computer

अझरबैजान आणि अर्मेनिया युद्धतहानंतर अर्मेनियन जनता घरं जाळतेय.. वादाचं मूळ आणि इतर मुद्दे काय आहेत?

गेला दीड महिने सुरू असलेले अझरबैजान आणि अर्मेनिया या दोन देशांमधले युद्ध तहाद्वारे संपले आहे. तह झाला असला तरी या युद्धात अझरबैजानने विजय मिळवला आहे. या तहाद्वारे अझरबैजान या देशाला अर्मेनिया काही भूभाग देणार आहे.

नागोर्नो काराबाख नावाचा प्रदेश आता अझरबैजानचा भाग असणार आहे. ही जागा आधीपासूनच अझरबैजानची मानली जाते, पण त्या जागेवर अर्मेनियाचे लोक राहत असत. ही जागा सोडताना अर्मेनियन लोकांना प्रचंड दुःख झाले आहे. लोकांनी निघताना आपल्या घरांना आग लावून दिली. लहान मोठे सगळेच नागरिक रडताना दिसत होते. एवढी वर्ष ज्या जागेवर वास्तव्य केले, ती जागा तिथल्या आठवणी सोडून जाताना दुःख होणे साहजिक होते. अर्मेनियन लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही आमची संपत्ती नष्ट करू पण अझरबैजानच्या हातात जाऊ देणार नाही.

अर्मेनिया - अझरबैजान वाद:

अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला वाद हा खूप जुना आहे. १९९३ नंतर या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो असे अनेक प्रसंग आले आणि शेवटी यावर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध पेटलेच. या दोन देशांमध्ये तणाव सुरू झाला तो १९८० च्या दरम्यान. त्यावेळी रशिया पूर्ण अजस्त्र सोविएत संघ होता. अर्मेनिया आणि अझरबैजान या सोव्हिएत संघाचाच भाग होते. ज्या नागोर्नो- काराबाख या प्रदेशावरून सध्या युद्ध झाले, तोच प्रदेश तेव्हादेखील तणावाचे कारण होता. तेव्हापासून आजवर याच प्रदेशावरून दोन्ही देश भांडत होते.

वादाचा एक महत्त्वाचा मुद्दा:

नागोर्नो काराबाख हा भाग स्वतंत्र आहे हा अर्मेनियाचा दावा होता, तर तो अझरबैजान या देशाचा भाग आहे या गोष्टीला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. पण गोची अशी की त्या ठिकाणी राहणारी लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर अर्मेनियन होती. या अर्मेनियन लोकांचा ओढा साहजिकपणे अर्मेनियाकडे जास्त होता. यामुळे तिथे अर्मेनियन आणि अझरबैजानी लोकांमध्ये सातत्याने भांडणे होत असत. याचे पडसाद अझरबैजानच्या इतर शहरांमध्ये देखील उमटत असत. अर्मेनियन लोकांना मारून टाकण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या होत्या. १९८८ साली सुमगईत शहरात, तर १९९० साली अझरबैजानची राजधानी बाकू शहरात अर्मेनियन लोकांचा संहार करण्यात आला होता.

नागोर्नो काराबाखमध्ये अर्मेनियन जास्त असल्याने ते तिथून अजरबैजानच्या लोकांना हाकलून लावण्याचे प्रयत्न करत असत. तसेच हा प्रदेश अर्मेनियाला जोडला जावा यासाठी देखील त्यांनी आंदोलन सुरू केले होते. सोवियत संघ तेव्हा बलशाली असल्याने या घटना दडपल्या जात होत्या. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन झाले. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यावर वचक ठेवणारे कोणी राहिले नव्हते. १९९३ मध्ये दोन देशांमध्ये युद्ध होऊन मोठी हानी झाली. त्यानंतर कधी इकडचे तर कधी तिकडचे हल्ले करून नरसंहार करत असत. गेल्या तीस वर्षांत कित्येक हजार लोक या दोन देशांमधल्या वादामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या तणावाची दोन्ही देशातील लोकांना सवय झाली होती. अनेक वेळा संयुक्त राष्ट्र सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांचे प्रमुख भेटून काही दिवस शांतता प्रस्थापित होत असे. पण पुन्हा एखादी घटना निमित्त होऊन संबंध बिघडत असत.

अझरबैजान-अर्मेनियामध्ये बलाढ्य कोण आहे?

अझरबैजान गेल्या २० वर्षांत तेल विकून प्रचंड श्रीमंत झालेला देश आहे. या पैशांच्या जीवावर या देशाने मोठा शस्त्रसाठा गोळा केला आहे. यावेळी पूर्ण सोक्षमोक्ष लावावा याच हेतूने तो देश युद्धात उतरला होता, असे म्हटले जाते. युद्धाचा निकाल काहीसा तसाच लागला. अर्मेनियाला युद्धात माघार घ्यावी लागली. तह करून युद्ध थांबविण्यात आले आहे. या तहानुसार नागोर्नो काराबाख मधल्या जेवढ्या जागेवर अझरबैजानने ताबा मिळवला आहे, ती जागा अझरबैजानकडेच राहून इतर काही भूभागदेखील अर्मेनिया अझरबैजानला सोपविणार आहे.

तहाची इतर कलमे:

अझरबैजानला दुसरीकडे असलेल्या त्या देशाच्या एका प्रदेशाकडे जाण्यासाठी अर्मेनियातून जाणारा एक रस्ता देखील द्यावा लागणार आहे. या देशातून जाणाऱ्या स्थलांतरितांचे पालन पोषण करण्याची जबाबदारी अर्मेनियाला पार पाडावी लागणार आहे. तसेच जे लोक स्थलांतर न करता तिथेच राहतील त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी रशियाने घेतली आहे.

 

दग्धभू धोरण आणि युद्धे:

आपली घरे, मालमत्ता जाळून जाणारे लोक हे भावनेच्या भरात करत आहेत असे वाटत असले तरी ही खूप जुनी परंपरा आहे. याला दग्धभू धोरण असे म्हटले जाते. ही खास रशियन पद्धत म्हणून ओळखली जाते. अर्मेनिया देखील कधीकाळी रशियाचा भाग असल्याने त्यांच्याकडून ही पद्धत अवलंबणे अनपेक्षित नाही. फ्रांसच्या नेपोलियनने १७ व्या शतकात रशियावर केलेल्या आक्रमणानंतर रशियन लोकांनी देखील आपले घरे, मालमत्ता जाळून टाकली होती. अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये तह झाल्याने आतातरी दोन्ही देशांमध्ये शांतता नांदेल अशी अपेक्षा करता येऊ शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required