computer

प्रदूषण रोखण्यासाठी चीनने कोणती जादू केली ? भारताने नक्कीच चीनकडून हे उपाय शिकले पाहिजेत !!

साल होतं २०१३, बीजिंगच्या हवेतील प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. एअर क्वालिटी इंडेक्स (हवामान गुणवत्ता निर्देशांक - AQI ) नुसार बीजिंग मधील प्रदूषणाने ९९३ पर्यंतचा आकडा गाठला होता. ही संख्या म्हणजे धोक्याची घंटा समजली जाते. न्यूयॉर्क मध्ये अगदी याविरुद्ध वातावरण होतं. तिथला AQI  चा आकडा फक्त १९ पर्यंत होता.

साल होतं ८ नोव्हेंबर, २०१७. दिल्लीला येणारी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. कारण दिल्लीतलं AQI ने तब्बल ९९९ चा आकडा गाठला होता. आश्चर्य म्हणजे बीजिंग मध्ये अगदी याविरुद्ध वातावरण बघायला मिळतंय. तिथला AQI  चा आकडा फक्त ५५ आहे .

मंडळी, वरील आकडे बघितल्यावर तुम्हाला प्रश्न पडला का ? - चीनने अशी काय जादू केली की AQI चा ९९३ चा आकडा जवळजवळ ५५ पर्यंत खाली घसरला ? चला तर जाणून घेऊया चीनने प्रदूषण नियंत्रणासाठी काय केलं ते.

सप्टेंबर २०१३ साली चीनने वायू प्रदूषणाच्या विरुद्ध मोहीम उघडली. हवेतील प्रदूषण घालवण्यासाठी त्यांनी स्वतःलाच ५ वर्षांचा कालावधी दिला. काम सोप्पं नव्हतं पण हे शक्य झालं.

स्रोत

चीनने कोळशाच्या वापरावर नियंत्रण आणलं. विशेषतः बीजिंगने २०१३ ते २०१८ पर्यंत कोळशाचा वापर ५० टक्क्यांनी कमी केला. जो ५० टक्के वापर होत होता त्यातूनही धोकादायक घटक काढून टाकण्यासाठी फिल्टर आणि स्क्रबर्सचा वापर वाढवण्यात आला.

२०११ साली बीजिंग मध्ये वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एक नामी शक्कल लढवण्यात आली.  नवीन गाडी घेण्यासाठी आणि गाडीला नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी चक्क लॉटरी पद्धत सुरु करण्यात आली. २०१७ साली १,५०,००० नवीन नंबर प्लेट्सची लॉटरी काढण्यात आली तर २०१८ साली हा आकडा कमी करून १,००,००० करण्यात आला. या १,००,००० नंबर प्लेट्सचा ६० टक्के हिस्सा हा इलेक्ट्रिक कार्ससाठी राखीव होता तर उरलेला पेट्रोल डीझेलवर चालणाऱ्या गाड्यांसाठी राखीव होता.

याशिवाय चीनने झाडे लावण्यावर भर दिला. शहरी भागातील उद्यानांची संख्या वाढवण्यात आली. २०१८ पर्यंत १०० किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांचं रुपांतर हरित रस्त्यांमध्ये झालं.

मंडळी, आम्ही चीनचं कौतुक यासाठीच करतोय कारण चीनने खऱ्या अर्थाने स्वतःला दिलेल्या मुदतीत प्रदूषण नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे. एकेकाळी बीजिंग, शांघायचा परिसर हा जगातील सर्वाधिक प्रदूषित भागांच्या यादीत यायचा. पण आज तिथल्या हवेत श्वास घेणं शक्य झालं आहे.

मंडळी, त्यावेळी जशी बीजिंगची चर्चा होत होती तशीच आज दिल्लीची जगभर चर्चा होत आहे. दिल्लीचं हवामान सुधारण्यासाठी आपल्याला सुद्धा अशीच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नाही का ?

सबस्क्राईब करा

* indicates required