computer

खोट्या नोटेचा संशय ते मृत्यू. त्या ३० अमानुष मिनिटांमुळे अमेरिकेत दंगली का पेटल्या आहेत? वाचा सविस्तर नक्की काय घडलं ते..

जॉर्ज फ्लॉईड या अमेरिकन कृष्णवर्णियाच्या मृत्यूने अमेरिकेत मोर्चे, निदर्शनं होत आहेत. काही ठिकाणी मोर्चांना हिंसक स्वरुप मिळत आहे तर काही ठिकाणी लोक शांततेत निदर्शनं करत आहेत. अमेरिकेपाठोपाठ लंडनच्या अमेरिकन दूतावासासमोरही लोकांनी निदर्शनं केली आहेत. सोशल मिडीयावर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा घडत आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळेच या घटनेचा निषेध करायचं आहे.

आजच्या लेखात आपण त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, जॉर्ज फ्लॉईड कोण होता? त्याचा मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर काय घडलं हे सर्व मुद्दे सविस्तर समजून घेणार आहोत.
२५ मे २०२० रोजी काय घडलं?
 

ही घटना अमेरिकेच्या उत्तरेला असलेल्या मिनेसोटा राज्यातील आहे. जॉर्ज फ्लॉईडने २५ मे २०२० च्या रात्री मिनेसोटाच्या एका दुकानातून सिगरेट विकत घेतली होती. दुकानातील कर्मचाऱ्याला त्याने २० डॉलर्सची नोट दिली होती. कर्मचाऱ्याने नोट खरी की खोटी हे तपासल्यावर नोट खोटी असल्याचं समजलं.

त्या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे की (नोट खोटी असल्याने) ‘मी त्याला सिगरेट्स परत करायला सांगितले पण त्याने माझं ऐकलं नाही’ पुढे तो असंही म्हणाला की ‘तो (फ्लॉईड) प्यायलेला असल्याने शुद्धीत नव्हता.’

शेवटी कर्मचाऱ्याने ८ वाजेच्या सुमारास अमेरिकेतला इमर्जन्सी नंबर ९११ वर फोन करून पोलिसांकडे तक्रार केली. ८ वाजून ८ मिनिटांनी पोलीस आले. त्यावेळी फ्लॉईड आणि आणखी २ जण कारमध्ये बसले होते. पोलिसांची तुकडी कारजवळ गेली. थॉमस लेन नावाच्या पोलिसाने आपली गन बाहेर काढून फ्लॉईडला बाहेर यायची सूचना दिली. तसं पाहता थॉमस लेन आपली बंदूक बाहेर न काढताही फ्लॉईडला बाहेर येण्याची सूचना देऊ शकला असता, पण त्यावेळी थॉमस लेनने बंदूक बाहेर काढण्यासारखं काय घडलं होतं याबद्दल स्पष्टीकरण मिळालेलं नाही.

यानंतर लेनने फ्लॉईडला कारमधून बाहेर काढलं आणि त्याला बेड्या ठोकल्या. बेड्या ठोकण्याला फ्लॉईडचा विरोध होता. पोलिसांनी त्याला आपल्या कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी फ्लॉईड खाली कोसळला. त्याने सांगितलं की मला क्लॉस्टेरोफोबियाचा त्रास आहे. क्लॉस्टेरोफोबिया या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना छोट्या आणि मर्यादित जागेत राहण्याची भीती वाटते.

हे घडत असताना त्या जागी शोविन (शोविन) नावाचा पोलीस अधिकारी आला. शोविन आणि इतरांनी मिळून फ्लॉईडला पोलिसकारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. फ्लॉईड विरोध करत राहिला. थोड्यावेळाने शोविनने त्याला कारबाहेर काढलं. फ्लॉईड खाली कोसळला. त्याचा चेहरा जमिनीलगत होता आणि हातांना बेड्या ठोकलेल्या होत्या.

इथून पुढे जे घडलं ते तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केलं. फ्लॉईडला इतर पोलिसांनी रोखून धरलं होतं, तर शोविनने आपला गुढगा त्याच्या मानेवर दाबला होता. यावेळी फ्लॉईड "मला श्वास घेता येत नाहीय" म्हणत होता. त्याने वारंवार विनवणी करूनही शोविनने आपला पाय बाजूला केला नाही. ८ मिनिटे आणि ४६ सेकंदापर्यंत शोविन फ्लॉईडच्या मानेवर गुढघा ठेऊन उभा होता.

सहाव्या मिनिटाला फ्लॉईडची हालचाल बंद पडली होती. आजूबाजूला जमलेल्या लोकांनी तिथे असलेल्या दुसऱ्या पोलिसाला फ्लॉईडची नाडी तपासायला सांगितली. शोविन फ्लॉईडच्या मानेवर गुडघा ठेऊन असतानाच त्याची नाडी तपासण्यात आली, पण तो थंड पडला होता. शोविन तरीही जागचा हलला नाही.

