसांना उपभोगता येतात. त्यानंतर मात्र अन्य कोणीही व्यक्ती ती कलाकृती कॉपीराइट हक्कांचा भंग न होता कशीही वापरू शकते.
कॉपीराइट, कलाकृती जनकाला मिळतात हे जरी खरे असले तरी त्यात गोम अशी, की जर एखाद्याने आपल्या कार्यालयीन कामाचा भाग म्हणून काही लिखाण केले असेल, तर त्या लिखाणावर त्याच्या मालकाला कॉपीराइट मिळतात. तशीच परिस्थिती जे लिखाण करारानुसार केले जाते त्याबाबत असते.
कॉपीराइटमध्ये पुढील हक्क समाविष्ट असतात :
1) त्याच्या प्रती कोणत्याही स्वरूपात काढणे, विकणे, उपलब्ध करणे.
2) त्याच्यावर सिनेमा करणे वा संवाद रेकॉर्ड करणे.
3) भाषांतर करणे.
4) त्याचा अन्य निर्मितीसाठी उपयोग वापर करणे.
कॉपीराइट हे अन्य मालमत्ता हक्कांप्रमाणे असल्याने ते विकले जाऊ शकतात, दान दिले जाऊ शकतात.
एकदा असा हा हक्क प्राप्त झाल्यावर अन्य कोणाला त्या कलाकृतीबाबत स्वतंत्र कॉपीराइट मिळू शकत नाही. त्या अर्थी हा हक्क एक्सक्ल्युझिव्ह असतो, म्हणजे तो एका वेळी फक्त एकालाच वा अनेकांना संयुक्तरीत्या मिळतो.
 

कॉपीराइट हक्कांचा भंग झाल्यास वा केल्यास कमीत कमी सहा महिन्यांपासून तीन वर्षांची कैद आणि पन्नास हजारांपासून दोन लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. छापलेली पुस्तके कालांतराने मिळेनाशी होतात, हा तर नेहमीचा अनुभव.अशा परिस्थितीत वाचनालयांना त्यांच्याकडे असलेल्या एकमेव प्रतीची आणखी एक नक्कल करण्याची परवानगी मिळवता येते. जी प्रत, ती वाचनालये आपल्या सदस्यांना वाचावयास देऊ शकतात.