computer

दिवसेंदिवस कर्जाचा हप्ता भरणे कठीण होते आहे ? जाणून घ्या कर्जाच्या पुनर्रचनेबद्दल आणि नामुष्की टाळा !

गेल्या सहा महिन्यात नोकरी गेली, नोकरी आहे पण पगार अर्धाच झालाय, व्यवसाय बंद झालाय अशा अनेक समस्यांना आपण सगळेच सामोरे जातो आहोत. उत्पन्न घटलंय, पण कर्ज आहे त्याच जागी आहे. त्याची परतफेड करायची तरी कशी हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतो आहे. सुरुवातीला दिलेला- ब्लँकेट मोरॅटोरीयम-म्हणजे सर्वांना एकसमान कर्जफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला होता. त्याची मुदत पण ३१ ऑगस्ट रोजी संपली.

आता पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहे. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीची पुनर्रचना म्हणजे लोन रिस्ट्रक्चरींग करण्याची आता वेळ आली आहे. पण पुनर्रचना म्हणजे नक्की काय? कोणाला ती सुविधा मिळणार आहे? कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी ती लागू आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासणे हा आजच्या लेखाचा विषय आहे.

१. कर्जे अनेक प्रकारची असतात. त्यापैकी वैयक्तिक कर्ज म्हणजे रिटेल लोनची पुनर्रचना करण्यासाठी रिझर्व बँकेने सूचना जारी केल्या आहेत. गृहकर्ज- वैयक्तिक कर्ज- वाहन कर्ज -शिक्षणाचे कर्ज आणि सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज ही सर्व कर्जं 'रिटेल लोन' या वर्गात मोडतात. ही सर्व कर्जं रिस्ट्रक्चर करता येतील. जर तुम्ही वाहन आणि गृह अशी दोन कर्जं घेतली असतील तर दोन्हीनाही हाच नियम लागू असेल.

२. या पुनर्रचनेचा फायदा घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी अट आहे ती आधी समजून घेऊया. ०१/०३/२०२० रोजी ज्यांचे कर्ज तीस दिवसांपेक्षा जास्त थकीत नसेल त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. उदाहरणार्थ, १ मार्च रोजी तुमचा कर्ज हप्ता एक महिन्यापेक्षा जास्त थकीत असेल तर तुम्हाला कर्जाच्या पुनर्रचनेचा फायदा घेता येणार नाही. बँकेच्या भाषेत १ मार्च रोजी तुमचे कर्ज 'स्टँडर्ड' या सदरात मोडत असेल तर नव्या आदेशाचा फायदा घेता येईल.

३. या पुनर्ररचनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बँकेपुढे काही पुरावे सादर करावे लागतील. जर नोकरी गेली असेल तर कंपनीकडून मिळालेले पत्र दाखल करावे लागेल. जर पगार कमी झाला असेल तर पे स्लीप आणि कपातीचे पत्र दाखवावे लागेल. जर व्यावसायिक असाल तर जीएसटीच्या चलनाच्या प्रती जमा कराव्या लागतील. या कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय बँक तुमच्या अर्जाचा विचार करणार नाही. 

४. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया! पुनर्ररचना म्हणजे काय? 

अ) आधीच्या सहा महिन्याव्यतिरिक्त आणखी दोन वर्षांपर्यंतचा  मोरॅटोरीयम मिळेल. 

ब) जर अशा मोरॅटोरीयमची गरज नसेल तर कर्जाची मुदत वाढवून मिळेल. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी भरावा लागेल. 

क) जर  दोन वर्षांपर्यंतचा मोरॅटोरीयम घेतला तर त्या दोन वर्षांच्या व्याजाचे काय? तर ते दुसरे एक छोटे कर्ज समजून ते फेडण्यासाठी वेळ दिला जाईल.

ड) प्रत्यक्षात ही कार्यवाही करण्यासाठी वेगवेगळ्या रचना (मॉडेल) बनवण्याचे अधिकार त्या त्या बँकेनी नक्की करायचे आहेत.

इ) आधीच्या सहा महिन्याच्या काळात मोरॅटोरीयमची सवलत वापरली नसेल त्यांनाही अर्ज करता येईल.

५.  आता एका वेगळ्या मुद्द्याचा विचार करूया. तो म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर. क्रेडिट स्कोअर ही संकल्पना समजून घ्यायची असेल तर बोभाटाचा हा लेख आधी वाचून घ्या.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर घसरताना दिसत असेल तर बँक तुमचा अर्ज फेटाळू शकते. ते अधिकार बँकेकडे आहेत. 

६. या पुनर्रचनेमुळे क्रेडिट स्कोअर भविष्यात घसरण्याची शक्यता आहे का? होय. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होणारच आहे, पण तुमचे खाते NPA म्हणून वर्गीकृत होण्यापेक्षा ते बरेच बरे आहे. 

एखाद्या कर्जाची फेड सतत 90 दिवस वेळेत झाली नाही तर त्या खात्याची वर्गवारी non performing asset अशी केली जाते. या खात्याला मिळणाऱ्या सर्व सवलती त्यानंतर मिळत नाहीत, पुढील कर्जवाढ मिळत नाही, अन्य बँका कर्ज देत नाहीत.

ही झाली बँकेच्या अधिकारातील योजना. पण कोवीडच्या काळात काहींनी वेगळे मार्ग चोखाळले आहेत त्याचाही इथे उल्लेख करायला हवा आहे. उदाहरणार्थ : आमच्या परिचयातील एका गृहस्थांनी मासिक खर्चाचा अंदाज घेऊन सोने आणि चांदीचा भाव अत्युच्च होता तेव्हा विक्री केली, त्यातून पुढील दोन वर्षांच्या खर्चाची तरतूद करून ठेवली.
 
तुम्हीही असे कर्जफेडीचे काही वेगळे उपाय अंमलात आणले आहेत का? हे तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघत आहोत.

 

आणखी वाचा :

'पर्सनल लोन' घेताय? पण कर्ज घेण्याआधी योजनेतले धोके जाणून घेतले आहेत का?

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required