computer

भूतांशी थेट-भेट घडवणाऱ्या 'प्लॅंचेट'चे हे १० नियम माहित नसतील तर तुम्ही हा प्रयोग बिलकुल करू नका !!

लहानपणी मित्राच्या घरी अभ्यासाला गेल्यावर किंवा तीन चार मित्र एकत्र जमल्यावर एक विषय हमखास निघायचा… भुतांचा! मंडळी, हा विषय घाबरवणारा असला तरी उत्सुकतेचा आहे. भूत प्रेत आत्मा वगैरे गोष्टींची भीती वाटते पण त्यावर चर्चा सुरू असेल तर आपले कान मात्र त्या चर्चेकडेच लागले असतात. भुताखेताच्या गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाही? पण… गोष्टी ऐकण्यापर्यंत विषय असेल तर ठीक आहे, त्यापुढे डायरेक्ट भुतांशी किंवा आत्म्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर? आजच्या लेखात आपण तेच जाणून घेणार आहोत. घाबरू नका, आम्ही भुतांशी तुमचा संवाद साधून देणार नाही. पण तो कसा साधतात याविषयी थोडी माहिती नक्कीच देणार आहोत. 

प्लॅंचेट! नाम तो सुना ही होगा… असंख्य सिनेमे, पुस्तके आणि लेखांमधून हे नाव तुम्ही जरूर ऐकलं, वाचलं असेल. मेलेल्या माणसांच्या आत्म्याला बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे या प्रक्रियेला प्लॅंचेट म्हणतात. कित्येक हॉरर मुव्हीजमध्ये याचे चित्रीकरण केले आहे. प्लॅंचेट करण्यासाठी अंधाऱ्या खोलीचा वापर केला जातो. तिथे प्रकाशापुरती एखादी मेणबत्ती पेटवली जाते. त्या खोलीत तिघे चौघे रिंगणात एकत्र बसून मधोमध एक बोर्ड ठेऊन त्यावर प्लॅंचेट केले जाते. त्या बोर्डला काय म्हणतात माहीत आहे? त्याला म्हणतात औजा बोर्ड (Ouija Board).

औजा बोर्डलाच बोलका बोर्ड असेही म्हंटले जाते. या बोर्डवर अक्षरे, अंकलिपी आणि काही सांकेतिक खुणा असतात. त्यावर वाटी, नाणे किंवा एखादी हलकी वस्तू ठेवली जाते आणि प्लॅंचेट करणाऱ्या समूहातील लोकांनी त्यावर आपले बोट ठेवायचे असते. या समूहातील एकाला लीडर बनवले जाते आणि तो लीडर ज्या आत्म्याला बोलवायचे आहे त्याचे आवाहन करतो. असं म्हणतात की आत्मा आल्यानंतर वातावरण बदलून जाते. मग त्या आत्म्याला काही प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे आत्मा वाटी सरकवून हो किंवा नाही अशी देतो अथवा अक्षरांवरून वाटी फिरवून उत्तर देतो. 

मंडळी, हे वाचायला सोपे वाटत असले तरी प्लॅंचेट करताना भली भली माणसे घाबरून जातात. तुमच्या सोबत अंधाऱ्या खोलीत एक आत्मा आहे असा विचार करून बघा कसे वाटते. भीती वाटते ना? हा खेळ फार धोकादायक असतो मंडळी… कारण असं म्हणतात की ज्या आत्म्याचे आवाहन करू तोच येईल अशी खात्री नाही. एखादा दुष्टात्मा आला तर प्राणाशीच गाठ! आता हे कितपत खरं असतं हे आपण सांगू शकत नाही. परंतु विषय निघालाच आहे तर थोडा औजा बोर्डचा इतिहास जाणून घ्यायला हरकत नसावी. 

औजा बोर्डाचा प्रथम वापर चीनमध्ये झाल्याचे उल्लेख आहेत. चीन मधील सोंग साम्राज्यात हा विधी करत असत. परंतु काही तज्ज्ञांच्या मते वैदिक काळात ग्रीस, रोम, युरोप आणि भारतात सुद्धा अश्या प्रकारे आत्म्यांना आवाहन करण्याची पद्धत अस्तित्वात होती. त्यानंतर थेट अठराव्या शतकात या औजा बोर्डाचा बोलबाला अमेरिकेत झाला. अमेरिकन लोक व्यापारी वृत्तीचे असल्याने त्यातल्या एकाला हे बोर्ड तयार करून विकण्याची कल्पना सुचली आणि त्याने लगोलग औजाचे पेटंट सुद्धा घेतले!

