computer

सहज सोपे अर्थसूत्र:पेटंट नक्की कशाचे घेता येते? पेटंटबद्दल ही मूलभूत माहिती तर तुम्हांला असायलाच हवी!

एखाद्या शोधाबद्दल त्या शोधाच्या जनकाला सरकारकडून मिळालेली मक्तेदारी-अधिकार म्हणजे  ‘पेटंट’!! येथे ‘शोध’ या शब्दाला खास अर्थ आहे. इंग्रजी शब्द invention याचा समानार्थी शब्द म्हणून तो वापरला आहे, Discovery साठी नाही.मराठीत शोध हा एकच शब्द असला तरी इंग्रजी शब्दांतून योग्य ती अर्थ छटा व्यक्त होते.

invention आणि Discovery यात मूलभूत फरक आहे आणि त्यातच पेटंट हक्काचा उगम आहे.जे अस्तित्वात आहे, पण ज्ञात नाही ते शोधून काढणे म्हणजे Discovery. कोलंबसाने अमेरिका खंड 'डिस्कव्हर' केला असे म्हटले जाते.कारण तो खंड तेथे त्याच्या आधीपासून अस्तित्वात होताच, पण एडीसनची विजेचा बल्ब, ग्रॅहॅम बेलचे टेलिफोन ही 'इन्व्हेन्शन' आहेत.म्हणजे त्या वस्तू वा प्रक्रिया त्याच्या पूर्वकाळात कोणालाच ज्ञात नव्हत्या.

पेटंट कायदा खूप जुना आहे. आता जागतिक बाजार संगठनाच्या करारानुसार सर्वच देशांनी त्यात बदल केले आहेत.पण पेटंटसंबंधी नव्या आणि जुन्या दोन्ही कायद्यांत ज्याचे पेटंट घ्यायचे आहे ती वस्तू-ती प्रक्रिया नावीन्यपूर्ण असावी म्हणजे ती अन्य कोणाला ज्ञात नसावी अशी अपेक्षा आहे. जुन्या पेटंट कायद्यात प्रॉडक्ट पेटंट नव्हतं,पण प्रोसेस पेटंट होते.म्हणजे उत्पादन प्रक्रियेचे पेटंट मिळत असे, पण उत्पादनाचे नाही.त्याचा फायदा/गैरफायदा घेऊन उत्पादन प्रक्रियेत बदल करून तेच उत्पादन अन्य कंपन्या करत असत.यामुळे पेटंटधारकाचे नुकसान होत असे. पण म्हणूनच नवा पेटंट कायदा आपल्याकडे लागू होण्यापूर्वी परदेशातील किमतीच्या एक दशांशहून कमी किमतीत औषधे आपल्याला मिळत असत.

पेटंटसंबंधी ते नावीन्यपूर्ण असावे ही जशी अट असते,तसेच त्याची गणना ज्याचा सामान्यज्ञान अशी असता कामा नये हीसुद्धा एक अट असते. हे सामान्यज्ञानसुद्धा जे, ते पेटंट वापरू शकतील वा वापरतील त्यांच्या संदर्भात आहे. प्रत्येक धंदा-व्यवसायात काही बाबी सामान्यज्ञान या स्वरूपाच्या असतात, त्याबाबत इतर लोक अनभिज्ञ असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ गवंड्याला ओळंबा म्हणजे काय हे सांगायला नको, ते त्याच्या कामाच्या संदर्भात सामान्यज्ञान आहे, पण तीच गोष्ट इतरांना माहिती नसू शकते.

पेटंटसंदर्भात असा कायदा आहे की जर एखादे दिले गेलेले पेटंट सामान्यज्ञान यात येते असे नंतर सिद्ध झाले तर ते पेटंट रद्द करता येते, केले जाते. याचा आधार घेऊन हळदीच्या औषधी उपयोगावर अमेरिकन कंपनीला तेथील सरकारने दिलेले पेटंट रद्द करून घेता येणे भारतीय शास्त्रज्ञांना शक्य झाले. त्यासाठी हेच सिद्ध केले गेले की भारतवर्षांत हळदीचा औषध म्हणून उपयोग गेली हजार वर्षे केला जात आहे.
 

पेटंटबाबत आणखी एक अट अशी असते की ज्याचे पेटंट मिळवायचे आहे ती वस्तू उपयोगी असावी,त्यापासून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असावी, पण लाभ मिळाला पाहिजे असे नाही. कारण पेटंट मिळाल्यानंतर अन्य शोधांमुळे वा अन्य घटकांमुळे ते पेटंट वापरणे लाभाचे ठरू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.थोडक्यात म्हणजे ज्या वस्तूचे पेटंट हक्क प्राप्त करावयाचे आहेत, त्या वस्तूचा वाणिज्य (commercial) वापर करता येणे शक्य असेल तरच पेटंट मिळते अन्यथा पेटंट मिळत नाही.

पेटंट प्राप्त करण्याचा अर्ज, पेटंट मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. यात तपशीलवार, तर्कसंगत आणि अगदी योग्य शब्दप्रयोग असावे लागतात. मोघम शब्दांतील पेटंट अर्ज नाकारला जाऊ शकतो.

ही झाली पेटंटबद्दलची मूलभूत माहिती. सहज सोप्या अर्थसूत्रात ट्रेडमार्क या लेखानंतर पेटंट्सबद्दल बोलायला हवेच होते. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात, याच दिवशी, आणखी एका संकल्पनेसोबत!!

सबस्क्राईब करा

* indicates required