computer

तुमच्याकडे फाटक्या नोटा आहेत? इथं त्या नक्कीच बदलून मिळतील !!

“साहेब, ही नोट चालणार नाही! दुसरी द्या.”
किंवा
“ताई, फाटकी नोट आम्ही घेत नाही.” 

अशी वाक्ये ऐकल्यावर चिडचिड होते ना? खिशातली किंवा पर्समधील खराब नोट म्हणजे आपले आर्थिक नुकसान असेच वाटते आपल्याला. आपल्या मेहनतीचा पैसा फेकूनही देता येत नाही आणि त्याचा बाजारात काही उपयोग सुद्धा होत नाही म्हटल्यावर वैताग येणारच! मात्र काळजी करू नका… रिझर्व्ह बँकेने फाटक्या, खराब नोटा बदलून देण्याची सुविधा आपल्याला प्रदान केली आहे हे लक्षात असू द्या. या नोटा कुठे बदलून मिळतात? या संबंधी काय नियम आहेत? चला तर मग या लेखातून जाणून घेऊ या…

कुठल्या नोटा चलनातून बाद होतात ?

1. खराब नोट - खूपच वापर झाल्याने झिजलेली, घाण झालेली आणि डाग पडलेली नोट म्हणजे खराब नोट.
2. फाटकी नोट - तुकडे पडलेली, एखादा भाग गायब झालेली नोट म्हणजेच फाटकी नोट.
3. सदोष नोट - धुण्यामुळे अक्षरे पुसली गेलेली, दोन वेगवेगळ्या नोटा एकत्र करून बनवलेली नोट म्हणजे सदोष नोट.

तर अशाप्रकारची नोट किंवा अश्या नोटांचा गठ्ठा आपल्याकडे असेल तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आपण या नोटा जमा करून त्या बदल्यात चांगली नोट घेऊ शकतो. कुठल्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत खराब नोटेच्या बदल्यात चांगली नोट मिळू शकते. तुम्ही त्या बँकेचे ग्राहक नसाल तरीसुद्धा तुम्हाला नोट बदलून घेण्याचा अधिकार आहे. 

नोट बदलून घेण्याचे नियम - 

खराब आणि फाटक्या नोटांच्या बदल्यात त्याच किमतीची नवीन नोट तुम्हाला मिळू शकते. बाकी इतर काही नियम पुढीलप्रमाणे आहेत.

1. एक, दोन, पाच, दहा, वीस रुपयांच्या फाटक्या नोट बदलताना नोटेचा पन्नास टक्क्यांपेक्षा मोठा तुकडा बँकेत सादर करावा लागतो तरच नोट बदलून मिळते. 
2. पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटेचा पासष्ट टक्क्यांपेक्षा मोठा तुकडा सादर केला तरच त्या बदल्यात त्याच किमतीची नवीन नोट मिळते. 
3. पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे आणि दोन हजारच्या नोटेचा पासष्ट टक्क्यांपेक्षा कमी परंतु चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असा तुकडा असेल तर त्या नोटेच्या किमतीच्या निम्म्या किमतीची नोट अथवा रक्कम तुम्हाला मिळते. 
4. इतर नोटांना ही निम्म्या किमतीची सुविधा उपलब्ध नाही. 

कुठल्या नोटा बदलून दिल्या जाऊ शकत नाहीत यासंबंधीचे नियम - 

रिझर्व्ह बँकेच्या 2009 मध्ये लागू केलेल्या नियमानुसार पुढील प्रकारच्या नोटा बदलून दिल्या जाऊ शकत नाहीत.

1. एक, दोन, पाच, दहा, वीस रुपयांच्या नोटेचा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आकाराचा तुकडा असेल तर.
2. पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटेचा चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आकाराचा तुकडा असेल तर.
3. नोट किती रुपयांची आहे हे ओळखू येत नसेल तर.
4. आहे त्या किमतीपेक्षा जास्त किंमत भासवण्यासाठी नोटेवर खाडाखोड केली असेल तर.
5. नोटेवर कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा समाजाचा संदेश लिहिला गेला असेल अथवा चित्र काढले गेले असेल तर.
6. नोट खोटी असेल तर.

तर आता यापुढे आपल्याकडे फाटकी किंवा खराब नोट आहे म्हणून चिंता करत बसण्याची गरज नाही. त्या नोटेला दुसऱ्यांच्या गळ्यात मारण्यापेक्षा किंवा कसेतरी खपवण्यापेक्षा सरळ बँकेत जाऊन नोट बदलून घेतलेले उत्तम असेल. नोट बदलून घेणे हा आपला अधिकार आहे. तसेच, चलनी नोटा खराब न करणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.

 

 

आणखी वाचा :

ATM मधून फाटकी नोट आली तर काय कराल ?...बघा बरं पटपट !!

सबस्क्राईब करा

* indicates required