'एलिझा बॉंड' हे त्या व्यापाऱ्याचे नाव… 10 फेब्रुवारी 1891 मध्ये औजाचे पेटंट एलिझाच्या नावावर झाले. परंतु हा बोर्ड प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याने अनेकांनी त्यावर दावा ठोकला. मग वेगवेगळ्या नावाने अनेक लोकांना या बोर्डाचे पेटंट दिले गेले. अमेरिकेत औजा बोर्ड आणि प्लॅंचेट हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. इतका की लोक काम धाम सोडून दिवसभर आत्म्यांना आवाहन करू लागले. या प्रकाराने कॅथॉलिक चर्च मात्र संतापले. हा ईश्वर विरोधी प्रकार असून यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली. अखेर काही काळानंतर याची लाट ओसरली खरी, पण याविषयी कुतूहल मात्र अजूनही कायम आहे. आज भारतासह जगभरात कुठे ना कुठे प्लॅंचेटचे प्रयोग होतच असतात. 

मंडळी या औजा बोर्डचे काही नियम सुद्धा सांगितले गेले आहेत. चला तर काही नियम जाणून घेऊया… 

1. औजा बोर्ड कधीही गंमत म्हणून वापरू नये. तुम्ही पुरेसे गंभीर असाल आणि होणाऱ्या बऱ्या वाईट कल्पनांची जाणीव असेल तरच ही जबाबदारी घ्यावी.
2. आत्मा आल्यानंतर त्या आत्म्याला कधीही टोमणे मारू नये अथवा त्याच्या उत्तरांवर हसू नये. त्याने दिलेल्या उत्तरांवर संशय व्यक्त करू नये. तो आत्मा चिडला की सर्वनाश करू शकतो.
3. औजा बोर्डाला स्वतःच्या किंवा इतरांच्या मृत्यूची तारीख कधीही विचारू नये.
4. औजा बोर्ड एकट्याने कधीही वापरू नये. कारण आत्म्याची ऊर्जा एका व्यक्तीला सहन होण्यासारखी नसते. कमीत कमी तीन व्यक्ती तरी सोबत असाव्यात.
5. आलेला आत्मा हा चांगल्या वृत्तीचा आहे असे अजिबात गृहीत धरू नये. 

6. आपल्या घरात कधीही औजा बोर्ड वापरू नये तसेच स्मशानातही याचा अजिबात वापर करू नये. 
7. प्लॅंचेट संपवताना गुडबाय/धन्यवाद शब्द वापरल्याशिवाय औजा बोर्ड जागेवरून उचलू नये. आत्म्याला व्यवस्थित निरोप देऊनच उचलावा. 
8. औजा बोर्ड वरून सर्वांचीच बोटे एकत्र उचलू नयेत. प्रयोग सुरू असताना किमान एकाचे बोट तरी बोर्डवर टेकवलेले असावे.
9. औजा बोर्ड कधीही जाळू नये. त्याचा वापर करायचा नसेल तर व्यवस्थित कपड्यात गुंडाळून बंदिस्त जागी ठेऊन टाकावे.
10. आलेला आत्मा हा दुष्टात्मा असल्याचा संशय आला तर ताबडतोब प्रयोग थांबवावा. 

मंडळी, आता इतकी चर्चा झाली आहे तर याची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेऊया. काही जणांना म्हणण्यानुसार प्लॅंचेट किंवा औजा बोर्ड हे थोतांड आहे. काहीजण याला फक्त कमकुवत मनाचा खेळ असे मानतात. विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणतो की हे सगळे आयडिओमोटार इफेक्ट (Ideomotor effect) मुळे घडते. ही संकल्पना मेंदूशी संबंधित आहे. या इफेक्ट मुळे मेंदू आपल्या शरीराला एखादी गोष्ट हलवण्याचा आदेश देतो जो शरीराकडून आपोआप पाळला जातो. म्हणजेच हे आपल्या शरीराच्या बेसावध अवस्थेत घडत असते. समजा तुमच्या मनात आपल्याला परीक्षेत 90 टक्के पडावे असेच घोळत असेल आणि तुम्ही हा प्रश्न औजा बोर्डावर विचारला तर तुमचे बोट आपोआप 90 आकड्याकडे फिरवले जाईल. 

आता प्लॅंचेट आणि औजा बोर्ड कितपत खरे आणि किती खोटे यात आपल्याला पडायचे नाही मंडळी. हा लेख फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. या मधून बोभाटा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. आता आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये हा लेख कसा वाटला ते सांगा, तसेच तुमच्यापैकी कुणी हा प्रयोग केला आहे का आणि त्याचे काय अनुभव आले ते ही जरूर कळवा.

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required