८ मिनिटानंतर शोविन बाजूला झाल्यावर फ्लॉईडला ‘हेन्नेपिन काउंटी मेडिकल सेंटर’मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पुढ्या एका तासात त्याला मृत घोषित करण्यात आलं.

जॉर्ज फ्लॉईड कोण होता?

जॉर्ज फ्लॉईड हाक्स अमेरिकेच्या टेक्सास भागात हॉस्टन येथे राहत होता. काही वर्षांपूर्वीच तो मिनेसोटा येथे रहायला आला होता. तो बाउन्सर म्हणून काम करायचा. कोरोनानंतर त्याचं काम बंद पडलं होतं. ज्या दुकानात तो सिगरेट खरेदी करायला गेला होता त्या दुकानाच्या मालकाची आणि त्याची चांगली मैत्री होती. ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी मालक दुकानात नसल्याने तिथला कर्मचारी दुकान सांभाळत होता. मालकाने म्हटल्याप्रमाणे, ‘फ्लॉईड हा चांगला माणूस होता, त्याच्यामुळे कधीच काही अडचण आली नाही’

एक योगायोग म्हणजे जॉर्ज फ्लॉईड आणि त्याला मारणारा डेरेक शोविन यांनी लॅटिन नाईट क्लबमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं होतं. शोविन तिथे १७ वर्षांपासून काम करत होता. दोघेही एकत्र काम करत असल्याने त्यांची आधीची ओळख असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण या गोष्टीला तूर्तास तरी आधार नाही.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्युनंतर काय घडलं?

जॉर्ज फ्लॉईड कृष्णवर्णीय असल्याने या घटनेत वर्णद्वेष असल्याची भावना लोकांमध्ये पसरली. शिवाय पोलिसांच्या क्रूरते विरुद्ध राग उफाळला. फ्लॉईडचा मृत्यू २६ मे रोजी ‘Black Lives Matter’ चळवळीचा फलक हातात घेऊन अनेकजण रस्त्यावर उतरले होते. यात श्वेतवर्णी नागरिकही होते.
 

२६ मे नंतर हळूहळू लोकांची संख्या वाढत गेली. मोर्चे आणि निदर्शानाचं लोण संपूर्ण अमेरिकेत पसरलं.. सुरुवातीची निदर्शनं शांततेत पार पडली. पण नंतर त्यांना हिंसक वळण मिळालं. काही ठिकाणी गाड्यांची जाळपोळ, दुकानांची लुट, वाहनांना रोखणे अशा घटना घडल्या. परिणामी काही ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला.

व्हाईट हाऊससमोर लोकांनी मोठ्याप्रमाणात निदर्शनं केली. परिणामी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमधल्या बंकरमध्ये लपून राहावं लागलं.

शोविनवर काय कारवाई झाली?

या घटनेत सामील असलेल्यांपैकी शोविन सहित चार पोलीस अधिकाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी पोलीस खात्यातून काढण्यात आलं.  शोविनला २९ मे रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. एका कृष्णवर्णीयाच्या हत्येसाठी दोषी ठरलेला मिनेसोटा राज्यातला तो पहिला पोलीस अधिकारी ठरला आहे. शोविनने आपल्यासोबत इतर तिघांना सुद्धा अटक केली जावी असं म्हटलं आहे.

शोविनवर खुनासाठी थर्ड डिग्री आणि मनुष्यवधासाठी सेकंड डिग्री आरोप लावण्यात आला आहे. थर्ड डिग्रीचा अर्थ होतो खुनाचा हेतू नसणे. या गोष्टीला फ्लॉईडच्या घरच्यांच्या वकिलाने विरोध केला आहे. त्याच्यामते शोविनवर हेतुपूर्वक हत्येसाठी फर्स्ट डिग्रीचा आरोप लावण्यात यावा.

वाचकांनो, अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हत्या या नवीन नाहीत. त्यामागे मोठा इतिहास आहे. अमेरिकेत गुलाम म्हणून आणण्यापासून ते त्यांच्यातीलच एकाने अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवण्यापर्यंत हा इतिहास जातो. बराक ओबामा निवडून आले त्यावेळीही त्यांना विरोध करणाऱ्यांच्या एका गटाला ते कृष्णवर्णी असल्याने नको होते. तरी त्यांचा विजय झाला ही इतिहासातील एक मोठी घटना होती.

फ्लॉईडच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर श्वेतवर्णीय कृष्णवर्णीयांच्या पाठीशी उभे राहणं आणि या घटनेबद्दल कृष्णवर्णीयांची माफी मागणं या गोष्टी महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. मायामी पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्यांसमोर जाहीर माफी मागून एक नवीन उदाहरण घालून दिलं आहे. त्यावेळी तिथे जमलेल्यांना अश्रू अनावर झाले होते.

या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींना काय शिक्षा मिळते आणि या घटनेमुळे जे आंदोलन सुरु झालं आहे त्याचा शेवट काय होतो हे आता पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required